यामुळे पुढील 50 वर्षे शहर व उपनगरासाठी पाणी उपलब्धता निश्चित होणार आहे.
विशेष प्रतिनिधी
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली विधान भवन, मुंबई येथे ‘गारगाई धरण प्रकल्प’ यासंदर्भात आढावा बैठक आणि मौजे भांडूप, मुंबई येथील जलशुद्धीकरण केंद्राच्या बांधकामासाठी पर्यावरण संवेदनशील क्षेत्र संनियंत्रण समितीच्या मान्यतेसाठी बैठक संपन्न झाली. या बैठकीमध्ये मुख्यमंत्री फडणवीस यांनी संबंधित अधिकाऱ्यांना महत्त्वाचे निर्देश दिले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, गारगाई प्रकल्प मुंबईच्या पाणीपुरवठ्यासाठी आवश्यक आहे. या प्रकल्पातून 400 दशलक्ष लिटर पाणी उपलब्ध होणार आहे. यामुळे पुढील 50 वर्षे शहर व उपनगरासाठी पाणी उपलब्धता निश्चित होणार आहे. उगदा गावाजवळ (वाडा) हा प्रकल्प उभारण्यात येत असून या परिसरातील 6 गावांचे पुनर्वसन करण्यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिका व वन विभागाने 15 दिवसात प्रस्ताव सादर करावा. या गावांचे पुनर्वसन करताना नियमाप्रमाणे जमिनीचा मोबदला देणे व रोजगार संदर्भातील अटींची पूर्तता करण्यात यावी.
तसेच उगदा गावाजवळ 400 हेक्टर जमिनीवर या गावांचे पुनर्वसन करण्यात येणार आहे. त्यासंदर्भात महाराष्ट्र वन विकास मंडळाकडे (एएफडीसीएम) यासंदर्भात पाठपुरावा करावा, असे निर्देश मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिले. पुनर्वसनानंतर येथे मुंबई नजिकचे सर्वात मोठे वाईल्ड लाईफ सेंच्युरी होणार आहे. यामुळे नवीन रस्ताही तयार होईल. येथील स्थानिकांना त्याचा फायदा होणार असल्याचेही यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, भांडुप येथे 2000 दशलक्ष लिटर क्षमतेच्या जलशुद्धीकरण प्रकल्पामुळे नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे. या प्रकल्पाचे कामही तातडीने पूर्ण करण्यासंदर्भातील कार्यवाहीस गती द्यावी, असे निर्देश मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिले. या बैठकीला मंत्री गणेश नाईक, वन विभागाचे अप्पर मुख्य सचिव, मित्रा संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, मुंबई महानगर पालिकेचे आयुक्त, प्रधान मुख्य वन संरक्षक (वन्य जीव) व इतर वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App