विशेष प्रतिनिधी
नाशिक : विश्वरत्न महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त आज नाशिकच्या काळाराम मंदिर आणि रामतीर्थावर समतेची आरती करण्यात येणार असून या आरतीद्वारे सामाजिक समता बंधुता समरसता आणि एकात्मतेचा दीप उजळण्याचा अनोखा उपक्रम रामतीर्थ गोदावरी सेवा समिती आणि अनुलोम ही संस्था करणार आहे. कर्मवीर दादासाहेब गायकवाड यांचे वंशज आणि नाशिक जिल्हा दलित शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष कॅप्टन कुणाल गायकवाड आणि कर्मयोद्धा आप्पासाहेब गायकवाड यांचे सुपुत्र पिके उर्फ नानासाहेब गायकवाड या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. आज 14 एप्रिल सायंकाळी 5.00 काळाराम मंदिरात आणि सायंकाळी 6.00 वाजता रामतीर्थावर आरती आणि महापूजानाचा कार्यक्रम होणार आहे.
दलित समाजाला मंदिरांमध्ये हक्काने प्रवेश मिळाला पाहिजे, यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी याच काळाराम मंदिराच्या प्रवेशद्वारावर मंदिर प्रवेशाचे मोठे सत्याग्रह आंदोलन उभारले होते. या आंदोलनाच्या वेळी मोठे सामाजिक मंथन आणि अभिसरण झाले. कालांतराने दलितांना मंदिरात प्रवेश मिळाला. संपूर्ण भारतात समतेचे एक नवे युग सुरू झाले. याची आठवण ठेवून रामतीर्थ गोदावरी सेवा समिती आणि अनुलोम या संस्थांनी बाबासाहेबांना आदरांजली वाहण्यासाठी श्रीराम दर्शन पूजन आणि गोदावरीवर महाआरती या उपक्रमाचे आयोजन केले आहे. यावेळी रामातीर्थावर गौतम बुद्ध पूजन तसेच भीमवंदना हे कार्यक्रम सादर होणार असून गोदावरी महापूजन आणि महाआरती नंतर अनुलोम संस्थेचे प्रमुख स्वानंदजी ओक यांच्या हस्ते मान्यवरांना मानपत्र अर्पण करण्याचा कार्यक्रमही होणार आहे.
सामाजिक एकता बंधुता आणि समरसता यांच्या विचारांचा दीप उजळविण्याच्या या कार्यक्रमात नाशिककरांनी उत्स्फूर्तपणे सहभागी व्हावे असे आवाहन रामतीर्थ गोदावरी सेवा समिती आणि अनुभव या संस्थांनी केले आहे.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App