नाशिक : उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या राष्ट्रवादीतला नव्या पिढीतला “शोध” “थकला”; तो छगन भुजबळ यांच्यापाशीच येऊन थांबला!!, असे म्हणायची वेळ छगन भुजबळांच्या मंत्रिमंडळातल्या समावेशाने आणली.
2024 च्या डिसेंबर मध्ये फडणवीस मंत्रिमंडळाच्या विस्तारावेळी अजित पवारांनी मोठे राजकीय “धाडस” करून छगन भुजबळ यांना मंत्रिमंडळातून दूर ठेवले होते. भुजबळांचे वय 77 आहे. त्यामुळे आता नव्या पिढीतला नेता शोधून त्याला राजकीय दृष्ट्या वाढविले पाहिजे, असे मत त्यांच्या राष्ट्रवादीतून समोर आले होते.
भाजप जसा आपल्या नेत्यांना वेगवेगळ्या प्रकारच्या कामाच्या संधी देऊन तरुण नेतृत्व विकसित करतो, तसेच आता अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये करणार. अजित पवार राष्ट्रवादीत वेगवेगळे राजकीय प्रयोग करून वेगवेगळ्या नेत्यांना वेगवेगळ्या कामांची संधी देणार,श असा भास त्यावेळी निर्माण करण्यात आला होता.
परंतु प्रत्यक्षात अजितदादांचा तो प्रयोग छगन भुजबळ यांना मंत्रीपदापासून दूर ठेवण्यापर्यंतच मर्यादित राहिला. छगन भुजबळ यांच्या ऐवजी दुसरा कुठलाही तरुण ओबीसी नेता त्यावेळी त्यांनी मंत्री केला नव्हता. अजित पवारांनी ओबीसी चेहरा म्हणून धनंजय मुंडे यांनाच पुढे केले, पण फडणवीस मंत्रिमंडळ स्थापन होऊन सहा महिने होण्याच्या आतच संतोष देशमुख प्रकरणात धनंजय मुंडे यांची राजकीय विकेट पडली. राजकीय आणि सामाजिक दबावापोटी धनंजय मुंडे यांचा राजीनामा घेणे अजित पवारांना भाग पडले. त्यामुळे अजित पवारांची ओबीसी विरोधी नेता म्हणून प्रतिमा ठळक झाली होती.
या पार्श्वभूमीवर अजित पवारांनी कुठला नवीन प्रयोग करून राष्ट्रवादीतल्याच कुठल्या तरुण ओबीसी नेत्याला मंत्रीपदी नेऊन बसवायला हवे होते, असे राष्ट्रवादीतल्याच अनेकांचे मत होते. पण शेवटी अजितदादा कितीही धडाडीचे नेते असले, तरी ते “पवार” आहेत, त्यामुळे त्यांच्या कुठल्याही राजकीय प्रयोगाला अंगभूत मर्यादा येणे स्वाभाविक होते. फडणवीसांच्या मंत्रिमंडळात भुजबळांच्या समावेशाने अजितदादांच्या या राजकीय प्रयोगाच्या मर्यादा उघड्या पडल्या. त्यांची राष्ट्रवादी भुजबळांपेक्षा कुठला दुसरा तरुण ओबीसी नेता मंत्री पदासाठी पुढे करू शकली नाही. छगन भुजबळ यांनाच मंत्रिपदी बसविणे त्यांना भाग पडले.
आता त्यात खुद्द अजितदादांचा निर्णय महत्त्वाचा ठरला, की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यशस्वी खेळी करून भुजबळांना मंत्री करण्यासाठी अजितदादांना भाग पाडले राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरला, पण काही झाले तरी अजितदादांच्या राजकीय नेतृत्वाची मर्यादा या निमित्ताने ठळकपणे समोर आली. काका – पुतणे कितीही मोठे नेते असले आणि त्यांच्या नावावर अनेक “राजकीय प्रयोग” त्यांच्या समर्थकांनी खपविले असले, तरी ते “पवार” आहेत त्यामुळे त्यांच्या प्रयोगाला अंगभूत मर्यादा येणार ही राजकीय दृष्ट्या सिद्ध गोष्ट आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App