विशेष प्रतिनिधी
मुंबई : बनेश्वरच्या सहाशे मीटरच्या रस्त्यावरून सात तास उपोषण करणाऱ्या सुप्रिया सुळेंची सुरुवातीला उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी खिल्ली उडवली, पण नंतर त्या रस्त्याच्या कामासंदर्भात अधिकाऱ्यांना दमात घेतले, पण दुसरीकडे एसटी कर्मचाऱ्यांच्या अर्धवट पगाराच्या मुद्द्यावरून राज्याच्या परिवहन मंत्र्यांनी अजित पवारांच्या अर्थ खात्याला ठोकून काढले.
भोर तालुक्यातल्या बनेश्वर देवस्थान जवळचा अवघा सहाशे मीटर लांबीचा रस्ता काँक्रीटचा करण्याच्या मुद्द्यावर खासदार सुप्रिया सुळे यांनी सात तास उपोषण केले. त्यांचे उपोषण आंदोलन गाजले. पण तो रस्ता खासदार निधीतून करता येऊ शकतो, असे बोट अजितदादांनी त्यांना दाखविले. पण हा रस्ता जिल्हा परिषदेच्या अखत्यारीत येत असल्याचे सांगून सुप्रिया सुळे यांनी खासदार निधी सुद्धा कमी पडत असल्याचे म्हटले. उपोषणाच्या मुद्द्यावर बहीण – भावाची राजकीय जुगलबंदी गाजली.
पण नंतर मात्र अजित पवारांनी अधिकाऱ्यांना दमात घेऊन बनेश्वर देवस्थान जवळचा रस्ता लवकरात लवकर काँक्रीटचा करा. त्यासाठी माझ्या बहिणीला किंवा कुठल्याच नागरिकाला आंदोलन करण्याची किंवा उपोषण करण्याची वेळ येऊ देऊ नका, असे सांगितले.
पण दुसरीकडे एसटी कर्मचाऱ्यांना नियमित वेतन मिळण्यापेक्षा 56 % च वेतन मिळाले या मुद्द्यावरून परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी अजित पवार यांच्या अर्थ खात्याकडे बोट दाखवले. एसटीच्या फायली अर्थमंत्र्यांपर्यंत पोहोचतच नाहीत. आम्ही अर्थ खात्याकडे आमचा हक्क मागतो आहोत, भीक मागत नाही, अशा परखड शब्दांमध्ये प्रताप सरनाईक यांनी अजित पवार यांना सुनावले.
एरवी अजित पवार हे परखड बोलण्यासाठी आणि धडाकेबाज कृती करण्यासाठी प्रसिद्ध असल्याचे मानले जाते, पण प्रताप सरनाईक यांनी मात्र त्यांच्या अर्थ खात्यातील त्रुटींकडे बोट दाखवून अजितदादांच्या परखडपणावर देखील मात केल्याचे मानले जात आहे.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App