विशेष प्रतिनिधी
मुंबई : आषाढी वारीसाठी वारकऱ्यांना सोईसुविधा मिळाव्यात यासाठी एसटी महामंडळाकडून अतिरिक्त बस सोडण्यात आल्या होत्या. या काळात एसटी महामंडळाला 35 कोटी 87 लाख 61 हजार रुपये उत्पन्न मिळाले आहे, अशी माहिती परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी दिली.
“आषाढी यात्रेनिमित्त अवघ्या महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या विठुरायाच्या दर्शनासाठी संपूर्ण महाराष्ट्रातून श्रीक्षेत्र पंढरपूर येथे मोठ्या संख्येने भाविक-प्रवाशी येत असतात. या भाविक-प्रवाशांना त्यांच्या गावापासून पंढरपूरपर्यंत ने-आण करण्यासाठी एसटीने तब्बल 5 हजार 200 जादा बसेस सोडल्या होत्या. 3 ते 10 जुलै दरम्यान या बसेसनी 21 हजार 499 फेऱ्या करून तब्बल 9 लाख 71 हजार 683 भाविक-प्रवाशांची सुरक्षित ने-आण केली आहे. यातून एसटी महामंडळाला 35 कोटी 87 लाख 61 हजार रुपये इतके उत्पन्न मिळाले आहे. जे मागील वर्षी मिळालेल्या उत्पन्नापेक्षा 6 कोटी 96 लाख 3 हजार रुपयांनी जास्त आहे,” असे सरनाईक म्हणाले.
आषाढी यात्रेनिमित्त 5 हजार 200 जादा बसेसच्या माध्यमातून एसटीने तब्बल 9 लाख 71 हजार 683 भाविक,प्रवाशांची सुरक्षित ने-आण करून त्यांना विठ्ठल दर्शन घडविले, असे सांगून सरनाईक म्हणाले, एवढे चांगले उत्पन्न आणून लाखो भाविकांना सुखरुप देवदर्शन घडवून आणणारे हजारो चालक, वाहक, यांत्रिकी कर्मचारी आणि त्यांना मार्गदर्शन करणारे पर्यवेक्षक, अधिकारी अभिनंदन पात्र आहेत.
आषाढी यात्रेच्या काळामध्ये पंढरपूरमध्ये येणाऱ्या एसटी कर्मचारी आणि अधिकाऱ्यांची जेवणाच्या अभावी गैरसोय होऊ नये म्हणून सरनाईक यांनी स्वखर्चातून 5,6 आणि 7 जुलै रोजी मोफत जेवण, चहा-नाश्त्याची सोय केली होती. याचा फायदा हजारो एसटी कर्मचाऱ्यांनी घेतला. याबद्दल सर्व एसटी कर्मचाऱ्यांनी सरनाईक यांचे आभार मानले आहेत.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App