विशेष प्रतिनिधी
छत्रपती संभाजी नगर : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज छत्रपती संभाजीनगर येथे ‘श्री संत सद्गुरु योगिराज गंगागिरीजी महाराज 178 वा अखंड हरिनाम सप्ताह’ येथे उपस्थित होते. यावेळी त्यांनी भगवंताच्या नामस्मरणात रमत फुगडीचा आनंद लुटला.
मुख्यमंत्री फडणवीस यांनी ‘अखंड हरिनाम सप्ताहा’निमित्त 30 जुलै ते 6 ऑगस्ट 2025 दरम्यान आयोजित कृषी महोत्सवाची नोंद ‘इंडिया स्टार वर्ल्ड रेकॉर्ड्स’मध्ये झाल्याचे प्रमाणपत्र प. पू. ह. भ. प. रामगिरी महाराज यांना प्रदान केले. हरिनाम सप्ताहाच्या अनुशासनबद्ध आयोजनाची प्रशंसा करत त्यांनी नमूद केले की, याचा गिनीज वर्ल्ड रेकॉर्डसाठीही विचार होऊ शकतो.
सरला बेटाच्या विकास आराखड्यास लवकरच मान्यता देण्याचे आश्वासन त्यांनी दिले. शनि देवगाव बंधारा निश्चितपणे उभारण्यात येईल, असा शब्दही दिला. सरला बेट येथे भाविकांसाठी आवश्यक सोयी-सुविधांची कामे शासन स्तरावर सुरू असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
मराठवाड्यातील दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर नदीजोड प्रकल्पाचे काम यावर्षीच सुरू करून, ‘मराठवाड्याच्या पुढच्या पिढीला दुष्काळ पाहू देणार नाही’ हा निर्धारही त्यांनी व्यक्त केला. राज्य सरकार शेतकऱ्यांसाठी मोफत वीज आणि सिंचनाच्या सुविधा देत असून, लाडक्या बहिणींच्या आणि शेतकऱ्यांच्या पाठीशी ठामपणे उभे असल्याचे त्यांनी सांगितले.
श्री संत सद्गुरु योगीराज गंगागिरीजी महाराज, प. पू. ह. भ. प. रामगिरी महाराज आणि उपस्थित भक्तशक्तीचा आशीर्वाद घेत, दरवर्षी या सप्ताहात सहभागी होण्याचा संकल्प मुख्यमंत्री फडणवीस यांनी व्यक्त केला.
यावेळी मंत्री गिरीश महाजन, मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, आमदार रमेश बोरनारे व इतर मान्यवरही उपस्थित होते.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App