विशेष प्रतिनिधी
छत्रपती संभाजीनगर :Sanjay Raut शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत हे खोटारड्या लोकांतील हिरो आहेत. शिवसेनेतील उठावापसून आजपर्यंत ते एकही वाक्य खरे बोलले नाहीत, अशी टीका सत्ताधारी शिवसेनेचे नेते तथा राज्याचे सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांनी केली आहे. यावेळी त्यांनी आदित्य ठाकरे इव्हिनिंग वॉक करण्यासाठी छत्रपती संभाजीनगरच्या दौऱ्यावर आल्याची टीकाही त्यांनी यावेळी केली.Sanjay Raut
आदित्य ठाकरे शुक्रवारी छत्रपती संभाजीनगरच्या दौऱ्यावर आले होते. या दौऱ्यात त्यांनी पालकमंत्र्यांच्या (संजय शिरसाट) मुंबईतील 73 व्या मजल्यावर जाण्याची लिफ्ट बंद असल्याची टीका केली होती. संजय शिरसाट यांनी शनिवारी पत्रकारांशी संवाद साधताना त्यांच्या या टीकेला प्रत्युत्तर दिले. ते म्हणाले, आदित्य ठाकरे इथे नेहमीच्या स्टाईलमध्ये आले. इथे इव्हिनिंग वॉक केला. सर्व परिस्थितीची जाणिव झाल्यानंतर त्यांनी आपल्या भाषणात 25 वेळा देवेंद्र फडणवीस साहेब असे तुणतुणे वाजवले. आमचे कुठेही 48 बोगस कारखाने नाहीत. बोगस कारखाने काढून आम्ही कुठेही अवाढव्य संपत्ती कमावली नाही. त्याची चौकशी सुरू आहे हे त्यांनाही माहिती आहे. काचेच्या घरात राहणाऱ्यांनी दुसऱ्यांच्या घरावर दगड मारू नये.
संजय राऊतांना खोटे बोलण्याचा पुरस्कार द्या
संजय शिरसाट यांनी यावेळी खासदार संजय राऊत यांच्यावरही निशाणा साधला. मागील 2-3 दिवसांपासून संजय राऊत यांच्या पुस्तकाविषयी वेगवेगळे दावे केले जात आहेत. पण त्यात कोणतेही तथ्य नाही. त्यांची मानसिकता खोटे बोल, पण रेटून बोल अशी आहे. त्यांना खोटे बोलण्याचा पुरस्कार दिला पाहिजे. ते उठावापासून आजपर्यंत एकही खरे वाक्य बोलले नाहीत. ते खोटारड्या लोकांतील हिरो आहेत. हिरो बनण्याचा केवीलवाणा प्रयत्न करत आहेत. त्यांची चौकशी सुरू आहे. ते कधिही आतमध्ये जाऊ शकतात. संजय राऊत यांच्यावर योग्यवेळी योग्य कारवाई होईल, असे ते म्हणाले.
खात्याला आगामी अधिवेशनात योग्य न्याय मिळेल
संजय शिरसाट यांनी यावेळी विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात आपल्या खात्याला योग्य तो निधी मिळेल असा विश्वासही व्यक्त केला. येत्या अधिवेशनात माझ्या खात्यातर्फे पुरवणी मागण्या केल्या जातील. त्यातून सामाजिक न्याय विभाग खात्याला निधी मिळेल. या संदर्भात माझी मुख्यमंत्र्यांशी चर्चा झाली आहे. महाविकास आघाडीत फाटाफूट होणार आहे. राष्ट्रवादीच्या शरद पवार गटासह, काँग्रेसचे अनेक आमदार, पदाधिकारी आमच्या गोटात येण्यास तयार आहेत. ठाकरे गट तर केव्हा फुटेल याची काहीही शाश्वती नाही, असे ते म्हणाले.
संभाजीनगरातील वाढत्या गुन्हेगारीवर भाष्य
छत्रपती संभाजीनगरातील वाढत्या गुन्हेगारीच्या घटनांवर अंकुश लावण्यासाठी पोलिसांना योग्य ते निर्देश दिल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. पोलिसांना 10 दिवसांपूर्वी झालेल्या एका बैठकीत अवैध धंदे करणाऱ्यांवर कारवाई करण्याच्या स्पष्ट सूचना दिल्या आहेत. शहरातील दरोडे, चोरीच्या घटना वाढल्याच्या पार्श्वभूमीवर पोलिसांची पुन्हा एक बैठक घेऊन त्यांना या सर्व प्रकारावर आळा घालण्यासाठी सूचना देवू, असे शिरसाट म्हणाले.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App