शासन-प्रशासन समजून घेण्यासाठी समित्यांपेक्षा उत्तम प्रकारची व्यवस्था नाही, असंही फडणवीसांनी सांगितलं
विशेष प्रतिनिधी
मुंबई : Chief Minister Fadnavis मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत विधान भवन, मुंबई येथे ‘सन 2024-25 वर्षासाठीच्या महाराष्ट्र विधानमंडळाच्या सर्व समित्यांचे एकत्रित उदघाटन’ संपन्न झाले. यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी उपस्थितांना संबोधित केले.Chief Minister Fadnavis
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, उदघाटन केलेल्या समित्यांचे कामकाज लवकरच सुरू करण्यात येईल. विधानमंडळाचे कामकाज हे खर्या अर्थाने विधानसभेच्या किंवा परिषदेच्या सभागृहात नाही तर या समित्यांमध्ये चालते. सभागृहात बोलत असताना वेळेचे आणि विषयाचे बंधन असते, त्यामुळे एखाद्या विषयावर अतिशय सखोल अशी चर्चा आणि मंथन करून त्याची दिशा ठरवणे शक्य होत नाही. म्हणूनच संसदीय लोकशाहीमध्ये समित्यांची पद्धत सुरू झाली, असे मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यावेळी म्हणाले की, या समित्या जेव्हा कामकाज करतात तेव्हा त्यांना विधानसभा किंवा विधानपरिषदेचा दर्जा असतो, ज्या माध्यमातून या समित्यांना विशेष अधिकार प्राप्त आहेत. त्यांच्या अहवालावर विभागाला कारवाई करावी लागते, हे अहवाल विधिमंडळात प्रस्तुत होतात. म्हणूनच प्रत्येक समिती विधानमंडळाचे सूक्ष्म रूप आहे. शासन-प्रशासन समजून घेण्यासाठी समित्यांपेक्षा उत्तम प्रकारची व्यवस्था नाही. यासोबतच प्रत्येक समितीची आपली भूमिका आहे, कोणतीही समिती लहान किंवा मोठी नाही, असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, लोकलेखा समिती महत्वाची मानली जाते, ही समिती ‘सीएजी’च्या निरीक्षणावर संबंधित विभागाच्या सचिवांना बोलावून जाब विचारते. अंदाज समिती प्रत्येक विभागाने केलेल्या मागण्या आणि त्यांनी केलेला खर्च याचा लेखाजोखा ठेवते व त्यावर प्रश्न विचारते. पंचायत राज समिती पंचायत राज संस्थांवर लक्ष ठेवते. यासोबतच विनंती अर्ज समितीमार्फत मोठे परिवर्तन घडवणे शक्य असून, या सर्व समित्या म्हणजे ‘प्रशासनावरील अंकुश’ असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी नमूद केले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, मध्यंतरीच्या काळात समित्यांचे अध्यक्ष आणि सदस्यांनी आपल्या अधिकारांचा दुरुपयोग केल्याने या समित्या बरखास्त करण्याची मागणी होऊ लागली होती. तेव्हा सर्वांनी एकत्रितपणे या समित्यांना योग्य समज देऊन त्यांचे काम सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला. सरकारवर अंकुश ठेवत सामान्य माणसाला दिलासा देण्यासाठी या समित्या असतात, त्यामुळे यांचा दुरुपयोग होणार नाही याची काळजी घेणे गरजेचे आहे.
यावेळी विधानपरिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, विधान परिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे, विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे, मंत्री ॲड. आशिष जयस्वाल आणि समितीचे इतर सदस्य उपस्थित होते.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App