राज्यातील प्रतिभावान खेळाडूंना आंतरराष्ट्रीय स्तराच्या सोयीसुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी राज्य सरकार सातत्याने काम करत आहे.
विशेष प्रतिनिधी
मुंबई : Devendra Fadnavis मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यपाल सीपी राधाकृष्णन यांच्यासमवेत श्री शिवछत्रपती क्रीडा संकुल म्हाळुंगे-बालेवाडी, पुणे येथे ‘शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार वितरण समारंभ’ येथे विविध पुरस्कारांचे वितरण केले.Devendra Fadnavis
यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, राज्याला नाव व खेळाला मान मिळवून देणाऱ्या खेळाडूंचा सत्कार आज राज्यातील सर्वोच्च अशा शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार देऊन करण्यात येत आहे, याचा मनस्वी आनंद आहे. बॅडमिंटनपटू प्रदीप गंधे व कबड्डीपटू शकुंतला खटावकर यांचाही आज शिवछत्रपती राज्य क्रीडा जीवनगौरव पुरस्काराने सन्मान करण्यात आला. या दोन्ही खेळाडूंनी प्रतिकूल परिस्थितीत अतुलनीय कामगिरी बजावत महाराष्ट्राला मोठा सन्मान मिळवून दिला. तसेच नुकत्याच पार पडलेल्या ऑलिम्पिक स्पर्धेमध्ये स्वप्निल कुसळे व पॅराऑलिम्पिकमध्ये सचिन खिलारी यांनीही उत्कृष्ट कामगिरी करत पदक मिळवले, त्यामुळे महाराष्ट्राची पदक भरारी सुरु झाली आहे, असे मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, राज्यातील प्रतिभावान खेळाडूंना आंतरराष्ट्रीय स्तराच्या सोयीसुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी राज्य सरकार सातत्याने काम करत आहे. राष्ट्रीय स्तरावर उत्तम कामगिरी करणाऱ्या खेळाडूंना आंतरराष्ट्रीय स्तरावर चांगली कामगिरी करता यावी यासाठी परदेशी प्रशिक्षकदेखील देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतलेला आहे. राज्यात सर्व प्रकारच्या खेळांसाठी उत्तम पायाभूत सुविधा शासन निर्माण करत आहे. राज्यातील राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील पदक विजेत्या खेळाडूंच्या बक्षिसांच्या रक्कमेतही भरीव वाढ करण्यात आलेली आहे. तसेच त्यांना शासकीय नोकरीमध्ये समाविष्ट करण्यासाठीही राज्य शासनाने पुढाकार घेतला असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले.
सर्व पदकविजेत्या खेळाडू आणि प्रशिक्षकांचे अभिनंदन करताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार म्हणजे खेळाडूंच्या मेहनतीला एकप्रकारे राजमान्यता आहे. ज्याप्रकारे छत्रपती शिवाजी महाराज यांनी महाराष्ट्राला दिशा दाखवली त्याचप्रकारे सर्व पदकविजेते खेळाडू व प्रशिक्षक महाराष्ट्रातील सर्व खेळाडूंना दिशा दाखवतील असा विश्वास यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला.
यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार, विधानसभेचे उपाध्यक्ष अण्णा बनसोडे, मंत्री चंद्रकांत पाटील, मंत्री जयकुमार रावल, मंत्री दत्तात्रय भरणे, पुरस्कार विजेते खेळाडू, प्रशिक्षक व इतर मान्यवर उपस्थित होते.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App