Maratha Reservation: मुंबईत मराठा आंदोलनाचा दणदणीत विजय; जरांगे पाटलांच्या मागण्या मान्य, आझाद मैदानात उत्साह

Maratha

विशेष प्रतिनिधी

 

मुंबई: Maratha Reservation:  मराठा समाजाच्या आंदोलनाने ऐतिहासिक यश मिळवले आहे. मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखालील मराठा क्रांती मोर्चाने राज्य सरकारला पाच प्रमुख मागण्या मान्य करण्यास भाग पाडले. मुंबईच्या आझाद मैदानावर “पाटील… पाटील…”, “एक मराठा, लाख मराठा”, “छत्रपती शिवाजी महाराज की जय” आणि “गणपती बाप्पा मोरया” अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला. मंत्रिमंडळ उपसमितीचे प्रमुख राधाकृष्ण विखे पाटील, मंत्री शिवेंद्रराजे भोसले, माणिकराव कोकाटे यांच्यासह अनेक नेते यावेळी व्यासपीठावर उपस्थित होते.

मराठा समाजाच्या मागण्या मान्य

मनोज जरांगे पाटील यांनी उपस्थितांना माहिती देताना सांगितले की, सरकारने मराठा समाजाच्या पाच मागण्या मान्य केल्या आहेत. यामध्ये हैद्राबाद गॅजेट आणि सातारा गॅजेटच्या अंमलबजावणीचा समावेश आहे. “हैद्राबाद गॅजेट तात्काळ लागू करण्याची मागणी मान्य झाली आहे. याबाबतचा शासन निर्णय (जीआर) लवकरच काढला जाईल,” असे जरांगे पाटील यांनी स्पष्ट केले. तसेच, सातारा आणि औंध गॅजेटमधील कायदेशीर त्रुटींचा अभ्यास पुढील 15 दिवसांत पूर्ण करून अंमलबजावणी केली जाईल, असे सरकारने आश्वासन दिले आहे. यासाठी जरांगे पाटील यांनी सरकारला एक महिन्याची मुदत दिली असून, शिवेंद्रराजे भोसले यांच्याकडून याबाबत हमी घेतली.

“मराठा-कुणबी एकच”

मराठा आणि कुणबी समाज एकच असल्याचा शासन निर्णय काढण्यासाठी सरकारला दोन महिन्यांचा अवधी देण्यात आला आहे. जरांगे पाटील यांनी यावेळी वाशी येथील आंदोलनाचा उल्लेख करताना सांगितले, “यापूर्वी वाशी येथे आपली फसवणूक झाली होती. यावेळी आपण सावध राहू. सरकारशी चर्चा करताना अभ्यासकांचाही सल्ला घेतला जाईल.”



आंदोलकांमध्ये उत्साह

आझाद मैदानावर जमलेल्या हजारो मराठा बांधवांनी सरकारच्या या निर्णयाचे स्वागत केले. “जिंकलो हो… राजे, तुमच्या ताकदीवर जिंकलो!” अशा घोषणांनी वातावरण उत्साहपूर्ण बनले. मराठा आरक्षण समिती आणि उपस्थित सचिवांचेही जरांगे पाटील यांनी आभार मानले. “हा विषय शांततेत आणि समजूतदारपणे हाताळण्याची गरज आहे. आपण निवेदनाद्वारे मागण्या मांडल्या होत्या, त्या आता मान्य झाल्या आहेत,” असे त्यांनी सांगितले.

हैद्राबाद गॅजेटच्या अंमलबजावणीसाठी उपसमितीने सूचना दिल्या असून, पश्चिम महाराष्ट्रातील मराठा समाजाला याचा लाभ होणार आहे. सातारा गॅजेटमधील त्रुटी दूर करण्यासाठी सरकारने पुढील 15 दिवसांत कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करण्याचे आश्वासन दिले आहे. जरांगे पाटील यांनी सरकारला स्पष्ट शब्दांत सांगितले, “आता फसवणूक चालणार नाही. मराठा समाजाच्या हक्कासाठी आपण एकजुटीने लढलो आणि यश मिळवले.” मराठा समाजाच्या या विजयाने राज्यभरात उत्साहाचे वातावरण आहे. आता सरकार कशा पद्धतीने या मागण्यांची अंमलबजावणी करते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Resounding victory of Maratha movement in Mumbai; Jarange Patil’s demands accepted, enthusiasm at Azad Maidan

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात