प्रतिनिधी
मुंबई : Kunal Kamra कुणाल कामराने विंडबन गीताद्वारे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर अप्रत्यक्षपणे टिप्पणी केली होती. या टीकेमुळे शिंदे गटातील कार्यकर्ते चांगलेच संतप्त झाले. त्यांनी कुणाल कामराच्या स्टुडिओची तोडफोड केली. या सर्व वादावर कुणाल कामराची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे. कोर्टाने विचारले, तर मी माफी मागेन अशी एका वाक्यात कुणालने प्रतिक्रिया दिली आहे. दुसरीकडे कुणालच्या स्टुडिओची तोडफोड करणाऱ्या सर्वांना जामीन मंजूर करण्यात आला आहे.Kunal Kamra
स्टँडअप कॉमेडियन कुणाल कामरा याने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर आक्षेपार्ह टिप्पणी केली होती. कुणालने गाण्यातून एकनाथ शिंदे यांचे नाव न घेता त्यांना गद्दार म्हटले होते. यामुळे संतप्त झालेल्या शिवसैनिकांनी कुणाल कामरा याच्या स्टुडिओ आणि हॉटेल द युनिकॉन्टिनेंटलची तोडफोड केली होती. याप्रकरणी तोडफोड करणाऱ्यांवर खार पोलिस ठाण्यात एफआयआरही दाखल करण्यात आला होता.
स्टँडअप कॉमेडियन कुणाल कामराच्या वादग्रस्त विधानानंतर शिवसैनिकांनी स्टुडिओची तोडफोड केली होती. याप्रकरणी पोलिसांनी 11 शिवसैनिकांना अटक केली होती. त्यांना कोर्टात हजर केल्यानंतर सुरूवातीला न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. त्यानंतर त्यांच्यामार्फत जामिनासाठी अर्ज करण्यात आला. कोर्टाने सर्व 11 जणांना 15 हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर जामीन मंजूर केला आहे.
कुणाल कामराची पहिली प्रतिक्रिया समोर
या सर्व घडामोडींनंतर कुणाल कामरा याची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे. ”मला ते बोलल्याचा कोणताही पश्चात्ताप नाही. जर न्यायालयाने मला विचारले तर मी माफी मागेन.”, असे कुणाल कामराने म्हटले आहे. मात्र, कुणाल कामराने ही प्रतिक्रिया माध्यमांना किंवा सोशल मीडियावर नाही तर पोलिसांना तक्रारीवर दिलेल्या उत्तरात दिली आहे. एनडीटीव्हीने पोलिस सुत्रांच्या हवाल्याने ही माहिती दिली आहे. सुपारीच्या प्रश्नावर कुणाल म्हणाला की, तुम्ही माझे बँक खाते तपासू शकतात आणि मी सुपारी का घेऊ? मी मराठीत कोणताही कार्यक्रम केलेला नाही. मी हा कार्यक्रम हिंदीमध्ये केला आहे. मी सुपारी घेतली नाही, असे कुणाल म्हणाला.
कुणालच्या ‘कॉमेडी’चे विधानसभेत पडसाद
कुणाल कामराच्या कॉमेडीचे विधानसभेतही पडसाद उमटले. शिवसेनेच्या आमदारांनी विधानभवनाच्या पायऱ्यांवर नारेबाजी करत कुणाल कामराविरोधात कठोर कारवाई करण्याची मागणी केली. तर स्टँडअप कॉमेडी करणाचा सर्वांना अधिकार. पण स्वातंत्र्याचा स्वैराचार करण्याचा कुणालाही अधिकार नाही. या प्रकरणी त्यांनी माफी मागितली पाहिजे, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले. शिवाय या प्रकरणी कुणाल कामरावर कठोरात कठोर कारवाई करण्याचा इशारा त्यांनी दिला आहे.
उद्धव ठाकरेंचे कुणाल कामराला समर्थन
दुसरीकडे उद्धव ठाकरे यांनी कुणाल कामराची पाठराखण करत एकनाथ शिंदे यांच्यावर निशाणा साधला आहे. कुणाल कामरा हा सत्यच बोलला. त्याने जनभावना मांडली. जे चोरी करतात ते गद्दारच असतात, असे उद्धव ठाकरे म्हणाले. काल कॉमेडी शोच्या सेटची जी तोडफोड करण्यात आली, ती शिवसैनिकांकडून करण्यात आली नाही. त्याचा शिवसेनेशी कोणताही संबंध नाही. ती तोडफोड गद्दारांनी (शिंदे गट) केली आहे. ज्या लोकांनी कुणाल कामराच्या शोच्या सेटचे नुकसान केले, त्या लोकांकडून त्याची नुकसान भरपाई वसूल केली जावी, अशी मागणीही उद्धव ठाकरे यांनी केली.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App