– मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
विशेष प्रतिनिधी
मुंबई : Devendra Fadnavis मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते मंगळवार मुंबई बँकेच्या आर्थिक सहाय्याने चारकोप श्वेतांबरा सहकारी गृहनिर्माण संस्थेच्या स्वयंपुनर्विकसित प्रकल्पाचे उदघाटन व चावी वाटप कार्यक्रम मुंबई येथे पार पडला. यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी उपस्थितांना संबोधित केले.Devendra Fadnavis
आजचा दिवस स्वप्नपूर्तीचा असल्याचे सांगत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, स्वयंपुनर्विकासामुळे मुंबईच्या बाहेर राहायला जाण्याची वेळ आलेल्या मराठी माणूस आणि मध्यमवर्गीयाच्या मनात आशेचा किरण निर्माण झाला. आपल्याही जीवनात परिवर्तन घडू शकते हा आत्मविश्वास तयार झाला. यामुळे स्वयंपुनर्विकासाला आत्मनिर्भर हाऊसिंग म्हटले तर वावगे ठरणार नाही.
आज जवळपास 1500 गृहनिर्माण संस्थांचे पुनर्विकासाचे प्रस्ताव आल्याचे सांगत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, स्वयंपुनर्विकासामुळे दलालांची दुकाने बंद झाली. याबाबत सिंगल विंडो सिस्टीम अधिक प्रभावी आणि सिमलेस करणार आहोत, स्वयंपुनर्विकासाच्या सर्व सेवा ‘राईट टु सर्व्हिस’ कायद्यांतर्गत उपलब्ध करुन देणार आहोत, असेही मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या कार्यक्रमादरम्यान महत्त्वाची घोषणा करत स्वयंपुनर्विकास करणाऱ्या गृहनिर्माण संस्थांना पहिली तीन वर्षे प्रीमियमवर कोणतेही व्याज द्यावे लागणार नाही, असे जाहीर केले. आतापर्यंत या संस्था व सदनिकाधारकांना सुरुवातीला भरायच्या प्रीमियमवर व्याज द्यावे लागत असे, तसेच बँकेच्या कर्जावरही व्याज द्यावे लागत असे. आता मात्र पहिल्या टप्प्यात मार्च 2026 पर्यंत स्वयंपुनर्विकासाचे जे प्रस्ताव येतील, त्या सर्वांना प्रीमियमवर कोणतेही व्याज द्यावे लागणार नाही.
सहकारी गृहनिर्माण संस्थांच्या पुनर्विकासात मुंबई बँकेने पुढाकार घेतल्याचे सांगत मुख्यमंत्री फडणवीस यांनी बँकेचे अभिनंदन केले. तसेच बैठ्या चाळींसाठी क्लस्टर स्वयंपुनर्विकासाचा पर्याय अंगीकारता येईल. याबाबत आमदार प्रविण दरेकर यांच्या नेतृत्वाखाली एका समितीची स्थापना करणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.
मुख्यमंत्री फडणवीस पुढे म्हणाले की, काही लोक मराठी माणसाबद्दल फक्त बोलत राहिले, पण त्यांनी केले काहीच नाही. आम्ही मात्र मराठी माणसाला हक्काचे घर देऊ शकलो, याचे समाधान वाटते. स्वयंपुनर्विकासाच्या माध्यमातून आत्मनिर्भरतेने आमचा मुंबईकर उभा करण्याचा मी संकल्प घेतो. मुंबईचे चित्र स्वयंपुनर्विकासच बदलू शकेल, यासाठी मी प्रतिबद्धता आणि कटीबद्धता जाहीर करतो, असेही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.
यावेळी केंद्रीय मंत्री पियुष गोयल, आमदार प्रविण दरेकर, आमदार योगेश सागर, आमदार प्रसाद लाड, आमदार अतुल भातखळकर, आमदार संजय उपाध्याय, आमदार प्रशांत ठाकूर, आमदार निरंजन डावखरे, आमदार चित्रा वाघ, आमदार प्रकाश सुर्वे, खासदार स्नेहा दुबे-पंडित आणि इतर मान्यवर उपस्थित होते.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App