विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : Ashwini Vaishnav देशातील पहिली बुलेट ट्रेन २०२७ पर्यंत धावणार असल्याची घोषणा रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी केली आहे. यासोबतच पुढील पाच वर्षांत १,००० नवीन रेल्वेगाड्या सुरू करण्याचा आराखडा केंद्र सरकारने आखला असून, ‘मेक इन इंडिया’ मोहिमेच्या माध्यमातून भारत रेल्वे उत्पादन क्षेत्रात जागतिक आघाडीवर पोहोचत आहे, असे त्यांनी सांगितले.Ashwini Vaishnav
अहमदाबाद-मुंबई मार्गावर भारत-जपान सहकार्याने उभारल्या जाणाऱ्या हाय-स्पीड बुलेट ट्रेन प्रकल्पाचे प्रोटोटाइप २०२६ मध्ये तयार होईल. त्यानंतर २०२७ मध्ये व्यावसायिक सेवा सुरू होईल, असे रेल्वेमंत्री वैष्णव यांनी सांगितले. आयआयटी मद्रास आणि आयआयटी रुडकी यांचे वैज्ञानिक या प्रकल्पात सक्रिय भूमिका बजावत असून, अनेक यांत्रिक सुटे भाग भारतात तयार होऊन काहींची निर्यातही सुरू झाली आहे
पुढील पाच वर्षांत देशभरात १००० नवीन रेल्वेगाड्या सुरू करण्याचे उद्दिष्ट रेल्वे मंत्रालयाने ठेवले आहे. विशेषतः ‘अमृत भारत एक्सप्रेस’ आणि ‘नमो भारत’सारख्या नव्या पिढीतील आधुनिक ट्रेन यामध्ये असतील. याशिवाय, २,००० जनरल डब्यांचा समावेश अलीकडील दोन वर्षांत करण्यात आला आहे. दरवर्षी भारतात ३०,००० वॅगन्स आणि १५०० इंजिन तयार केली जात असून, हे उत्पादन उत्तर अमेरिका आणि युरोपच्या एकत्रित क्षमतेपेक्षा अधिक आहे. ही कामगिरी ‘मेक इन इंडिया’च्या यशाचे प्रतीक असल्याचे रेल्वेमंत्री म्हणाले.
रेल्वेवरील एकूण भांडवली खर्च ₹२५,००० कोटींवरून वाढून ₹२.५२ लाख कोटींवर गेला आहे. शिवाय, ₹२०,००० कोटींची अतिरिक्त गुंतवणूक सार्वजनिक-खासगी भागीदारी (PPP) तत्त्वावर करण्यात येत आहे. गेल्या ११ वर्षांत ३५,००० किलोमीटर नवीन लोहमार्ग उभारण्यात आले असून, केवळ २०२४–२५ या एका वर्षात ५,३०० किलोमीटर नवीन ट्रॅक टाकण्यात आला आहे, असे त्यांनी सांगितले.
रेल्वेमार्गाने सध्या २९% मालवाहतूक होत असून, हे प्रमाण वाढवून ३५% पर्यंत नेण्याचे उद्दिष्ट सरकारने घेतले आहे. रस्त्यांपेक्षा रेल्वे ही अधिक स्वस्त आणि पर्यावरणपूरक वाहतूक प्रणाली असल्याचे वैष्णव यांनी स्पष्ट केले.
एकेकाळी दरवर्षी सरासरी १७० रेल्वे अपघात व्हायचे. ते प्रमाण आता ३० च्या खाली आले असून, ८०% अपघातांमध्ये घट झाल्याचे ते म्हणाले. ही रेल्वेच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने महत्त्वाची उपलब्धी मानली जात आहे.
रेल्वे तिकिटांचे दर पाकिस्तान आणि बांगलादेशपेक्षाही कमी असल्याचे त्यांनी ठामपणे सांगितले. ही सेवा सामान्य नागरिकांच्या आवाक्यात राहावी, यासाठी सबसिडीचा मोठा भाग केंद्र सरकारकडून दिला जातो, असे सांगून रेल्वेमंत्री वैष्णव यांनी स्पष्टपणे सांगितले की, भारतीय रेल्वेचे पूर्ण खाजगीकरण होणार नाही. मात्र, जपान व स्वित्झर्लंडसारखी व्यावसायिक आणि नीटसंघटित रेल्वे प्रणाली भारतात विकसित करण्याचा मानस आहे.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App