मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यानंतरचा पहिलाच मराठी भाषा गौरव दिन उत्साहात अन् थाटामाटात साजरा
विशेष प्रतिनिधी
मुंबई : Ajit Pawar मराठी भाषा गौरव दिनाच्या निमित्तानं गुरुवारी मुंबईत आयोजित पुरस्कार वितरण सोहळ्यात उपमुख्यमंत्री अजित पवार ( Ajit Pawar )हे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासमवेत सहभागी झाले होते. यावेळी त्यांनी सर्वांना मराठी भाषा गौरव दिनाच्या मनस्वी शुभेच्छा दिल्या.Ajit Pawar
यावेळी मोठ्या अभिमानानं, स्वाभिमानानं आणि सन्मानानं पार पडलेल्या या विशेष कार्यक्रमात पुरस्कार प्राप्त गौरवमुर्तींचं त्यांनी अभिनंदन केलं तसंच मराठी भाषा जगवण्यात, ती फुलवण्यात व प्रचार-प्रसारात भरीव योगदान दिल्याबद्दल सर्वांचे आभार मानले. याचबरोबर मराठी भाषेला साहित्याच्या सर्वोच्च शिखरावर नेणारे कविवर्य कुसुमाग्रज यांना जयंतीनिमित्त विनम्रपूर्वक अभिवादन केलं.
यावेळी अजित पवार म्हणाले, महाराष्ट्राची अस्मिता, महाराष्ट्राची संस्कृती, महाराष्ट्राचा वारसा, सीमा भागाचा स्वाभिमान जपणारी, छत्रपती शिवाजी महाराजांची, माझी, तुमची, आपणा सर्वांच्या मायमराठीला हजारो वर्षांची समृद्ध, गौरवशाली परंपरा आहे. संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम, संत नामदेव, संत एकनाथ, संत सावता माळी, संत नरहरी सोनार यांच्यासारख्या संतांनी त्यांचे अलौकिक विचार मराठी भाषेत मांडले. साहित्यिक वि. स. खांडेकर, कविवर्य कुसुमाग्रज, विंदा करंदीकर, पु.ल. देशपांडे, भालचंद्र नेमाडे, कवयित्री शांता शेळके, बहिणाबाई चौधरी यांच्या साहित्यकृतींनी मराठी साहित्याचा झेंडा उंच केला.
तसेच, मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यानंतरचा हा पहिलाच मराठी भाषा गौरव दिन आहे. त्यामुळं त्याचं महत्त्व अत्यंत आगळं-वेगळं आहे. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळवून दिल्याबद्दल मी देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदी आणि मंत्रिमंडळाचे मनापासून आभार मानतो. असं अजित पवारांनी सांगितलं
याशिवाय मुंबईत मराठी भाषा भवनाचं काम वेगानं सुरु आहे. ‘पु.ल.देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी’च्या नूतनीकृत अकादमी संकुलाचं काम पूर्ण झालं आहे. मराठी साहित्य, नाट्य संस्कृतीला चालना देणारं रविंद्र नाट्य मंदिर दिमाखदार पध्दतीनं पुन्हा आपल्या सेवेत येत आहे, याचा मला आनंद आहे. आपली मायमराठी भाषा नुसती जपायची नाही, तर ती पुढे नेण्यासाठी नव्या पिढीमध्ये तिची आवड निर्माण करायची आहे. ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. प्रत्येक मराठी माणसानं आपल्या मातृभाषेचा अभिमान बाळगला, तरच ती पुढे जाईल. अशी भावना अजित पवारांनी व्यक्त केली.
चला, आजच्या या मराठी भाषा गौरव दिनी आपण एक संकल्प करू. “मराठी भाषा वाचण्यासाठी, वाढवण्यासाठी, संवर्धनासाठी आणि तिला अभिमानानं पुढे नेण्यासाठी प्रयत्न करूया.” ‘माझ्या मराठी मातीला, नका म्हणू हीन, दीन, स्वर्गलोकाहून थोर, मला तिचा अभिमान…’ असं अजित पवारांनी म्हटलं.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App