प्रतिनिधी
मुंबई : CM Fadnavis मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी धनंजय मुंडे यांचा राजीनामा घेण्यास विलंब झाल्याची स्पष्ट कबुली दिली. प्रस्तुत प्रकरणातील आरोपी मंत्र्यांच्या जवळचा होता. त्यामुळे मंत्र्यांनी नैतिकतेच्या आधारावर राजीनामा देण्याची गरज होती. पण आघाडीचे सरकार आहे. त्यामुळे निर्णय घेण्यास उशीर झाला. पण आम्ही फर्मली डील केले आणि त्यांनी राजीनामा दिला, असे ते म्हणालेत. आरोपपत्र दाखल केल्यानंतरच मी देशमुख हत्याकांडाचे फोटो पाहिले, असेही मुख्यमंत्र्यांनी यावेळी स्पष्ट केले.CM Fadnavis
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी एका मराठी वृत्तवाहिनीला मुलाखत दिली. त्यात त्यांनी संतोष देशमुख हत्याकांड व धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यासह विविध मुद्यांवर विस्तृत भाष्य केले. ते म्हणाले, धनंजय मुंडे यांचा राजीनामा योग्यवेळी झाला की, चुकीच्यावेळी झाला याच्या चर्चेत मी जात नाही. कारण, राजकारणात पहिला दिवस असो की शेवटचा लोकांना जे बोलायचे असते ते बोलतात. फोटो आले, ज्या प्रकारे हत्या झाली आणि हत्येचा मास्टरमाइंड ज्याला म्हटले गेले तो मंत्र्यांच्या इतक्या जवळचा आहे तर मंत्र्याने नैतिकतेच्या आधारावर राजीनामा दिला पाहिजे. पण आघाडी सरकार आहे. त्यामुळे निर्णय घेण्यास उशीर होत होता. पण अखेर आम्ही फर्मली डील केले आणि त्यांनी राजीनामा दिला.
यावेळी पुन्हा त्यांना धनंजय मुंडेंना राजीनामा देण्यासाठी धमकी दिली होती का? असा प्रश्न केला असता मुख्यमंत्र्यांनी मला जे सांगायचे होते, ते मी सांगितले, त्याउपर सांगणे योग्य नाही, असे नमूद करत त्यावर अधिक भाष्य करण्यास नकार दिला.
आरोपपत्र दाखल झाल्यानंतरच फोटो पाहिले
संतोष देशमुख हत्याकांडाचे काही फोटो सोमवारी सायंकाळी सोशल मीडियावर व्हायरल झाले. हे फोटो पाहून अवघा महाराष्ट्र अस्वस्थ झाला. त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी अजित पवार व धनंजय मुंडेंसोबतच्या एका बैठकीत त्यांना तातडीने राजीनामा देण्याची सूचना केली होती. विशेषतः त्यांनी राजीनामा द्या किंवा आम्ही तुम्हाला बडतर्फ करू, असा इशाराही त्यांनी यावेळी दिल्याची चर्चा आहे. या पार्श्वभूमीवर देवेंद्र फडणवीस यांनी उपरोक्त स्पष्टीकरण दिले आहे.
मुख्यमंत्री फडणवीस पुढे म्हणाले, लोकांना सिस्टीम अर्थात व्यवस्था समजत नाही. ज्यावेळी ही घटना घडली त्यानंतर मी त्याची सीआयडी चौकशी लावली होती. मी सीआयडीच्या लोकांना सांगितले की, त्यात हस्तक्षेप नसेल. तुम्ही पूर्ण क्षमतेने तपास करा. त्यानंतर आमच्या फॉरेन्सिक टीमने डिलीट केलेले व्हिडिओ व हरवलेले मोबाईल शोधले. त्यांनी पूर्ण डेटा दिला. त्यामुळे फोटो समोर आले. ते फोटो कुणी शोधले नाही. ते चार्जशीटमधील आहेत. सीआयडीच्या कामात कुणाचाही हस्तक्षेप झाला नाही.
ज्या दिवशी चार्जशीट दाखल झाली, त्यावेळी मला कळले काय तपास आहे. तोपर्यंत मी एकदाही सीआयडीकडे काही मागितले नाही. मी फोटोही पाहिले नाही. चार्जशीट दाखल झाल्यानंतरच मी फोटो पाहिले. मीच सॅनिटाईज केले नाही. त्यामुळे इतरांची हिंमत झाली नाही.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App