विशेष प्रतिनिधी
मुंबई : Sanjay Rathod राज्यात एकीकडे मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले असताना, दुसरीकडे शेतकरी कर्जमाफीचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. याच पार्श्वभूमीवर, महायुती सरकारमधील मंत्री संजय राठोड यांनी शेतकऱ्यांसाठी एक मोठी बातमी दिली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस लवकरच शेतकरी कर्जमाफीची घोषणा करतील, असे संकेत त्यांनी दिले आहेत. सोमवारी ते यवतमाळमधील पुसद येथे एका कार्यक्रमात बोलत होते.Sanjay Rathod
महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी काही दिवसांपूर्वी “कर्जमाफीसंदर्भात मुख्यमंत्री लवकरच निर्णय घेतील” असे आश्वासन दिले होते. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही “आमच्या जाहीरनाम्यानुसार कर्जमाफी केली जाईल” असे स्पष्ट केले होते. त्यात आता मंत्री संजय राठोड यांनीही शेतकरी कर्जमाफीसंदर्भात सूतोवाच केल्यामुळे, गेल्या अनेक दिवसांपासून कर्जमाफीच्या प्रतीक्षेत असलेल्या शेतकऱ्यांमध्ये आशेचा किरण निर्माण झाला आहे.Sanjay Rathod
नेमके काय म्हणाले संजय राठोड?
हरितक्रांतीचे प्रणेते व माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या 46 व्या स्मृतिदिनानिमित्त यवतमाळच्या पुसद येथे वसंतराव नाईक कृषी प्रतिष्ठानतर्फे राज्यातील प्रयोगशील 13 शेतकऱ्यांना कृषी गौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला. या सोहळ्यात बोलताना यवतमाळचे पालकमंत्री संजय राठोड यांनी उपरोक्त विधान केले. संकटग्रस्त शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्यासंदर्भात राज्य मंत्रिमंडळात चर्चा सुरू आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे लवकरच शेतकऱ्यांसाठी कर्जमाफीची घोषणा करतील, अशी माहिती त्यांनी दिली. तसेच, पुसदच्या माळ पठारावरील दुष्काळग्रस्त 40 गावांना पाणी उपलब्ध करून देऊन तेथील दुष्काळ कायमचा दूर करण्याचे आश्वासनही त्यांनी दिले.
शेतकरी म्हणून कर्जमाफीची गरज
यापूर्वी राज्याचे कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनीही शेतकऱ्यांच्या कर्जमाफीची गरज असल्याचे मान्य केले होते. “मी शेतकरीपुत्र असल्याने शेतकऱ्यांच्या अडचणी मला चांगल्या प्रकारे माहित आहेत. एक शेतकरी म्हणून कर्जमाफीची गरज असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले होते. मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री मिळून यावर योग्य वेळी निर्णय घेतील, असे त्यांनी स्पष्ट केले होते.
सातबारा कोरा करण्याची विरोधकांची मागणी
दरम्यान, “राज्यातील शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करा” अशी मागणी विरोधकांकडून सातत्याने होत आहे. प्रहार संघटनेचे संस्थापक बच्चू कडू यांनीही या मागणीसाठी आंदोलन छेडले होते. या सर्व मागण्यांच्या पार्श्वभूमीवर मंत्री संजय राठोड यांनी दिलेले संकेत महत्त्वपूर्ण मानले जात आहेत.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App