विशेष प्रतिनिधी
मुंबई : Devendra Fadnavis : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी गेल्या पाच दिवसांपासून सुरू असलेले मनोज जरांगे पाटील यांचे उपोषण अखेर आज संपले. सरकारने जारी केलेल्या शासकीय आदेशानंतर (जीआर) जरांगे यांनी आठ पैकी सहा मागण्या मान्य झाल्याने आंदोलन मागे घेण्याचा निर्णय घेतला. यानंतर त्यांनी आंदोलकांना रात्री नऊ वाजेपर्यंत मुंबई सोडण्याचे निर्देश दिले, आणि आंदोलक आपापल्या गावी परतताना दिसत आहेत.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणी समाधान व्यक्त करताना सांगितले की, मराठा आरक्षणाच्या मागणीवर योग्य तोडगा काढण्यात यश आले आहे. मंत्रिमंडळ उपसमितीच्या प्रयत्नांमुळे आणि विशेषतः राधाकृष्ण विखे पाटील यांच्या योगदानामुळे हा प्रश्न मार्गी लागला. ते म्हणाले, “न्यायालयाच्या निर्णयांमुळे सरसकट आरक्षण देण्यास अडचणी होत्या. आरक्षण हे समूहासाठी नसून व्यक्तीसाठी असते, हे आंदोलकांना समजावून सांगण्यात आले. तसेच, ओबीसी समाजाच्या मनातील भीती दूर करण्यातही यश आले आहे.”
फडणवीस यांनी पुढे सांगितले की, सरकारच्या या निर्णयामुळे मराठवाड्यातील अनेक मराठा बांधवांना फायदा होईल. “ज्यांच्या रक्ताच्या नात्यात कुणबी नोंद आहे, त्यांना आता कुणबी प्रमाणपत्र मिळणे शक्य होईल. यामुळे ओबीसी समाजाची सरसकट आरक्षण घेतले जाईल ही भीतीही दूर झाली आहे. केवळ ज्यांची खरी नोंद आहे, त्यांनाच आरक्षणाचा लाभ मिळेल,” असे त्यांनी स्पष्ट केले. मंत्रिमंडळ उपसमितीच्या कार्याबद्दल समाधान व्यक्त करताना त्यांनी मुंबईकरांना आंदोलनादरम्यान झालेल्या त्रासाबद्दल दिलगिरीही व्यक्त केली.
मुख्यमंत्री पुढे म्हणाले, “राजकारणात टीका आणि स्वागत दोन्ही मिळतात. टीका झाली तरी मी विचलित झालो नाही, कारण माझे ध्येय फक्त समाजाला न्याय देणे हे होते. दोन समाजांमध्ये तेढ निर्माण होणार नाही, असा निर्णय आम्ही घेतला. कोणी दोष दिला, शिव्या दिल्या तरी मी कालही समाजासाठी काम करत होतो, आजही करतोय आणि उद्याही करेन. महाराष्ट्रातील प्रत्येक समाजासाठी मी कार्यरत राहीन.”
दरम्यान, मनोज जरांगे यांना उपचारासाठी छत्रपती संभाजीनगर येथील गॅलेक्सी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सरकार आणि आंदोलकांमधील चर्चेतून हा प्रश्न सुटल्याने मराठा समाजात समाधानाचे वातावरण आहे. मराठा आरक्षणाच्या या लढ्याला यश मिळाल्याने आता सर्वांचे लक्ष सरकारच्या पुढील कृतींकडे लागले आहे.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App