मान्सूनसाठी समन्वय व आपत्तीपूर्व नियोजनावर भर देण्याचे मुख्यमंत्री फडणवीसांचे निर्देश
विशेष प्रतिनिधी
मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालय, मुंबई येथे ‘मान्सून पूर्व तयारी’ संदर्भात आढावा बैठक संपन्न झाली. लष्कर, नौदल, हवाई दल, कोस्टगार्ड, एनडीआरएफ, एसडीआरएफ, महानगरपालिका, रेल्वे, पोलीस यांसह सर्व संबंधित यंत्रणांनी संगणकीय सादरीकरणाच्या माध्यमातून आपल्या तयारीची माहिती मुख्यमंत्री यांच्यासमोर मांडली. यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले.
मान्सूनकाळात लष्कराच्या 38 तुकड्या तैनात राहणार असून, चेतक आणि नौदलाचे हेलिकॉप्टर्स सज्ज असतील. नौदल आणि बीएमसी यांच्यातील थेट संवादासाठी हॉटलाईन उभारण्यात आली असून, हवाई दलाकडून मदतीसाठी पूर्ण सज्जता असल्याची माहिती मुख्यमंत्री फडणवीस यांना देण्यात आली. आपत्ती निवारण ही केवळ प्रशासनाची नव्हे, तर सर्वांची सामूहिक जबाबदारी आहे. मान्सूनच्या काळात एखादी आपत्ती उद्भवली तर तत्काळ प्रतिसाद देणे आवश्यक आहे. या पार्श्वभूमीवर सर्व यंत्रणांनी 24 तास कार्यरत राहावे, शनिवारी-रविवारीही दक्षतेत कसूर होता कामा नये, असे स्पष्ट निर्देश यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिले.
यावर्षी पश्चिम महाराष्ट्रात सरासरीपेक्षा अधिक म्हणजे 110 ते 119 टक्के पावसाचा अंदाज आहे. त्यामुळे सांगली, कोल्हापूरसारख्या भागांनी विशेष तयारी ठेवावी. सर्व महानगरपालिकांनी फ्लॅश फ्लडसारख्या संकटांचा सामना करण्यासाठी आराखडे तयार करावेत. तसेच राज्यातील दरडप्रवण भागांचे नव्याने मॅपिंग करणे अत्यावश्यक आहे. दरड कोसळणे, पूर येणे यामुळे संपर्क तुटणाऱ्या भागांत आगाऊ रेशन साठा पोहचवावा तसेच मुंबईत 249 दरडप्रवण ठिकाणे ओळखण्यात आली असून, याठिकाणी तातडीने सुरक्षा उपाययोजना करण्याचे निर्देश मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिले.
मुख्यमंत्री फडणवीस पुढे म्हणाले की, गर्भवती महिलांना अशा भागांमधून सुरक्षित स्थळी हलवण्याची व्यवस्था केली जावी. जलसंपदा विभागाने धरणातील विसर्गासाठी आंतरराज्य समन्वय ठेवावा. तसेच आपत्ती काळात मदतीसाठी लागणारे साहित्य, साधनसामग्री याचे मॉकड्रिल घ्यावे. विद्युत विभागाने आपली यंत्रणा तपासून कार्यक्षम ठेवावी. हवाई दलासाठी राज्यातील आपत्तीप्रवण भागांचे अद्ययावत नकाशे उपलब्ध करून द्यावेत. महानगरपालिकांनी रस्त्यावरील अडथळे व मेट्रो, पाइपलाइनसारख्या कामांचे उर्वरित बांधकाम पावसाळ्यापूर्वी पूर्ण करावे. पश्चिम द्रुतगती मार्गावर पाणी साचणाऱ्या ठिकाणी विशेष दक्षता घेण्याचेही, निर्देश यावेळी संबंधीतांना देण्यात आले.
यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, मंत्री गिरीष महाजन, मंत्री मकरंद पाटील, राज्यमंत्री आशिष जयस्वाल व संबंधित विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App