विशेष प्रतिनिधी
मुंबई : केंद्रातले मोदी सरकार एकीकडे waqf सुधारणा कायदा मांडत असताना महाराष्ट्रातल्या राजकारणात “चुलत्याची कृपा” हा विषय अचानक चर्चेचा झाला. त्यावर अनेकांनी क्रिया – प्रतिक्रिया व्यक्त केल्या. पण या सगळ्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रतिक्रिया सगळ्यात जास्त गाजली.
त्याचे झाले असे :
पालकमंत्री या नात्याने अजित पवार आज बीडला पोहोचले तिथे त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या युवक मेळाव्यात भाषण केले त्यावेळी अजितदादांनी गुंड, वाळू माफिया, राख माफिया यांना दमात घेतले. राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना नीट वागायला सांगितले, पण हे सगळे भाषण करत असताना अजितदादा बोलता बोलता म्हणाले, आमचे आई-वडिलांच्या आणि चुलत्याच्या कृपेने बरे चालले आहे, तर चालू द्यात ना!! उगाच त्यात कुठला अडथळा आणू नका. अजितदादांचे हे वक्तव्य महाराष्ट्रात जोरदार व्हायरल झाले. त्यामुळे अनेकांनी चुलते – पुतणे एकत्र येणार, अशा अटकळी बांधल्या. दोन्हीकडचे राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते संभ्रमात गेले.
अजितदादांच्या या वक्तव्यावर पत्रकारांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना प्रतिक्रिया विचारली. त्यावेळी फडणवीस म्हणाले, अजित पवार बरोबर बोललेत. मोठ्यांचे आशीर्वाद घ्यायचे असतात. पण त्यांनी काकांना आशीर्वादापुरतच मर्यादित ठेवले हे तुम्ही लक्षात घ्या!!.
फडणवीसांची ही प्रतिक्रिया देखील सगळीकडे व्हायरल झाली. त्यामुळे अनेकांच्या जुन्या आठवणी जागा झाल्या. शरद पवारांच्या सांगण्यावरूनच अजित पवार भाजपशी वाटाघाटी करत होते. त्यांच्या सूचनेनुसार अजितदादांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याबरोबर उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली होती, पण नंतर पवार मागे फिरले. त्यांनी सरकारच्या पाठिंबा काढून घेतला त्यामुळे फडणवीस आणि अजितदादा राजीनामा द्यावा लागला होता. त्यावेळी पवारांनी “आशीर्वाद” देऊन देखील माघार घेतली होती, पण आता मात्र अजितदादांनी चुलत्याचा “आशीर्वाद” घेऊन बंड केले आणि आता ते फडणवीसांच्याच नेतृत्वाखाली दुसऱ्या क्रमांकाचे उपमुख्यमंत्रीपद घेऊन सत्तेवर आले. चुलत्याला त्यांनी आशीर्वादापुरतेच “मर्यादित” ठेवून स्वतःचा निर्णय वेगळा घेतला म्हणून त्यांना सत्तेवर येता आले. फडणवीसांनी नेमक्या शब्दांत पवारांना टोचणारे हे वास्तव मांडले.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App