भाजप मधल्या टॅलेंट ची सुप्रिया सुळेंना चिंता;; पण खुद्द त्यांच्या टॅलेंटचा त्यांच्याच पक्षाला उपयोग का होईना??, असा सवाल सुप्रिया सुळे यांच्या आजच्या वक्तव्यातून समोर आला.
पुण्यामध्ये पत्रकारांशी बोलताना सुप्रिया सुळे यांनी भाजप आणि काँग्रेस यांच्यातल्या टॅलेंट विषयी भाष्य केले काँग्रेसमध्ये टॅलेंट आहे हे भाजप नेत्यांनी मान्य केले म्हणूनच पुढे जिल्ह्यातल्या चार काँग्रेसच्या नेत्यांना त्यांनी आपल्याच घेतले भाजप मध्ये टॅलेंट आहे पण आपल्या पक्षातले डावलून भाजपचे नेते काँग्रेसच्या टॅलेंटला आपल्या पक्षात घेतात. भाजपवाले काँग्रेसमुक्त भारत करायला निघाले होते पण प्रत्यक्षात भाजपमध्येच काँग्रेसवाले आले असा टोमणा सुप्रिया सुळे यांनी मारला.
अर्थातच सुप्रिया सुळे यांच्या बारामती लोकसभा मतदारसंघातल्या काँग्रेस नेत्यांची त्यामुळे चर्चा ऐरणीवर आली. संग्राम थोपटे, संजय जगताप, राहुल कुल आणि प्रवीण माने हे कधीकाळी काँग्रेसमध्ये होते. त्यांचे आपल्याशी कौटुंबिक संबंध आजही आहेत, अशी मखलाशी सुप्रिया सुळे यांनी केली. पण त्यांच्या भाजप प्रवेशामुळे आपले नुकसान होईल की नाही याचा विचार करायचे कारण नाही कारण आपण व्यापार करत नाही राजकारण करतो, असेही मानभावी वक्तव्य सुप्रिया सुळे यांनी केले.
सुप्रिया सुळे यांच्या या वक्तव्यातून भाजप मधल्या टॅलेंट विषयी फार मोठी “चिंता” व्यक्त झाली. भाजपामध्ये टॅलेंट ठासून भरले असताना पक्षाचे नेते स्व पक्षातले टॅलेंट डावलतात, याविषयीची खंत उघड्यावर आली. पण खुद्द सुप्रिया सुळेंच्याच पक्षात त्यांच्या टॅलेंटची किती बूज राखली जाते??, आणि त्यांच्या टॅलेंटचा त्यांच्याच पक्षाला का उपयोग होईना??, याविषयी मात्र पत्रकारांनी प्रश्न न विचारल्याने त्याचे उत्तर द्यायची सुप्रिया सुळेंना गरज वाटली नाही. पण म्हणून सुप्रिया सुळे यांच्या टॅलेंटचा शरद पवारांच्या राष्ट्रवादीत का उपयोग होत नाही??, हा सवाल गैर महत्त्वाचा ठरत नाही.
वास्तविक सुप्रिया सुळेंच्या टॅलेंटचा उपयोग करून शरद पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेसची “राष्ट्रीय” पातळीवर किती तरी वाढ करायला हवी होती. काँग्रेस आणि भाजप सारख्या बलाढ्य पक्षांना “राष्ट्रीय” पातळीवर जबरदस्त आव्हान उभे करायला हवे होते. कारण सुप्रिया सुळे “स्थानिक” किंवा “प्रादेशिक” राजकारण करतच नाहीत. त्या देशाचे राजकारण करतात म्हणजेच “केंद्रीय” पातळीवरचे राजकारण करतात, असे खुद्द सुप्रिया सुळेंनी आणि शरद पवार यांनी अनेकदा सांगितलेय. त्यामुळे सुप्रिया सुळे यांचे टॅलेंट आणि त्याचे सगळे निकष हे “राष्ट्रीय_ असल्याने त्याच पातळीवर ते मोजले गेले पाहिजेत. मग सुप्रिया सुळेंच्या राष्ट्रीय टॅलेंटचा त्यांच्या पक्षाला उपयोग झाला का??, वेगवेगळ्या राष्ट्रीय मुद्द्यांवर सुप्रिया सुळेंनी घेतलेल्या भूमिकांचा प्रभाव पडला का आणि तो पडला असल्यास कसा आणि कुणी पाडून घेतला??, या सवालांची उत्तरे देणे भाग आहे.
