विशेष प्रतिनिधी
मुंबई : Sharad Pawar राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी सोमवारी महाराष्ट्राचे समाजकारण योग्य मार्गावर आणण्यासाठी प्रागतिक विचारांच्या लोकांना एकत्र येण्याचे आवाहन केले आहे. महाराष्ट्र जोतिबा फुले, राजर्षी शाहू महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचे राज्य आहे असे आपण म्हणतो, पण आज ज्यांच्या हाती महाराष्ट्राची सूत्रे आहेत त्यांना फुले, शाहू, आंबेडकरांविषयी किती आस्था आहे याबद्दलची शंका वाटावी असे चित्र आहे, असे ते म्हणालेत.Sharad Pawar
अलिबाग येथे शेतकरी कामगार पक्षाचे नेते जयंत पाटील यांचा आज 70 वा वाढदिवस साजरा करण्यात आला. यावेळी पीएनपी नाट्यगृहाच्या उद्घाटन सोहळ्याला मार्गदर्शन करताना शरद पवार यांनी उपरोक्त आवाहन केले.Sharad Pawar
शरद पवारांच्या भाषणातील ठळक मुद्दे…
शरद पवार म्हणाले, आज ह्याठिकाणी दोन कार्यक्रम आहेत. आज या ठिकाणी दोन कार्यक्रम आहेत एक जयंतरावांचा अभिष्टचिंतन सोहळा आणि दुसरा ज्या नाट्यक्षेत्राच्या संबंधी त्यांना आस्था आहे त्या नाट्यगृहाचा उद्घाटन सोहळा. मला आठवतंय, एक बातमी माझ्या वाचनात आली की इथल्या नाट्यगृहाला आग लागली. तेव्हा मी तातडीनं जयंतरावांना संपर्क साधला होता. कसं झालं? आता पुढे काय करणार ? आणि त्याबद्दल जयंतरावांना मध्यंतरी खूप अस्वस्थता होती पण आज ती दूर झालेली आहे.Sharad Pawar
इथली संस्कृती इथला परिसर वैशिष्ट्यपूर्ण आहे. आपल्याला बुद्ध लेणी आणि शिलालेख याचं दर्शन आपल्याला या भागामध्ये होतं. अनेक ऐतिहासिक गोष्टी या भागात घडल्या आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांनी रायगडावर राज्य स्थापन केलं तो हाच परिसर. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी चवदार तळ्याचा सत्याग्रह केला तोही हाच परिसर. शेजारच्या खंदेरी बेटावर मायनाक भंडारी यांनी नौदलाच्या तळावर इंग्रजांचा पराभव केला तोही हाच परिसर. आज या ठिकाणी कान्होजी आंग्रे यांचे वंशज आहेत सरखेल कान्होजी आंग्रे यांनी याच भूमीतून भव्य आरमार उभं केलं आणि पोर्तुगीज व इंग्रजांना शह दिला आणि म्हणून हा सगळा भाग एक प्रकारे ऐतिहासिक भाग आहे. रायगड, अलिबाग, नागाव, चौल, रेवदंडा हे सगळे परिसर ऐतिहासिकदृष्ट्या विशेषतः कोळी संस्कृतीने समृद्ध झालेले आहेत. नागाव एकेकाळी विद्येचं माहेर म्हणून ओळखलं जात होतं म्हणून अनेक गोष्टी इथल्या सांगण्यासारख्या आहेत.
माझ्या घरात सगळे शेकापचे, मी एकटा काँग्रेसचा
माझ्या घरात माझी आई शेकापची, माझे भाऊ वसंतराव पवार हे शेकापचे जे लोकसभेचे उमेदवार होते, सगळं कुटुंब हे शेकापचं. मी एकटा काँग्रेसवाला. पण आमच्या आईचं म्हणणं होतं तुझी विचारधारा तू तुझ्या पद्धतीने चालव आम्ही सगळे जी विचारधारा मानतोय ते आम्ही आमच्या रस्त्याने जाणार. ‘शेतकरी कामगार पक्ष’ मी लहानपणापासून माझ्या घरात पाहिलेला आहे. माझ्या घरामध्ये भाऊसाहेब राऊत येत, कधी केशवराव जेधे आलेले आहेत, कधी शंकरराव मोरे आलेले आहेत, कधी नाना पाटील आलेले आहेत, आधी उद्धवराव, एनडी पाटील हे लोक आलेले आहेत. हे मी कुटुंबात अनेक वर्षापासून पाहिलेलं आहे आणि या नेतृत्वांचं वैशिष्ट्य होतं की हे सगळे लोक एका विचाराने, एका तत्वाने आपल्या भूमिकेशी आयुष्यभर प्रामाणिक राहिलेले लोक आहेत. सरकार, सत्ता असो वा नसो याचा विचार त्यांनी कधी केलेला नाही आणि आपल्या विचारांची भूमिका स्पष्ट करत त्यांनी आयुष्यभर कष्ट केले. जो कष्टकरी वर्ग आहे त्याच्या हिताची जपणूक त्यांनी केली. आज पुन्हा एकदा चिकाटीने हा विचार पुढे न्यायचा विचार जयंतराव करतात याचा मला मनापासून आनंद आहे.
महाराष्ट्राला योग्य मार्गावर आणण्याची गरज
माझी खात्री आहे त्यांच्या कष्टाला तुम्हा सगळ्यांची साथ मिळेल. मी त्यांना एवढेच सांगतो की महाराष्ट्राचं चित्र बदलायचं आहे. महाराष्ट्र जोतिबा फुले, राजर्षी शाहू महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा राज्य आहे असं आपण म्हणतो पण आज ज्यांच्या हाती महाराष्ट्राची सूत्रं आहेत त्यांना जोतिबा फुले यांच्याबद्दल, शाहू महाराजांच्या संदर्भात, बाबासाहेब आंबेडकरांबाबत अंत:करणापासून किती आस्था आहे याबद्दलची शंका वाटावी अशा प्रकारचं चित्र आहे. सामाजिकदृष्ट्या महाराष्ट्राचं समाजकारण योग्य मार्गावर पुनर्स्थापित करायचं असेल तर प्रागतिक विचाराच्या लोकांना बाकीचे मतभेद सोडून एकत्र यावं लागेल आणि आम्हा लोकांची भूमिका हीच राहील की काहीही झालं तरी महाराष्ट्रामध्ये पुन्हा एकदा खऱ्या अर्थाने फुले-शाहू-आंबेडकर यांच्या विचारांना शक्ती द्यायची आणि त्यासाठी काँग्रेस पक्ष असेल, शेतकरी कामगार पक्ष असेल, डावे पक्ष असतील, राष्ट्रवादी पक्ष असेल, रिपब्लिकन पक्ष असतील या सगळ्यांना संघटित करून एकत्रित एकमेकांना सहकार्य करून पुन्हा एकदा महाराष्ट्राचा सामाजिक आणि राजकीय स्तर बदलण्याची भूमिका घेऊन आपल्याला काम करावं लागेल आणि तो विचार आम्ही लोकांनी मनापासून ठेवलेला आहे. त्यासाठी जी काही ठिकाणं महाराष्ट्रात अत्यंत महत्त्वाची आहेत त्यामध्ये रायगडकडे दुर्लक्ष करून चालणार नाही.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App