नाशिक : तिकडे गुजरातच्या अहमदाबाद मध्ये काँग्रेसचे अधिवेशन सुरू होत असताना, इकडे राजधानी नवी दिल्लीमध्ये रायबरेलीच्या मुद्रा योजना लाभार्थी महिलेने पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या निवासस्थानी येऊन त्यांचे आभार मानले. हा अनोखा योगायोग आज देशाच्या राजकारणात घडला. याचे पडसाद आता दीर्घकाळ उमटत राहणार आहेत.
सतत पराभवाला सामोरे जावे लागत असलेल्या काँग्रेसला संघटनात्मक पातळीवर नवसंजीवनी देऊन भाजपच्या मोदी सरकारशी नव्याने टक्कर घेण्याचा इरादा व्यक्त करत काँग्रेसने मोदींचे गृहराज्य गुजरात मध्येच महा अधिवेशन घ्यायचा निर्णय घेतला. तत्पूर्वी काँग्रेसची कार्यकारणी बैठक आज आणि उद्या आठ आणि नऊ एप्रिल रोजी अहमदाबादेत होत आहे. यासाठी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, काँग्रेस संसदीय दलाच्या नेत्या सोनिया गांधी, लोकसभेतले विरोधी पक्षनेते राहुल गांधी, प्रियांका गांधी यांच्यासह काँग्रेसची सगळी दिग्गज मंडळी अहमदाबाद दाखल झाली. गुजरात गांधींचा होता आणि राहील, असा निर्धार या मंडळींनी व्यक्त केला पण त्याचवेळी त्यांनी मोदी सरकारशी नव्याने टक्कर घेण्याचा इरादाही व्यक्त केला.
या पार्श्वभूमीवर राजधानी दिल्लीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज मुद्रा योजना लाभार्थी महिलांशी संवाद साधला. पंतप्रधानांच्या निवासस्थानी आणि व्हिडिओ कॉन्फरन्स द्वारे देशात इतरत्र त्यांनी हा उपक्रम केला. यावेळी नेमकी रायबरेलीतील एक महिला लाभार्थी पंतप्रधानांच्या निवासस्थानी उपस्थित होती. बेकरी व्यवसायिक या महिलेने पंतप्रधानांशी बोलताना मुद्रा योजनेतील लाभ लाखो महिलांना कसा झाला??, याचे सविस्तर वर्णन केले. गरीब महिलांना बँका कर्ज देत नव्हत्या. न परवडणारे तारण मागत होत्या. मुद्रा योजनेमुळे हा महत्त्वाचा अडथळा दूर झाला. कर्ज मिळणे सुलभ झाले. त्यातून छोटे-मोठे व्यवसाय सुरू झाले. महिलांची आमदनी वाढली. महिला स्वतंत्रपणे छोटे उद्योग उभारून इतरांनाही रोजगार देऊ लागल्या याची कहाणी या महिलेने पंतप्रधानांना सांगितली. तिची कहाणी ऐकतानाच पंतप्रधानांनी मिश्किलपणे त्या महिलेला तुमचा निवडणूक लढवायचा इरादा आहे का??, असा सवाल केला. त्यावेळी तिथे उपस्थित असलेल्या महिलांमध्ये हशा पिकला.
रायबरेली हा गांधी परिवाराचा परंपरागत मतदार संघ इथूनच इंदिरा गांधी निवडणूक जिंकल्या आणि आणीबाणीनंतर हरल्या देखील. त्यानंतर सोनिया गांधींनी रायबरेलीचे प्रतिनिधित्व केले होते. त्यामुळे एकीकडे मोदींच्या गुजरात या गृहराज्यातून काँग्रेस त्यांना आव्हान देण्यासाठी आघाडीवर आली असताना मोदींनी गांधी परिवाराच्या परंपरागत रायबरेली मतदारसंघातील एका सामान्य महिलेला तुम्ही निवडणूक लढवू इच्छिता का??, असा सूचक सवाल करून आज आपल्याही राजकारणाची चुणूक काँग्रेसला दाखवून दिली.
पंतप्रधान नरेंद्र मोदी सध्या एका महत्त्वाच्या मुद्द्यावर शोधपूर्वक काम करत आहेत, ते म्हणजे कुठल्याही घराणेशाहीची परंपरा नसलेल्या युवक युवतींना राजकारणाच्या आखाड्यात आणून निवडणुकीच्या रिंगणात उतरवण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. यातून राजकारणाचा संपूर्ण चेहरा मोहरा बदलण्याबरोबरच भारतीय राजकारणाला लागलेली घराणेशाहीची कीड नष्ट करायचा त्यांचा इरादा आहे. या पार्श्वभूमीवर मोदींनी रायबरेलीच्या त्या महिलेला विचारलेला सवाल सूचक असला तरी तो त्यांच्या भविष्यकालीन राजकारणाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App