विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : स्वातंत्र्यवीर सावरकरांचा अपमान करणाऱ्या राहुल गांधींना सुप्रीम कोर्टाने आज जबरदस्त चपराक हाणली. देशाला स्वातंत्र्य मिळवून देणाऱ्या स्वातंत्र्य सैनिकांचा कोणत्याही स्थितीत अपमान सहन करणार नाही. इथून पुढे राहुल गांधींनी जर सावरकरांविषयी अपमानास्पद उद्गार काढले, तर सुप्रीम कोर्ट त्यांच्या विरोधात कारवाई करेल, अशा परखड शब्दांमध्ये सुप्रीम कोर्टाने राहुल गांधींच्या वक्तव्याचे वाभाडे काढले. अलाहाबाद हायकोर्टाने राहुल गांधींविरुद्ध काढलेल्या समन्सला सुप्रीम कोर्टाने केवळ कायद्याच्या आधारे स्थगिती दिली. मात्र राहुल गांधींची चांगलीच कानउघडणी केली.
राहुल गांधींनी भारत जोडून न्याय यात्रेदरम्यान अकोल्यामध्ये स्वातंत्र्यवीर सावरकरांना माफीवीर म्हणून अपमान केला होता. त्यानंतर त्यांनी सातत्याने सावरकरांच्या विरोधात वक्तव्ये केली होती. त्यांच्या विरोधात अनेक सावरकर प्रेमींनी न्यायालयात खटले दाखल केले. त्यापैकी अलाहाबाद न्यायालयातल्या खटल्यात अलाहाबाद हायकोर्टाने राहुल गांधींना समन्स बजावले होते. त्याला स्थगिती देण्याची मागणी राहुल गांधींच्या वकिलांनी सुप्रीम कोर्टात केली होती. त्यावर सुप्रीम कोर्टात आज न्यायमूर्ती दीपांकर दत्ता आणि न्यायमूर्ती मनमोहन यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली. राहुल गांधींची बाजू वकील अभिषेक मनू सिंघवी यांनी मांडली.
सुनावणीच्या सुरुवातीलाच न्यायमूर्ती दीपांकर दत्ता यांनी राहुल गांधींच्या सावरकरांच्या अपमान करणाऱ्या वक्तव्यावर तीव्र आक्षेप घेतला. राहुल गांधी एका जबाबदार पदावर काम करत आहेत. ते एका राजकीय पक्षाचे नेते नेते आहेत आणि तेच देशाला स्वातंत्र्य मिळवून देणाऱ्या स्वातंत्र्य सैनिकांविरुद्ध टीकाटिप्पणी करतात, हे कदापि मान्य होणार नाही, अशा परखड शब्दांमध्ये न्यायमूर्ती दीपांकर दत्ता यांनी राहुल गांधींचे वाभाडे काढले.
महात्मा गांधी सुद्धा ब्रिटिश व्हॉइसरायला पत्र लिहिताना “युवर ओबिडियंट सर्व्हंट” असे लिहायचे, म्हणून काय ते ब्रिटिशांचे नोकर झाले होते का??, राहुल गांधींची आजी इंदिरा गांधींनी पंतप्रधान पदावर असताना सावरकरांचा मोठे स्वातंत्र्य सैनिक म्हणून गौरव केला होता. हे राहुल गांधींना माहिती नाही का??, राहुल गांधींनी महाराष्ट्रातल्या अकोल्यात जाऊन सावरकरांचा अपमान केला त्या महाराष्ट्रात सावरकरांना पूजनीय मानले जाते, हे राहुल गांधींसारख्या मोठ्या पक्षाच्या नेत्याला माहिती नाही का??, असे परखड सवाल न्यायमूर्ती दीपांकर दत्ता यांनी केले. त्याचवेळी इथून पुढे राहुल गांधींनी इतिहास आणि भूगोल न जाणता कुठल्याही स्वातंत्र्य सैनिकाचा अपमान करणारे व्यक्तव्य केले, तर सुप्रीम कोर्ट स्वतःहून त्याची दखल घेऊन कारवाई करेल, असा गंभीर इशारा सुप्रीम कोर्टाच्या खंडपीठाने दिला.
अलाहाबाद हायकोर्टाच्या समन्सला स्थगिती दिली तरी सुप्रीम कोर्टाने ज्या पद्धतीने सावरकरांच्या अपमानाची दखल घेऊन राहुल गांधींना झापले, ते पाहता सावरकरांच्या केस मध्ये राहुल गांधींच्या वेगवेगळ्या कोर्टांमधल्या कायदेशीर अडचणी आणखी वाढणार असल्याचे स्पष्ट झाले.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App