विशेष प्रतिनिधी
मुंबई : Raj Thackeray राज्यात महापालिका निवडणुकांची तयारी सुरू असताना ठाकरे बंधूंच्या संभाव्य युतीने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. मुंबईत मराठीच्या मुद्द्यावर झालेल्या विजयी मेळाव्यानंतर उद्धव आणि राज ठाकरे तब्बल वीस वर्षांनी एका व्यासपीठावर एकत्र आले. त्यानंतर या दोघांची पालिका निवडणुकीत एकत्र येण्याची शक्यता अधिकच वाढली होती. मात्र, विजयी मेळावा मराठी पुरताच होता, त्याचा राजकारणाशी संबंध नाही, असे विधान राज ठाकरे यांनी केले आहे. त्यामुळे ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चा पुन्हा अनिश्चिततेच्या वाटेवर गेली आहे.Raj Thackeray
सध्या नाशिकमध्ये मनसेचे तीन दिवसीय शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. आजपासून या शिबिराला सुरुवात झाली असून मनसे प्रमुख राज ठाकरे ( Raj Thackeray ) हे शिबिरासाठी इगतपुरी येथे दाखल झाले आहेत. यावेळी त्यांनी अनौपचारिक गप्पांदरम्यान विजयी मेळाव्याबाबत भूमिका स्पष्ट केली. त्यामुळे ठाकरे बंधूंच्या युतीचा सस्पेन्स आणखी वाढला आहे.Raj Thackeray
नेमके काय म्हणाले राज ठाकरे ?
मराठीचा विजयी मेळावा केवळ मराठीच्या मुद्यावर होता, त्याचा राजकारणाशी संबंध नाही, असे राज ठाकरे यांनी म्हटले. तसेच नोव्हेंबर – डिसेंबर दरम्यान चित्र स्पष्ट होईल. त्यांनतर युती संदर्भातील निर्णय बघू, असेही त्यांनी स्पष्ट केले.
हिंदी सक्तीच्या जीआरबाबत बोलताना राज ठाकरे म्हणाले की, हिंदी सक्तीच्या बाबतील आताच्या सरकारने जीआर काढला होता. मागील सरकारने त्याचा अहवाल स्वीकारला होता, पण त्याचा जीआर काढला नव्हता, अंमलबजावणी केली नव्हती.
मनसेचे तीन दिवसीय शिबीर
मनसेने नेते आणि पदाधिकाऱ्यांसाठी विशेष शिबिराचे आयोजन केले असून, या शिबिराला आजपासून इगतपुरी येथे सुरुवात झाली आहे. हे शिबीर तीन दिवस चालणार असून मनसे अध्यक्ष राज ठाकरे स्वतः तीनही दिवस इगतपुरीत मुक्कामी राहून कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करणार आहेत. आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर या शिबिराला महत्त्व प्राप्त झाले आहे.
आधी निवडणुका लागू द्या, मग बघू
दरम्यान, आत्तापर्यंत आमची निवडणूक आम्ही एकट्याने लढवली आहे, त्यामुळे आताही वेळ आली तर एकटे निवडणूक लढवू, अशी सूचक प्रतिक्रिया मनसेचे नेते बाळा नांदगावकर यांनी दिली होती. यावर उद्धव ठाकरेंनीही भाष्य केले. यासंदर्भात बोलू नये, असे आदेश त्यांच्या पक्षप्रमुखाने दिले आहेत, असे म्हणत आधी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लागू द्या, मग बोलू, अशी प्रतिक्रिया उद्धव ठाकरेंनी दिली होती.
उद्धव ठाकरेंची टाळी, पण राज ठाकरेंचा सावध पवित्रा
दरम्यान, आम्ही एकत्र आलो आहोत ते एकत्र राहण्यासाठीच असे वक्तव्य खुद्द उद्धव ठाकरे यांनी केले. जे महाराष्ट्राच्या मनात आहे ते होईल असेही ते म्हणाले होते. युतीबाबत शिवसेना ठाकरे गटाने टाळी दिलेली असताना दुसरीकडे मात्र मनसे सावध पवित्रा घेत असल्याचे दिसून येत आहे. राज ठाकरेंच्या विधानानंतर ठाकरे बंधूंच्या युतीचा सस्पेन्स आता आणखी वाढला आहे.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App