प्रतिनिधी
नागपूर : Nagpur city नागपूर शहरात 17 मार्च रोजी रात्री साडे आठ वाजेच्या सुमारास दोन गटांत मोठा हिंसाचार उसळला होता. या घटनेनंतर पोलिसांनी नागपूर शहरातील 11 पोलिस ठाण्यांच्या संचारबंदी लागू केली होती. हिंसाचाराच्या सहा दिवसांनंतर आज रविवारी दुपारी तीन वाजेपासून शहरातील संपूर्ण संचारबंदी हटवण्यात आली आहे. पोलिस आयुक्त रवींद्र सिंगल यांनी याबाबतचे आदेश जारी केले आहेत.Nagpur city
नागपूर शहरात हिंसाचार उसळल्यानंतर शहरातील कायदा व सुव्यवस्था कायम ठेवण्यासाठी उपाययोजना शहरात संचारबंदी लागू करण्यात आली होती. यामुळे जनजीवन विस्कळीत झाले होते. दंगलग्रस्त परिसराशिवाय अन्य भागात कायदा व सुव्यवस्थेचा कोणताही प्रश्न निर्माण झाला नाही. त्यामुळे पोलिस आयुक्तांनी टप्प्याटप्प्याने संचारबंदी उठवण्यास परवानगी दिली होती. गुरुवारी नंदनवन व कपिलनगरमधील तर शनिवारी पाचपावली, शांतीनगर, लकडगंज, सक्करदरा आणि इमामवाडा येथील संचारबंदी हटवण्यात आली होती. यशोधरानगर येथे संचारबंदी कायम ठेवण्यात आली होती.
नागपूर शहरात हिंसाचार झालेल्या भागातील संचारबंदी आज दुपारी तीन वाजेपासून हटवण्यात आली आहे. नागपूर शहरातील संपूर्ण पोलिस स्टेशन परिसरातील संचारबंदी हटवलेली आहे. यामुळे नागरिकांना दिलासा मिळेल. लोकांनी कोणत्याही अफवेवर विश्वास न ठेवता शांतता कायम राखतील, कायदा – सुव्यवस्था बिघडणार नाही, याची काळजी घेतील, अशी आम्ही आशा करतो, असे नागपूरच्या डीसीपींनी सांगितले. नागपूरमधील जो संवेदनशील भाग आहे, तिथे पोलिसांचा बंदोबस्त राहील, असेही त्यांनी सांगितले. संचारबंदी लावलेल्या भागातील स्थिती सध्या सामान्य आहे. परंतु, महत्त्वपूर्ण अशा गणेश पेठ, तहसील, कोतवाली हद्दीत पोलिसांचा बंदोबस्त राहणार आहे, पोलिसांनी सांगितले आहे.
दरम्यान, नागपूर शहरातील संचारबंदी पूर्णत: उठवली असली, तरी भालदारपुरा, मोमीनपुरा, चिटणीस पार्क चौक, हंसापुरी आणि इतर तणावग्रस्त भागांमध्ये पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त राहणार आहे. या ठिकाणी संचारबंदी उठवली असली तरी, सशस्त्र जवान अजूनही रस्त्यावर तैनात आहेत. पोलिसांची देखील गस्त वाढवण्यात येणार आहे. संचारबंदी हटवल्यानंतर जर कुणी संशयास्पद स्थितीत फिरताना किंवा हालचाली करताना आढळल्यास त्याला ताबडतोब ताब्यात घेण्याचे आदेश पोलिस आयुक्तांनी दिले आहेत.
104 दंगलखोरांची ओळख पटली, 92 जणांना अटक
दरम्यान, नागपुरातील हिंसाचाराच्या प्रकरणात आतापर्यंत 104 दंगलखोरांची ओळख पटली आहे. त्यापैकी 92 जणांना अटक केली आहे. तर 12 जण अल्पवयीन असल्याने त्यांच्यावरही विधिसंघर्षित कायद्यानुसार कारवाई सुरु आहे. संपूर्ण प्रकरणात आम्ही बजरंग दल विश्व हिंदू परिषद आणि इतरांवर गुन्हा दाखल केला आहे. मात्र हिंसाचार करणाऱ्या कुणालाही या प्रकरणातून सोडले जाणार नाही. पोलिसांवर हल्ला करणे हे अतिशय गंभीर बाब असून अशा हल्लेखोरांना जर सोडले तर हे कायदा आणि सुव्यवस्था या दृष्टीने योग्य नाही. परिणामी त्यांना अद्दल घडवल्याशिवाय सोडणार नाही असा इशारा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिला आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App