नाशिक : राष्ट्रवादी काँग्रेसच्या (शप) नाशिक मधल्या शिबिरात राहुल गांधींचा चालला अजेंडा; सफरचंद + कलिंगड + केळी निवडणूक चिन्हे वापरून मतं चोरीचा डेमो दिला. शरद पवारांच्या समोर व्यासपीठावर हे आज घडून आले.
शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे शिबिर नाशिक मध्ये झाले. या शिबिराला दहा पैकी तीन आमदार आणि आठ पैकी दोन खासदार गैरहजर होते. पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या आजच्या शिबिरामध्ये अजेंडा मात्र पवारांचा चालण्यापेक्षा राहुल गांधींचा अजेंडा चालला. राहुल गांधींनी मतदान चोरीवरून जे देशभर रान उठवले त्याचे पडसाद पवारांच्या पक्षाच्या शिबिरात उमटले. मतांची चोरी कशी होते??, याचा डेमो दोन तरुणांनी स्टेजवर येऊन दाखविला त्यासाठी त्यांनी सफरचंद कलिंगड आणि केळी अशा निवडणूक चिन्हांचा वापर केला.
इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन मध्ये चोरीचे प्रोग्रामिंग केले, तर मतांची चोरी होऊ शकते. व्हीव्हीपॅट मध्ये सुद्धा वेगळे छापून येऊ शकते. लाईट सेन्सर च्या माध्यमातून हे घडवता येऊ शकते, असा दावा डेमो दाखविणाऱ्या तरुणांनी केला. इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीनच्या एका मशीनची किंमत चार हजार रुपये आहे. तेवढ्या किमतीचा डीडी आम्ही निवडणूक आयोगाला पाठविला होता. परंतु त्यांचे उत्तर आले नाही, असा दावाही या तरुणांनी केला.
या सादरीकरणानंतर शरद पवारांनी तरुणांना शंका विचारली. माझ्या मते तिन्ही खुणा दाखवताना बैलगाडी मोटार आणि दुसरी कुठली तरी खूण दाखवा. मात्र तशा खुणा प्रोग्रामिंग मध्ये घालावे लागतील मगच त्या मशीनवर दाखवता येतील, असे उत्तर डेमो दाखविणाऱ्या तरुणांनी दिले.
उत्तम जानकर यांचा दावा
सफरचंद कलिंगड आणि केळी या निवडणूक चिन्हांच्या आधारे मतं चोरीच्या डेमो नंतर आमदार उत्तम जानकर यांचे भाषण झाले. राहुल गांधींनी सहा महिने मतं चोरीचा अभ्यास केला. मी 10 महिने अभ्यास केलाय. राहुल गांधींकडे मतं चोरी विषयी हायड्रोजन बॉम्ब आहे, तर माझ्याकडे अणुबॉम्ब पेक्षा मोठा परमाणु बॉम्ब आहे, असा दावा उत्तम जानकर यांनी केला. भाजपने विधानसभा निवडणुकीत एकाच दोन मते अशा पद्धतीने मतं चोरी केली. म्हणजे विरोधकांना एक मत मिळाले तर भाजपच्या उमेदवाराला दोन मते जात होती.
युगेंद्र पवारांना 1 लाख 20 हजार मते मिळाली, त्यावेळी समोरच्या उमेदवाराला 60000 मते जास्त मिळाली, असा दावाही उत्तम जानकर यांनी केला. मतं चोरीचा विषय मांडताना उत्तम जानकर यांनी थेट शरद पवारांच्या घरातच हात घातला.
मारकड वाडी मध्ये मतपत्रिकांवर मतदान घेतले असते, तर माझ्याविरुद्ध देशद्रोहाचा गुन्हा दाखल झाला असता. सुप्रिया सुळे यांनी मारकड वाडी ते मुंबई अशी मतदान चोरी विरोधात यात्रा काढायला हवी होती, असे मत उत्तम जानकर यांनी व्यक्त केले.
पण एकूणच शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे आजचे एक दिवसाचे शिबिर किंवा अधिवेशन शरद पवार यांच्या अजेंड्यावर चालण्यापेक्षा राहुल गांधींच्या अजेंड्यावर चालले असल्याचे आज स्पष्ट झाले.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App