विशेष प्रतिनिधी
पाटणा : Rahul Gandhi काँग्रेसचे नेते आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या बिहार दौऱ्यादरम्यान दोन गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या प्रकरणांमध्ये राहुल गांधींसह २० नेत्यांचे आणि १०० अज्ञात समर्थकांचेही नाव आहे. हे गुन्हे दरभंगा जिल्ह्यातील अनुसूचित जाती आणि जमातीच्या विद्यार्थ्यांच्या वसतिगृहात विनापरवानगी कार्यक्रम घेण्यात आल्यामुळे दाखल झाले आहेत.Rahul Gandhi
राहुल गांधी यांनी दरभंग्यातील आंबेडकर कल्याण वसतिगृहात विद्यार्थ्यांची भेट घेतली होती. मात्र, या भेटीसाठी प्रशासनाची कोणतीही परवानगी घेण्यात आलेली नव्हती, असा प्रशासनाचा दावा आहे. जिल्हा प्रशासनाने स्पष्ट केलं आहे की वसतिगृहात राजकीय कार्यक्रम घेण्यास परवानगी नव्हती. तरीही राहुल गांधी आणि त्यांच्या समर्थकांनी कार्यक्रम घेतल्याने दोन एफआयआर दाखल करण्यात आले आहेत.
पहिला गुन्हा भारतीय न्याय संहितेच्या कलम १६३ अंतर्गत नोंदवण्यात आला आहे. यासंदर्भात जिल्हाधिकारी खुर्शीद आलम यांनी तक्रार दाखल केली असून, कायदा-सुव्यवस्थेचा भंग केल्याचा आरोप करण्यात आला आहे.
दुसरा एफआयआर वसतिगृहात जबरदस्तीने प्रवेश करून विनापरवानगी राजकीय कार्यक्रम केल्याबद्दल दाखल करण्यात आला आहे. जिल्हा विकास अधिकारी आलोक कुमार यांनी या तक्रारीला दुजोरा दिला आहे. दरभंगाचे एसडीपीओ अमित कुमार आणि एडीएम विकास कुमार यांनीही या घटनेची पुष्टी केली आहे.
या सर्व प्रकारावर प्रतिक्रिया देताना राहुल गांधी म्हणाले, “माझ्यासाठी हे सर्व गुन्हे म्हणजे मेडल्स आहेत. माझ्याविरोधात आतापर्यंत ३०-३२ गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. मी जातनिहाय जनगणनेचा मुद्दा मांडला होता. तसेच खासगी शिक्षणसंस्थांमध्ये आरक्षण लागू करण्याचे कायदे अंमलात आणावेत आणि ५० टक्के आरक्षण मर्यादा हटवावी, अशी आमची भूमिका आहे. ही मागणी पूर्ण होईपर्यंत आम्ही शांत बसणार नाही.”
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App