विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : Shashi Tharoor पाकिस्तानप्रेरित दहशतवादाचा जगभरात पर्दाफाश करण्यासाठी केंद्र सरकारने जाहीर केलेल्या सर्वपक्षीय शिष्टमंडळात काँग्रेसचे खासदार शशी थरूर यांची नियुक्ती झाल्यानंतर काँग्रेसमध्येच वादाची ठिणगी पडली आहे. महत्वाच्या राष्ट्रीय मुद्यावरही काँग्रेसने राजकारण सुरू केले आहे.Shashi Tharoor
सर्वपक्षीय शिष्टमंडळ आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर भाजपची बाजू मांडणार आहे. शशी थरूर यांचा परराष्ट्र धोरणातील अनुभव आणि जागतिक पातळीवर असलेली प्रतिष्ठा पाहता केंद्र सरकारच्या सर्वपक्षीय शिष्टमंडळात ही निवड पूर्णपणे योग्य आणि राष्ट्रहितासाठी फायदेशीर ठरू शकते.
थरूर हे संयुक्त राष्ट्रसंघात तब्बल 29 वर्षे वरिष्ठ पदांवर कार्यरत होते. त्यांनी युनोचे सार्वजनिक माहिती विभागप्रमुख आणि महासचिव कोफी अन्नान यांचे विशेष सल्लागार म्हणून काम पाहिले आहे. 2006 साली संयुक्त राष्ट्रसंघ महासचिवपदासाठी त्यांचे नावही आघाडीवर होते. त्यांची जागतिक पातळीवरील ओळख, अभ्यासपूर्ण भाषाशैली, प्रभावी संवादकौशल्य आणि धोरणात्मक स्पष्टता ही शिष्टमंडळासाठी अमूल्य ठरणारी शिदोरी आहे.
‘ऑपरेशन सिंदूर’नंतर पाकिस्तानच्या दहशतवादी कारवायांविरोधात भारताची भूमिका जगभर मांडण्याचे काम या शिष्टमंडळाच्या माध्यमातून होणार आहे. अशावेळी जगभरातील मुत्सद्दी वर्तुळात ज्यांचं नाव सन्मानाने घेतलं जातं, अशा शशी थरूर यांची उपस्थिती भारताची बाजू अधिक प्रभावीपणे मांडण्यास हातभार लावणार आहे.
तसेच थरूर हे सातत्याने संसदेतील परराष्ट्रविषयक चर्चांमध्ये सक्रिय राहिले आहेत. त्यांनी चीन, पाकिस्तान, युक्रेन युद्ध, युएन शांतता प्रक्रिया यांसारख्या विषयांवर अनेकदा अभ्यासपूर्ण भूमिका मांडली आहे.
त्यामुळे, शिष्टमंडळात थरूर यांची निवड ही केवळ योग्यच नव्हे, तर धोरणात्मक दृष्टिकोनातून दूरदृष्टीपूर्ण निर्णय ठरतो. पक्षीय राजकारणापेक्षा राष्ट्रहित मोठं मानून अशा पात्र नेत्यांची निवड होणं ही आजच्या काळात गरजेची बाब आहे.
मात्र काँग्रेसने अधिकृतपणे पाठवलेल्या चार खासदारांच्या यादीत थरूर यांचे नावच नव्हते, तरीही केंद्राने थेट त्यांची निवड केल्याने पक्षाने तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. काँग्रेसचे वरिष्ठ नेते आणि सरचिटणीस जयराम रमेश यांनी सरकारच्या निर्णयावर टीका करत म्हटले की, “काँग्रेसने आनंद शर्मा, गौरव गोगोई, सय्यद नासिर हुसेन आणि राजा बरार ही चार नावे पाठवली होती. मात्र, यादीत नसलेल्या शशी थरूर यांचे नाव सरकारने अचानकपणे जाहीर करणे हे केवळ खोडसाळपणाच नव्हे, तर असंविधानिक पद्धतीचेही उदाहरण आहे.”
दुसरीकडे शशी थरूर यांनी या नेमणुकीला सन्मान मानत, “देशाच्या हितासाठी मी नेहमीच तयार आहे. राष्ट्रीय सुरक्षेचा मुद्दा आहे, त्यामुळे अशा संधीला मी नकार देणार नाही,” असे मत व्यक्त केले. थरूर यांचे हे वक्तव्य आणि सरकारचे आमंत्रण स्वीकारणे काँग्रेस नेतृत्वाच्या मनस्तापास कारणीभूत ठरले.
या पार्श्वभूमीवर भाजपने काँग्रेसवर हल्ला चढवला आहे. भाजपचे आयटी सेल प्रमुख अमित मालवीय यांनी काँग्रेसच्या वागणुकीवर प्रश्न उपस्थित करत म्हटले, “परराष्ट्र धोरणात सखोल जाण असलेल्या थरूर यांना पक्षाने का डावलले? हे काँग्रेसमधील मत्सर आणि असहिष्णुतेचे द्योतक आहे.”
या सर्व घडामोडींमुळे काँग्रेसमध्ये अंतर्गत मतभेद अधिक तीव्र झाले असून, काही नेत्यांनी थरूर यांच्यावर पक्षशिस्त मोडल्याचा आरोप केला आहे. “थरूर यांनी ‘लक्ष्मण रेषा’ ओलांडली असून पक्षाच्या अधिकृत भूमिकेपासून दूर गेले,” अशी टीका काही नेत्यांनी केली.
‘ऑपरेशन सिंदूर’नंतर आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताची बाजू मांडण्यासाठी शिष्टमंडळ पाठवण्याची केंद्र सरकारची योजना असून, यामध्ये शशी थरूर यांचा समावेश वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे.
राजकीय निरीक्षकांच्या मते, हा वाद काँग्रेससाठी डोकेदुखी ठरू शकतो, विशेषतः जेव्हा पक्ष राष्ट्रीय सुरक्षेसारख्या संवेदनशील विषयांवरही एकवाक्यता राखू शकत नाही, तेव्हा जनतेत चुकीचा संदेश जाऊ शकतो.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App