विशेष प्रतिनिधी
नाशिक : निवडणूक विश्लेषणातील तज्ज्ञ म्हणून ओळखले जाणारे आणि लोकनीती-सीएसडीएसचे संचालक संजय कुमार यांच्यावर मतदारयादीतील चुकीचा डाटा पोस्ट केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे. नाशिक आणि नागपूर जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांनी तक्रार दाखल करून कारवाई केली असून या घटनेने राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.
१७ ऑगस्ट रोजी संजय कुमार यांनी सोशल मीडियावर दोन विधानसभा मतदारसंघांचा डाटा मांडत मोठी घसरण झाल्याचा दावा केला होता. त्यांच्या म्हणण्यानुसार, नागपूरमधील रामटेक आणि नाशिकमधील देवळाली या मतदारसंघांमध्ये लोकसभा निवडणुकीच्या तुलनेत विधानसभा निवडणुकीत तब्बल ३५ ते ४० टक्क्यांनी मतदारसंख्या कमी झाली होती. ही माहिती सार्वजनिक होताच विरोधी पक्षांनी निवडणूक आयोगावर मतचोरीच्या आरोपांची सरबत्ती सुरू केली.
नाशिकच्या जिल्हा निवडणूक कार्यालयाने एक्सवरून संजय कुमार यांच्यावरील कारवाईची माहिती दिली. त्यामध्ये म्हटले आहे की, सीएसडीएसचे संजय कुमार यांनी २०२४ चा लोकसभा आणि महाराष्ट्र विधानसभेचे १२६ देवळाली विधानसभा मतदारसंघातील मतदारांबाबत चुकीची माहिती पोस्ट केली. त्यामुळे त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात येत आहे. सर्व नागरिकांनी अचूक माहितीसाठी फक्त निवडणूक आयोगाची वेबसाईट पाहावी असं त्यांनी सांगितले.
नागपूरमधील रामटेकच्या तहसीलदारांनीही त्यांच्याविरोधात तक्रार देत रामटेक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. रामटेकमध्ये मोठ्या प्रमाणावर मतदारांची नावे लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीदरम्यान कमी करण्यात आल्याचा दावा सीएसडीएसकडून करण्यात आला होता. पोलिसांनी संजय कुमार यांच्याविरोधात बीएनएसचे कलम १७५ (निवडणुकीसंदर्भात खोटे विधान), कलम ३५३ (१) ब (सार्वजनिक गैरप्रकार घडवून आणणारी विधाने), कलम २१२ (सार्वजनिक सेवकाला खोटी माहिती देणे) आणि कलम ३४० अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.
संजय कुमार यांनी त्यांच्या पोस्टमध्ये महाराष्ट्र विधानसभा जागांवर कमी मतांची माहिती दिली होती. एक्स वरची ही पोस्ट डिलीट केल्यानंतर संजय कुमार यांनी माफीही मागितली आहे. ‘त्यांच्या टीमने डेटाचा चुकीचा अर्थ लावला होता’, असे त्यांनी म्हटले. त्यांनी १७ ऑगस्ट रोजी हे ट्विट केले होते. भाजपाने संजय कुमार यांनी पोस्ट डिलीट केल्यानंतर त्यांच्यावर टीका केली. ‘ही तीच संस्था आहे ज्यावर राहुल गांधी विश्वास ठेवतात’ असं भाजपाने म्हटले होते.
लोकसभा निवडणुकीच्या तुलनेत महाराष्ट्रातील दोन जागांवर विधानसभा निवडणुकीत मतदारांची संख्या प्रचंड घटली आहे’ असा दावा संजय कुमार यांनी १७ ऑगस्ट रोजी केलेल्या पोस्टमध्ये केला होता. ‘महाराष्ट्रातील विधानसभा क्रमांक ५९ रामटेकमध्ये २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत चार लाख ६६ हजार २०३ मतदार होते तर २०२४ च्या विधानसभा निवडणुकीत आमदारांची संख्या दोन लाख ८६ हजार ९३१ पर्यंत कमी झाली, असे या पोस्टमध्ये संजय कुमार यांनी म्हटले होते. कुमार यांच्या मते, लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत या जागेवर एक लाख ७९ हजार २७२ म्हणजेच ३८.४५ टक्के मते कमी झाली. त्याचप्रमाणे त्यांनी देवळाली विधानसभा जागेचा डेटा दिला होता. त्यांच्या मते, २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत विधानसभा क्रमांक १२६ देवळालीमध्ये चार लाख ५६ हजार ७२ मते होती. तर विधानसभा निवडणुकीत मतदारांची संख्या दोन लाख ८८ हजार १४१ पर्यंत कमी झाली. संजय कुमार यांच्या मते, देवळाली मतदारसंघावर एक लाख ६७ हजार ९३१ म्हणजेच ३६.८२ टक्के मते कमी झाली.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App