विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : भारताच्या ‘ऑपरेशन सिंदूर’ने केवळ दहशतवाद्यांचे अड्डे उध्वस्त केले नाहीत, तर पाकिस्तानने ताब्यातघेतलेल्या भारतीय जवानाची सुटका करण्यास भाग पाडले. तब्बल २० दिवसांच्या तणावानंतर अखेर पाकिस्तानने भारताचे बीएसएफ जवान पूर्णम कुमार शॉ यांना अटारी-वाघा सीमेवरून भारताच्या स्वाधीन केले. सकाळी १०:३० वाजता शॉ भारतात परतले, आणि तातडीने त्यांना वैद्यकीय तपासणीसाठी पाठवण्यात आले.
२३ एप्रिल रोजी फिरोजपूर सेक्टरमध्ये सीमेवर ड्युटीवर असताना, शॉ चुकून पाकिस्तानच्या हद्दीत गेले. ही घटना पहलगाम हल्ल्याच्या दुसऱ्याच दिवशी घडली होती. पाकिस्तान रेंजर्सने त्यांना ताब्यात घेतले आणि अपमानास्पदरीत्या त्यांचे फोटो प्रसिद्ध केले. एकामध्ये ते झाडाखाली उभे आहेत तर दुसऱ्यामध्ये डोळ्यांवर पट्टी बांधलेली दिसत आहे.
बीएसएफच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सातत्याने पाकिस्तान रेंजर्सशी संपर्क साधला. ध्वज बैठकांपासून ते डीजीएमओ स्तरावरील चर्चांपर्यंत भारताने एका जवानासाठी लढा दिला. जवानाची चूक अनवधानाने घडली होती हे भारताने स्पष्ट केले होते. त्याची नुकतीच बदली झाली होती आणि त्याला सीमारेषेची माहिती नव्हती, असेही पटवून दिले. पण पाकिस्तानने दुर्लक्ष केले.
यानंतर ७ मे रोजी भारताने ‘ऑपरेशन सिंदूर’ अंतर्गत पाकिस्तानातील दहशतवादी तळांवर अचूक आणि निर्णायक हल्ले चढवले. जगभरात पाकिस्तानची नाचक्की झाली. आंतरराष्ट्रीय दबाव वाढला आणि भारताच्या कठोर भूमिकेमुळे अखेर पाकिस्तानला भारतीय जवानाची सुटका करावी लागली.
पूर्णम कुमार शॉ यांची पत्नी रजनी गर्भवती असून, आपल्या पतीच्या सुटकेसाठी त्यांनीही संघर्ष केला. लष्करी दबावाच्या जोरावर त्या वीरपत्नीचे अश्रूही थांबले.भारत कोणाच्याही दबावाला झुकत नाही हे पुन्हा सिद्ध झाले.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App