मुंबई : शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी राजीनामा दिला आहे की नाही, याविषयी संभ्रम वाढला असून त्यांच्या राजीनाम्याच्या संदर्भात शरद पवारांच्या घरातूनच दोन परस्पर विरोधी वक्तव्ये समोर आली. जयंत पाटलांनी राजीनामा दिला ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या बदलाची सुरुवात आहे, असे वक्तव्य आमदार रोहित पवारांनी केले, तर जयंत पाटलांनी राजीनामा दिलेला नाही असे वक्तव्य खासदार सुप्रिया सुळे यांनी केले. त्यामुळे जयंत पाटलांच्या राजीनाम्यावर संभ्रम मिटण्याच्या ऐवजी तो आणखी वाढला.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष पदावर तब्बल सात वर्षे राहून जयंत पाटलांनी त्या पदाचा राजीनामा दिला, अशी बातमी दोन दिवस माध्यमांमधून फिरली. त्यावर सर्व पक्षांच्या वरिष्ठ नेत्यांनी प्रतिक्रिया व्यक्त केल्या. आमदार रोहित पवारांनी तर जयंत पाटलांचा राजीनामा ही पक्षातल्या बदलाची सुरुवात आहे. प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा दिला तरी जयंत पाटील पक्षातून पळून जाणार नाहीत, असे खोचक वक्तव्य केले. पण पक्षाचे राष्ट्रीय प्रवक्ते जितेंद्र आव्हाड यांनी खुलासा करून जयंत पाटलांनी राजीनामा दिला नसल्याचे सांगितले. त्यांची राजीनाम्याची बातमी पसरविणे हा खोडसाळपणा असल्याचा दावा जितेंद्र आव्हाड यांनी केला.
जयंत पाटलांनी राजीनामा दिल्यानंतर ते राष्ट्रवादीमध्ये टिकून राहतील, की त्यांचे पाय भाजपकडे वळतील, याविषयी देखील मोठा संभ्रम तयार झाला. राज्याचे मंत्री गिरीश महाजन यांनी जयंत पाटील माझ्या नेहमी संपर्कात असतात, असे वक्तव्य केले, तर जयंत पाटील आणि आम्ही सगळे 1990 च्या बॅचचे आहोत त्यामुळे आमचा नेहमीच एकमेकांशी संपर्क असतो पण आज आमचे विचार वेगवेगळ्या आहेत असा खुलासा अजित पवारांनी केला.
जयंत पाटलांनी राजीनामा दिल्याची बातमी आल्यानंतर त्यांच्या जागी शशिकांत शिंदे यांची निवड होईल, अशा बातम्याही समोर आल्या. त्यावर स्वतः शशिकांत शिंदे यांनी देखील अनुकूल प्रतिक्रिया व्यक्त केल्या. पण मूळात जयंत पाटलांनी राजीनामा दिला नसल्याचा खुलासा सुप्रिया सुळे यांनी केला.
या सगळ्या प्रकारामुळे शरद पवारांच्या उरल्या सुरल्या राष्ट्रवादीतला राजकीय गोंधळ सगळ्या महाराष्ट्राच्या समोर उघड्यावर आला. त्यातही खुद्द शरद पवारांच्या घरातल्या नेत्यांनी परस्परविरोधी वक्तव्ये केल्याने पवारांचा पक्ष एकसंध उरला नसल्याचे समोर आले.
राष्ट्रवादी काँग्रेसचे उद्या 15 जुलैला अधिवेशन आहे त्या अधिवेशनात जयंत पाटील खरंच राजीनामा देणार आणि त्यांच्या जागी शशिकांत शिंदे यांची निवड होणार की शरद पवार नेहमीप्रमाणे भाकरी फिरवताना कुठलीतरी वेगळीच भाकरी तव्यावर टाकणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App