नारायण राणेंचा हल्लाबोल- ठाकरे बंधूंची स्वतःच्या अस्तित्वासाठी धडपड; त्यांनी एकमेकांना मिठ्या माराव्यात

विशेष प्रतिनिधी

मुंबई : भाजप खासदार तथा माजी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी गुरुवारी पुन्हा एकदा ठाकरे बंधूंच्या मनोमिलनावर टीका केली. राज व उद्धव ठाकरे हे दोघे बंधू स्वतःच्या स्वार्थासाठी एकत्र येत आहेत. या दोघांचीही सध्या स्वतःचे अस्तित्व टिकवण्यासाठी धडपड सुरू आहे, असे ते म्हणालेत. राज व उद्धव ठाकरे एकत्र आल्याने भाजपला काहीही फरक पडणार नाही, असा दावाही त्यांनी यावेळी केला.

मनसे अध्यक्ष राज ठाकरे व शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख यांनी मराठीच्या मुद्यावरून एकत्र येण्याची घोषणा केली आहे. त्यांचा पहिला संयुक्त मेळावा 5 जुलै रोजी मुंबईत होणार आहे. या पार्श्वभूमीवर नारायण राणे यांनी गुरूवारी पत्रकारांशी संवाद साधताना त्यांच्यावर निशाणा साधला आहे. ते म्हणाले, राज व उद्धव ठाकरे स्वतःचे अस्तित्व टिकवण्यासाठी धडपडत आहेत. ते सध्या स्वतःचा स्वार्थ साधण्यासाठी एकत्र येत आहेत. हे दोन भाऊ एकत्र येणार असतील तर त्याचा एवढा गवगवा करण्याची गरज नाही.

त्यांनी एकमेकांना घरी बोलवावे, एकत्र जेवावे, एकमेकांना मिठ्या माराव्यात. पण त्यांनी आम्ही मराठीसाठी एकत्र येत आहोत असे भासवण्याचा प्रयत्न करू नये. या दोघांनी आतापर्यंत मराठीसाठी मराठी तरुणांच्या नोकरी व रोजगारासाठी काय केले? हिंदी भाषा लादण्याच्या निर्णयावर कुणाची स्वाक्षरी आहे? उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री असताना हा निर्णय रद्द का केला नाही? असा सवाल नारायण राणे यांनी यावेळी ठाकरे बंधूंवर निशाणा साधताना केला.



मुंबईत किती टक्के मराठी माणूस राहिला?

ते पुढे म्हणाले, कौटुंबिक वाद चव्हाट्यावर आणणे योग्य नाही. राज ठाकरे यांनीच त्यावर बोलावे. पण उद्धव ठाकरेंनी त्यांना शिवसेनेत राणे अवघड केले होते हे सत्य आहे. राज यांचा एकही निर्णय तेव्हा मान्य केला जात नव्हता. उद्धव यांच्यासोबत आज कुणीही नाही. दोन भाऊ एकत्र येण्याचा आनंद आहे. पण आज किती टक्के मराठी माणूस मुंबईत राहिला आहे? याला जबाबदार कोण? हे सोयीचे, फायद्याचे व कुटुंबाच्या स्वार्थाचे राजकारण आहे.

ठाकरे एकत्र आल्याने भाजपला फरक पडणार नाही

राज व उद्धव ठाकरे एकत्र आल्याने भाजपला काहीही फरक पडणार नाही. आम्ही मराठी नाही का? आम्ही त्यांच्याहून जास्त मराठी माणसांसाठी काम केले आहे. मला उद्धव ठाकरे यांचा एकही चांगला गुण माहिती नाही. पण राज ठाकरे यांचा स्वभाव रोखठोक आहे. उद्धव ठाकरेंनी अडीच वर्षांत सत्ता व हिंदुत्व दोन्ही गमावले. आत्ता राज ठाकरे चुकत आहेत किंवा नाही हा माझा प्रश्न नाही. पण त्यांच्या हाती काहीही लागणार नाही, असे ते म्हणाले.

दिशा सालियन प्रकरणावरही केले भाष्य

नारायण राणे यांनी यावेळी दिशा सालियन प्रकरणावरही भाष्य केले. ते म्हणाले, माझी दिशा सालियन प्रकरणावर बारीक नजर आहे. एसआयटीने दिलेला रिपोर्ट खराच असेल असे नाही. अनेक पोलिस रिपोर्ट खोटे असतात. पोलिसांचा रिपोर्ट काहीही असला तरी माझा त्यावर विश्वास नाही. कोर्ट अंतिम निर्णय देत नाही तोपर्यंत मी त्यावर विश्वास ठेवणार नाही, असे ते म्हणाले.

Narayan Rane: Thackeray Brothers’ Reunion is for Self-Preservation

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात