नाशिक : स्वाभिमानाच्या गप्पा मारणारे मराठी नेते दिल्लीश्वरांसमोर झुकले; तिसऱ्या – चौथ्या रांगेत जाऊन बसले!!, हे राजकीय वास्तव चित्र काल राहुल गांधींच्या निवासस्थानी अधोरेखित झाले. गांधी परिवाराने ठाकरे + पवारांना तिसऱ्या चौथ्या रांगेत बसविले होते. त्याआधी देखील एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना त्यांना दुसऱ्याच रांगेत उभे राहावे लागले होते. Thakckrey and Pawar
महाराष्ट्र दिल्ली समोर झुकत नाही हा इतिहास आहे, असे सोशल मीडिया हँडलवर लिहिणाऱ्या ज्येष्ठ नेते शरद पवारांना राहुल गांधींनी तिसऱ्या – चौथ्या रांगेत बसविले होते. उद्धव ठाकरेंना देखील त्यांच्याच आसपास बसविले होते, याची अप्रत्यक्ष कबुली खासदार सुप्रिया सुळे यांनी दिली, पण या आसन व्यवस्थेचे त्यांनी समर्थनही केले.
– INDI नेत्यांच्या समोर जुनेच प्रेझेंटेशन
INDI आघाडीतल्या ज्येष्ठ नेत्यांना राहुल गांधींची बातमीदारांसारखीच वागणूक दिली; पत्रकार परिषदेत दाखविलेले प्रेझेंटेशनच त्यांच्यासमोर सादर केले. हे राहुल गांधींच्या निवासस्थानी काल सायंकाळी घडले. राहुल गांधींनी दुपारच्या पत्रकार परिषदेत जे प्रेझेंटेशन करून मतदान चोरीचा आरोप केला, तेच प्रेझेंटेशन त्यांनी INDI आघाडीतल्या ज्येष्ठ नेत्यांसमोर केले.
INDI आघाडीतल्या सगळ्या वरिष्ठ नेत्यांची बैठक राहुल गांधींच्या निवासस्थानी झाली. या बैठकीला राहुल गांधींच्या वयाएवढा निवडणुका लढविण्याचा अनुभव असणारे मल्लिकार्जुन खर्गे, शरद पवार, फारुख अब्दुल्ला, टी. आर. बालू, डी. राजा, स्वतः सोनिया गांधी यांच्यासारखे वरिष्ठ नेते उपस्थित होते. पण या सगळ्यांना राहुल गांधींनी बातमीदारांसारखीच वागणूक दिली. दुपारच्या पत्रकार परिषदेत केलेले मतदान चोरीचे प्रेझेंटेशन जसेच्या तसे वरिष्ठ नेत्यांसमोर सादर केले.
– आसन व्यवस्थेवरून डिवचले
या बैठकीतल्या आसन व्यवस्थेवरून एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने उबाठा शिवसेनेला डिवचले. महाराष्ट्राच्या स्वाभिमानाच्या गप्पा मारणारे आणि बाळासाहेबांचा वारसा सांगणारे राहुल गांधींच्या घरी जाऊन मागच्या रांगेत बसले, असा टोमणा एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे नेते नरेश म्हस्के यांनी हाणला. त्यावर संजय राऊत यांनी चौताळून प्रत्युत्तर दिले, तर सुप्रिया सुळे यांनी आसन व्यवस्थेचे समर्थन केले. राहुल गांधींचे प्रेझेंटेशन स्क्रीनवर होते तो स्क्रीन मागूनच चांगला दिसत होता. उद्धव ठाकरे योग्य जागेवर बसले होते. आदरणीय पवार साहेब सुद्धा तिसऱ्या – चौथ्या रांगेतच बसले होते. पण तो काही प्रोटोकॉलचा कार्यक्रम नव्हता. तो अनौपचारिक डिनरचा कार्यक्रम होता त्यामुळे तिथे रांगेचा प्रश्न नव्हता, असे सुप्रिया सुळे म्हणाल्या. रांगेचा वाद घालणारे बालिश असल्याची मखलाशी सुप्रिया सुळे यांनी केली.
पण संजय राऊत यांनी केलेला थयथयाट आणि सुप्रिया सुळे यांची मखलाशी काहीही असली तरी स्वाभिमानाच्या गप्पा मारणारे ठाकरे आणि पवार राहुल गांधींच्या निवासस्थानी मागच्या रांगेमध्ये बसले होते, हे वास्तव लपून राहिले नाही. त्याआधी एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना त्यांना दुसऱ्या रांगेत उभे केले होते, हे वास्तव देखील लपून राहिले नव्हते. त्यावेळी उबाठा शिवसेना नेत्यांनी एकनाथ शिंदेंना डिवचले होते. पण एकनाथ शिंदे यांनी दुसऱ्या रांगेचे समर्थन केले होते. पण या सगळ्यामुळे एक गोष्ट स्पष्ट झाली, ती म्हणजे दोन्ही शिवसेना आणि दोन्ही राष्ट्रवादी स्वाभिमानाच्या गप्पा मारत महाराष्ट्रात राजकारण करत असले, तरी ते दिल्लीश्वरांसमोर झुकतात, हेच पुन्हा एकदा सिद्ध झाले.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App