सुप्रिया सुळे त्यांच्या खासदारकीच्या दोन टर्म विरोधी पक्षांमध्येच राहिल्या आणि तिसरी टर्म देखील विरोधी पक्षांमध्ये सुरू राहिली. त्यामुळे त्यांनी 370 कलम, भारतीय न्याय संहिता, वक्फ सुधारणा कायदा, कृषी कायदा सुधारणा वगैरे राष्ट्रीय महत्त्वाच्या मुद्द्यांवर कुठलीही भूमिका घेतली असती, तरी तिचा परिणाम सरकारवर होण्याची सुतराम शक्यता नव्हती. तसा तो झाला देखील नाही. वक्फ सुधारणा कायद्यावर तर सुप्रिया सुळेंनी लोकसभेत भाषणही केले नाही. आम्ही तरुण नेत्यांना संधी देतो, असे सांगून त्यांनी वक्फ सुधारणा कायदा विषयाचे विरोधातले भाषण खासदार निलेश लंकेच्या गळ्यात टाकले. त्यामुळे केंद्र सरकारने मांडलेल्या वेगवेगळ्या राष्ट्रीय महत्त्वाच्या कायद्यांवर सुप्रिया सुळे यांचे “राष्ट्रीय” कर्तृत्वच प्रकट झाले नाही.
– पवारांनी डावललेले टॅलेंट मोदींनी वापरले
सुप्रिया सुळे यांचे जे काही “राष्ट्रीय कर्तृत्व” प्रकट झाले, ते ऑपरेशन सिंदूर नंतरच्या वेगवेगळ्या देशांमध्ये शिष्टमंडळांमध्ये निवड झाल्यानंतरच. पण ही निवड काही शरद पवारांनी केली नाही, ती केली पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्यांच्या सरकारने. सुप्रिया सुळे यांना एका शिष्टमंडळाचे नेतृत्व देऊन त्यांनी परदेशांमध्ये पाठविले. तिथे भारताची भूमिका ठामपणे मांडायला सांगितले. तिथे सुप्रिया सुळेंचे टॅलेंट वापरात आले. पण ते शरद पवारांनी आपल्या पक्षाच्या वाढीसाठी वापरले नसून पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशाच्या प्रतिमा वर्धनासाठी वापरले. उलट शरद पवारांनी निवृत्ती मागे घेऊन सुप्रिया सुळे यांचे राजकीय टॅलेंट डावलले. त्यांना महाराष्ट्रात आणि देशात फिरून पक्ष संघटना वाढीची संधीच दिली नाही. अन्यथा शरद पवारांचा पक्ष कितीतरी मोठा वाढला असता. अगदी तो “राष्ट्रीय” पातळीवर जाऊन पोहोचला असता. सुप्रिया सुळे यांच्या झंझावाती दौऱ्याने काँग्रेस आणि भाजपच्या नेत्यांना पळता भुई थोडी झाली असती, पण शरद पवारांनी आपल्या कन्येचे “हे” राजकीय टॅलेंट वापरलेच नाही. आपण स्वतः खरंच निवृत्त होऊन सुप्रिया सुळेंना स्वतःचे टॅलेंट वापरायला संधीच दिली नाही. त्यांच्या उलट त्यांचे राजकीय टॅलेंट पंतप्रधान नरेंद्र मोदींनी वापरून दाखविले.
पण या महत्त्वाच्या विषयावर सुप्रिया सुळे कधी काही बोलल्या नाहीत. त्यांनी फक्त काँग्रेसमधल्या टॅलेंटची स्तुती करून भाजप मधल्या टॅलेंट विषयी चिंता व्यक्त केली. पण स्वतःचे टॅलेंट आणि त्याचा वापर किंवा न वापर याविषयी “स्वार्थत्यागी” सुप्रिया सुळेंनी कुठले भाष्य केले नाही.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App