विशेष प्रतिनिधी
नाशिक : रामतीर्थ गोदावरी सेवा समिती नियमितपणे गोदावरी आरती करत असताना त्यांच्या सेवेत अडथळा आणण्याच्या हेतूने सेवा समितीच्या दोन ध्वनिवर्धकांची वस्त्रांतर गृहावरून चोरीची संतापजनक आज घटना समोर आली असून रामतीर्थ गोदावरी सेवा समितीने या संदर्भात पंचवटी पोलीस स्टेशनला तक्रार दाखल केली आहे. या चोरी मागे स्थानिक आणि त्यांचे निकटवर्तीय असल्याचा दाट संशय सेवा समितीने व्यक्त केला असून त्यांनी पोलिसांना एफआयआर दाखल करण्याची विनंती केली. परंतु, पोलिसांनी अद्याप एफआयआर दाखल केलेला नाही.
रामतीर्थ गोदावरी सेवा समिती 2024 च्या शिवजयंती पासून नियमितपणे द्विमुखी मारुती पाशी रामतीर्थावर सायंकाळी आरती करते. या आरतीला आत्तापर्यंत राज्यपालांपासून ते राज्य शासनाच्या विविध मंत्र्यांपर्यंत अनेक मान्यवरांनी उपस्थित राहून या उपक्रमाची प्रशंसा केली आहे. रामतीर्थ गोदावरी सेवा समितीने गोदावरी आरती बरोबरच गोदावरी स्वच्छता आणि गोदावरी संवाद यांच्यासारखे जनसहभागाचे मोठे उपक्रम राबविले असून त्याला नाशिककरांसह महाराष्ट्रभरातल्या भाविकांनी उत्तम प्रतिसाद दिला आहे. मात्र, गोदावरी आरती करण्याचा हक्क आणि मक्ता फक्त आपल्याकडेच आहे, अशा धाटणीने काही स्थानिक लोक विशेषत: पुरोहित संघ वागत असून त्यातून थेट राज्यपालांच्या कार्यक्रमाला अडथळा आणण्यापर्यंत त्यांची मजल जात असल्याचा अनुभव नाशिककरांना आला आहे.
आता तर त्या पलीकडे जाऊन रामतीर्थ गोदावरी सेवा समितीच्या ध्वनिवर्धकांच्या चोरी पर्यंत हा प्रकार येऊन ठेपला असून संबंधित ध्वनिवर्धक रामतीर्थ गोदावरी सेवा समितीने पोलीस आणि महापालिका प्रशासनाची परवानगी घेऊन वस्त्रांतर गृहावर लावले होते. परंतु, आज ४ एप्रिल २०२५ रोजी हे दोन ध्वनिवर्धक त्यांच्या उपकरणांसह चोरीला गेल्याचे सेवा समितीच्या पदाधिकाऱ्यांच्या लक्षात आले. पदाधिकाऱ्यांनी ताबडतोब पोलिसांकडे त्यासंदर्भात रीतसर कायदेशीर तक्रार दाखल करून या चोरीबद्दल एफआयआर दाखल करण्याची विनंती केली. पोलिसांनी संबंधितांची तक्रार दाखल करून घेतली. परंतु एफआयआर दाखल केल्याची अद्याप माहिती समोर आलेली नाही.
रामतीर्थ गोदावरी सेवा समितीने या चोरी संदर्भात स्थानिक आणि त्यांच्या निकटवर्तीयांवर संशय व्यक्त केला असून संबंधित चोरी प्रकरणात त्यांच्यावर कठोर कायदेशीर कारवाई करायची मागणी पोलिसांकडे केलेल्या अर्जात केली आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App