नाशिक : ठाकरे बंधूंची दोन राष्ट्रीय पक्षांना टिचकी; पवारांच्या राष्ट्रवादी सकट छोटे प्रादेशिक पक्ष घेतले पंखाखाली!!, हे 5 जुलै 2025 च्या ठाकरे बंधूंच्या मेळाव्याचे वैशिष्ट्ये ठरले. मराठी अस्मिता आणि हिंदी सक्तीला विरोध करून ठाकरे बंधूंनी दोन्ही राष्ट्रीय पक्षांची राजकीय पंचाईत केली. कारण मराठी अस्मितेचा मुद्दा मर्यादेपलीकडे जाऊन उचलून धरणे भाजप आणि काँग्रेस यांना शक्य नाही, हे ठाकरे बंधूंनी जाणले. त्यामुळे सत्ताधारी भाजपला प्रखर विरोध करताना काँग्रेसचे जड झालेले ओझे देखील टाकून दिले. काँग्रेस ऐवजी त्यांनी शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस, शेतकरी कामगार पक्ष, महादेव जानकर यांचा राष्ट्रीय समाज पक्ष आणि कम्युनिस्ट पक्ष या छोट्या प्रादेशिक पक्षांना जवळ घेतले. Thackeray Brothers
म्हणूनच ठाकरे बंधूंच्या ऐक्याच्या मेळाव्यात त्यांनी सुप्रिया सुळे, जितेंद्र आव्हाड, शेतकरी कामगार पक्षाचे जयंत पाटील, महादेव जानकर, कम्युनिस्ट पक्षाचे दोन नेते कॉम्रेड प्रकाश रेड्डी आणि कॉम्रेड अजित नवले यांना जवळ केले. त्यांना विशिष्ट महत्त्व देऊन खाली पहिल्या रांगेत बसविले. नंतर व्यासपीठावर बोलाविले. काँग्रेसचे माजी खासदार भालचंद्र मुणगेकर हे देखील मेळाव्याला हजर होते त्यांनाही सन्मानाने व्यासपीठावर बोलावले गेले, पण ते काँग्रेसचे नेते म्हणून तिथे आले नव्हते.
सुप्रिया सुळेंसकट बाकीचे नेते पंखाखाली
शरद पवार आणि काँग्रेसचे पहिले फळीतले नेते मेळाव्याला आले नव्हते. कारण सगळा “फोकस” ठाकरे बंधूंच्या वरच होता. या “फोकस” मध्ये आपल्याला पहिल्या दर्जाचे महत्त्व मिळणार नाही. व्यासपीठावर जागा असणार नाही हे लक्षात घेऊन पवार आणि काँग्रेसच्या नेत्यांनी मेळाव्यापासून अंतर राखणे पसंत केले. ठाकरे बंधूंनी उचललेला मुद्दा सत्ताधारी म्हणून भाजपला टोचणारा होता, तसाच तो राष्ट्रीय पक्ष म्हणून काँग्रेससाठी देखील अडचणीचा होता त्यामुळे काँग्रेसचे नेते मेळाव्याकडे फिरकले नव्हते. पण सुप्रिया सुळे यांच्या बाबतीत त हा मुद्दा उपस्थितच व्हायचे कारण नव्हते. कारण ना त्या राष्ट्रीय पातळीवरच्या नेते आहेत, ना त्यांच्या उपप्रादेशिक पक्षाच्या पहिल्या फळीतल्या नेत्या आहेत. त्या पवारांच्या सावलीतून अजून बाहेरच आलेल्या नाहीत. त्या अजून स्वतंत्र वाटचाल सुरू करू शकलेल्या नाहीत. त्यामुळे ठाकरे बंधूंच्या समोर दुय्यम भूमिकेत का होईना, पण लाईम लाईट मध्ये राहणे यामध्ये त्यांना फारसे कमीपणाचे वाटले नाही.
शेतकरी कामगार पक्ष आणि कम्युनिस्ट पक्ष त्याचबरोबर राष्ट्रीय समाज पक्ष यांचे महाराष्ट्रातले राजकीय स्थानच मुळात तिसऱ्या – चौथ्या दर्जाचे उरलेय. ठाकरे बंधूंनी त्या पक्षांच्या नेत्यांना आपल्या जवळ घेतले हेच त्यांच्यासाठी फार मोठे ठरले. ठाकरे बंधूंच्या निमित्ताने मुंबईत वरळी डोम मध्ये त्यांना झळकता आले. कम्युनिस्ट पक्ष आणि शेतकरी कामगार पक्ष हे आजही महाराष्ट्रात अस्तित्वात आहेत हे यानिमित्ताने जनतेसमोर दाखविता आले.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App