विशेष प्रतिनिधी
कोलकाता : West Bengal पश्चिम बंगालमधील राजकारण पुन्हा एकदा पेटले आहे. मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या कारभारावर प्रश्न उपस्थित करणाऱ्या लंडनस्थित डॉक्टर राजतशुभ्र बंधोपाध्याय यांना भेटायला गेलेल्या भाजप प्रदेशाध्यक्ष आणि केंद्रीय मंत्री सुकांत मजुमदार यांना कोलकाता पोलिसांनी अटक केल्याने खळबळ उडाली आहे. या घटनेने केंद्र-राज्य संघर्षाचे नवे पर्व सुरू झाले असून भाजपने राज्य सरकारवर “गुंडशाही”चा आरोप करत थेट हल्ला चढवला आहे.West Bengal
ही घटना कोलकात्याच्या हरिश मुखर्जी रोडवरील डॉ. बंधोपाध्याय यांच्या निवासस्थानी घडली. केंद्रीय मंत्री सुकांत मजुमदार यांचा ताफा त्या ठिकाणी पोहोचल्यावर पोलिसांनी त्यांना अडवले आणि सांगितले की डॉक्टर घरी नाहीत. मात्र भाजपच्या म्हणण्यानुसार, डॉक्टर घरी होते आणि स्वतः मजुमदार यांची वाट पाहत होते. थोड्याच वेळात डॉक्टर स्वतः घराबाहेर आले आणि दोघांची भेट झाली. पण अचानक, पोलीस पुढे सरसावत त्यांनी दोघांनाही ताब्यात घेतले.
राजतशुभ्र बंधोपाध्याय हे ब्रिटिश नागरिक असून मूळ बंगाली आहेत. काही महिन्यांपूर्वी ऑक्सफर्डमधील ‘केलॉग कॉलेज लेक्चर’मध्ये त्यांनी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना थेट विचारले होते, “तुमच्या सत्ताकाळात बंगालमध्ये कोणती मोठी औद्योगिक गुंतवणूक झाली आहे का?” या प्रश्नावर गोंधळ उडाला होता आणि सुरक्षा यंत्रणेला हस्तक्षेप करावा लागला होता. या प्रसंगानंतर डॉक्टर बंधोपाध्याय सोशल मीडियावर चर्चेत आले होते.
ताज्या घटनेनंतर पत्रकारांशी बोलताना डॉ. बंधोपाध्याय म्हणाले, “मी ब्रिटिश नागरिक असूनही मला गुन्हेगारासारखी वागणूक दिली गेली. मी केवळ एक केंद्रीय मंत्र्याला भेटलो, हे काय गुन्हा आहे? अटक का केली याचं उत्तर पोलिसांनी द्यावं.”
केंद्रीय मंत्री सुकांत मजुमदार यांनी पोलिस व्हॅनमध्ये चढताना म्हटलं, “आम्ही गुन्हा केला तरी काय? एका डॉक्टरला भेटण्यासाठी गेलो होतो. पोलिसांनी कोणतीही नोटीस न देता आम्हाला जबरदस्तीने उचललं. हे लोकशाही आहे का?”
भाजपचे नेते सौरव सिकदर यांनी यावर संतप्त प्रतिक्रिया देताना म्हटलं, “ही म्हणजे स्पष्ट राज्य प्रायोजित गुंडशाही आहे. राज्य सरकार पोलिस यंत्रणेला आपल्या राजकीय विरोधकांवर हत्यार म्हणून वापरत आहे.”
दुसरीकडे, तृणमूल काँग्रेसने ही कारवाई योग्य असल्याचे सांगितले. पक्षाचे प्रवक्ते कुणाल घोष म्हणाले, “भाजप राज्यात जाणीवपूर्वक अस्थिरता पसरवण्याचा प्रयत्न करत आहे. संबंधित डॉक्टरने यापूर्वीही अनेक वादग्रस्त विधाने केली आहेत. पोलिसांनी केवळ कायद्यानुसारच कारवाई केली आहे.”
या घटनेमुळे पश्चिम बंगालचे राजकीय वातावरण अधिकच तापले असून, भाजपने यास “लोकशाहीची गळचेपी” असे संबोधून व्यापक आंदोलन छेडण्याचे संकेत दिले आहेत. राज्यभरात पक्षाच्या कार्यकर्त्यांकडून निदर्शने आणि सोशल मीडियावरून ममता सरकारविरोधात तीव्र टीका केली जात आहे.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App