Semiconductor भारताला जगात तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात पुढे नेणारे एक मोठे स्वप्न १९८९ साली मोहाली येथे लागलेल्या एका आगीत जळून खाक झाले. मोहालीतील सेमीकंडक्टर कॉम्प्लेक्स लिमिटेड (SCL) हे देशातील पहिले चिप उत्पादन केंद्र होते. जगभरात त्या काळी ज्या काही देशांकडे अत्याधुनिक चिप बनवण्याची क्षमता होती, त्यामध्ये भारताचाही समावेश होत होता. परंतु ७ फेब्रुवारी १९८९ रोजी लागलेल्या आगीत हे संपूर्ण स्वप्न उद्ध्वस्त झाले.Semiconductor
या आगीत उत्पादन आणि संशोधनाची सर्व यंत्रणा नष्ट झाली, तर प्रशासनिक विभाग वाचला. अंदाजे ६० कोटी रुपयांचे नुकसान झाले. तपास समित्यांनी या आगीचे नेमके कारण सांगितले नाही, मात्र अनेकांना हा प्रकार कट म्हणजेच मुद्दाम घडवून आणलेला अपघात असल्याचा संशय होता. पुरावे मात्र मिळाले नाहीत आणि प्रकरण अधांतरी राहिले.Semiconductor
या घटनेनंतर भारताचा सेमीकंडक्टर उद्योग जवळजवळ दशकभर थांबून गेला. १९९७ मध्ये पुन्हा कामकाज सुरू झाले, पण तोपर्यंत जग फार पुढे गेले होते. तैवानची TSMC आणि इतर कंपन्या बाजारावर वर्चस्व गाजवत होत्या, तर भारताकडे फक्त अपूर्ण संशोधन संस्था उरली. SCL नंतर अवकाश विभागाखाली दिले गेले आणि पुढे ते इलेक्ट्रॉनिक्स व माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाच्या (MeitY) अंतर्गत एक संशोधन संस्था म्हणून कार्य करू लागले. म्हणजे जेथे प्रत्यक्ष उत्पादन होऊन मोठ्या प्रमाणावर भारताला परकीय आयातीपासून स्वावलंबन मिळू शकले असते, तेथे आपल्याकडे फक्त प्रयोगशाळा उरली.
ही आग केवळ एका संस्थेला नाही तर संपूर्ण देशाच्या तंत्रज्ञान स्वप्नांना धक्का देणारी ठरली. जर भारताने तेव्हा सातत्य राखले असते, तर आज आपल्याकडे सेमीकंडक्टर उत्पादनात कोरिया, तैवान किंवा जपानप्रमाणे जागतिक स्थान असते. परंतु त्या काळातील राजकीय दुर्लक्ष आणि आगीतल्या विनाशामुळे भारताला मागे राहावे लागले.
आज मात्र परिस्थिती बदलत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वातंत्र्य दिनाच्या भाषणात यावर्षाअखेरीस “मेड इन इंडिया” चिप बाजारात येईल, अशी घोषणा केली. सरकारने चार मोठ्या सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी दिली आहे. त्यासाठी तब्बल ४६०० कोटी रुपयांचे गुंतवणूक पॅकेज जाहीर झाले आहे. याशिवाय मोहालीतील जुन्या SCL ला पुन्हा उभारण्यासाठी ८ हजार कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. या आधुनिकीकरणामुळे तेथील तंत्रज्ञान ६५ नॅनोमीटरवरून ४० नॅनोमीटरपर्यंत प्रगत होईल.
याचा अर्थ असा की, ज्या ठिकाणी एकेकाळी भारताचे स्वप्न जळून खाक झाले होते, तिथून पुन्हा सुरुवात होत आहे. जागतिक स्तरावर चीन, तैवान, अमेरिका यांच्यामध्ये स्पर्धा सुरू असताना भारत स्वतःचा स्वतंत्र मार्ग तयार करण्याचा प्रयत्न करत आहे. या क्षेत्रात स्वावलंबन मिळाले, तर केवळ मोबाईल किंवा संगणक उद्योगच नव्हे तर संरक्षण, अंतराळ संशोधन, वाहननिर्मिती अशा असंख्य क्षेत्रांना नवी दिशा मिळेल.
म्हणजेच १९८९ मधील मोहालीतील आग ही भारताच्या प्रगतीसाठी मोठा अडथळा होती, पण २०२५ नंतर तेच ठिकाण पुन्हा आशेचे केंद्र बनण्याच्या मार्गावर आहे. हे स्वप्न पूर्ण झाले, तर भारताला केवळ “डिजिटल ग्राहक” न राहता “तंत्रज्ञान निर्माता” बनवण्याची संधी मिळेल
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App