गेल्या काही दिवसांमध्ये महाराष्ट्रातल्या राजकारणातले “हलके” आणि “जड” याची चर्चा महायुतीतल्या तथाकथित ताणतणावांमुळे मराठी माध्यमांमध्ये सुरू आहे. त्याला महायुतीतले सगळेच वरिष्ठ नेते आपापल्या परीने राजकीय फुंकणीने हवा घालत आहेत. पण म्हणून ती हवा खरीच आहे, असे मानून चालायचे कारण नाही. कारण महाराष्ट्रातल्या राजकारणातले “हलके” आणि “जड”, दिल्लीत रेटून जम बसवलेल्या गुजरात्यांपुढे सगळेच शरण!!, ही वस्तुस्थिती आहे.
शिवाय हे शीर्षक देखील फार आनंदाने दिले असे नाही, उलट खंतालेल्या मनानेच हे शीर्षक द्यावे लागले आहे. कारण महाराष्ट्रातल्या मराठी नेत्यांचे दिल्लीतले कर्तृत्वच तेवढे तोकडे आहे. याला इतिहास आणि वर्तमान साक्ष आहे.
महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या शेवटच्या दिवशी “आम्ही असे घडलो” नावाच्या कार्यक्रमातल्या मुलाखतीत त्याची परखड चिकित्सा केली. मराठी नेत्यांना दिल्लीत जम बसवता येत नाही. कारण त्यांची तशी राजकीय इच्छाशक्तीच दिसत नाही. आपण बरे आणि आपला कारखाना बरा किंवा आपली संस्था बरी. दिल्लीतले राजकारण नकोच, अशी महाराष्ट्रातल्या सगळ्याच नेत्यांची मनोवृत्ती आहे. त्यामुळे ते दिल्लीत रेटून जम बसवूच शकत नाहीत. मराठी नेते केंद्रीय मंत्री झाले आणि गेले. त्यापलीकडे दिल्लीत त्यांना झेप घेता आली नाही, अशा परखड शब्दांमध्ये पृथ्वीराज चव्हाण यांनी महाराष्ट्रातल्या सगळ्या “साहेब” लोकांची पुरती काढून टाकली.
पण मुद्दा त्या पलीकडचा आहे. महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि विद्यमान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दोन-तीन वेळा आपल्याला “हलक्यात” घेऊ नका, असा इशारा दिला. तो इशारा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिल्याची मखलाशी मराठी माध्यमांनी केली. ती गेले काही दिवस सुरू राहिली. आज उपमुख्यमंत्री अजित पवारांनी साहित्य संमेलनाच्या समारोपातच एकनाथ शिंदेंच्या “हलक्यात” घेऊ नका, या वक्तव्याला पुन्हा राजकीय फुंकणीने हवा दिली. एकनाथ शिंदे हलक्यात घेऊ नका असे म्हणतात. ते नेमके मशालीला म्हणतात की अन्य कुणाला म्हणतात, ते कळत नाही, असा टोमणा अजितदादांनी एकनाथ शिंदे यांना मारला. यातून त्यांनी कमळ चिन्हाला डिवचले.
पण त्या पलीकडे अजितदादांच्याही वक्तव्यात फारसा दम नव्हता. कारण शाब्दिक खेळ करणे आणि खरे राजकारण करणे यात मूलभूत अंतर असते. तेच नेमके अंतर महाराष्ट्रातल्या राजकारणातल्या “हलक्या” आणि “जड” नेत्यांमध्ये आणि दिल्लीत रेटून जम बसवलेल्या गुजरात्यांमध्ये आहे. जे पार करणे आत्ताच्या महाराष्ट्रातल्या सगळ्या “साहेब” नेत्यांना फार कठीण किंबहुना जवळपास अशक्य आहे. कारण त्यांचा इतिहास आणि वर्तमान दिल्लीपुढे शरणागतीचा आहे. म्हणून तर स्वागताध्यक्ष साहेबांना मराठी साहित्य संमेलनाच्या उद्घाटन पंतप्रधान मोदींना बोलवावे लागले आणि त्यांनी केलेले “समग्र भाषण” मुकाटपणे ऐकून घ्यावे लागले. अन्यथा आतापर्यंतच्या दहा – पाच संमेलनांची उद्घाटने साहेबांनीच “साहित्यिक” भाषणांनी केली होती. तसेच दिल्लीतलेही संमेलनाचे उद्घाटन करता आले असते, पण दिल्लीत तेवढे “वजन” नसल्यामुळे शेवटी पंतप्रधानांना बोलवावे लागले. त्यांच्याशी आपले गुळपीठ जमते हे दाखवावे लागले!!
गुजरात मधल्या तीन नेत्यांनी दिल्लीत रेटून जम बसवला. त्यापैकी दोन तर विद्यमान नेते आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांनी दिल्लीतल्या सगळ्या लॉब्या + + कोटऱ्यांवर मात करून आपला रेटून जम बसवून दाखविला. आणि त्यांच्या आधी मोरारजी देसाई या गुजराती नेत्याने दिल्लीतल्या नेहरू गांधी कोटरीवर मात करून थेट पंतप्रधान पदाला गवसणी घातली होती. त्यावेळी तर इंदिरा गांधीं सारख्या प्रखर नेतृत्वाशी त्यांनी टक्कर घेतली होती. मोरारजी, नरेंद्र मोदी किंवा अमित शाह या तीन नेत्यांनी ज्या पद्धतीने दिल्लीत रेटून आपला जम बसविला, तसा जम यशवंतराव चव्हाण, शरद पवार, प्रमोद महाजन किंवा अगदी नितीन गडकरी यांनाही बसवता आला नाही. या सगळ्या “साहेबांना” दिल्लीतल्या लॉब्या आणि कोटऱ्यांवर कधीच मात करता आली नाही. हेच पृथ्वीराज चव्हाण यांनी दिल्लीतल्या साहित्य संमेलनाच्या शेवटच्या दिवशीच्या मुलाखतीमध्ये स्पष्ट शब्दांमध्ये सांगितले.
– शिंदेंना “हलके” कसे करायचे??
आत्तासुद्धा एकनाथ शिंदे यांच्या आपल्याला “हलक्यात” घेऊ नका, अशा वक्तव्याचा रोख मशालीकडे असला किंवा अगदी कमळ चिन्हाकडे असला, तरी एकनाथ शिंदे महाराष्ट्रात फार तर मशालीला “जड” ठरू शकतील. पण त्या पलीकडे दिल्लीत रेटून जम बसवलेल्या दोन गुजरात्यांपुढे शिंदे “जड” ठरण्याची सुतराम शक्यता नाही. कारण शिंदे महाराष्ट्रात मशाली ऐवजी कमळाला “जड” व्हायला लागले, तर त्यांना दिल्लीत आणून “हलके” कसे करायचे, हे दिल्लीत पाय घट्ट रोवून उभारलेल्या दोन गुजरात्यांना चांगलेच माहिती आहे. त्यामुळे शिंदेंचे वाढलेले वजन दिल्लीत कधीच सहन केले जाणार नाही आणि याची त्यांनाही निश्चित जाणीव आहे. महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये “हलके” आणि “जड” असे शाब्दिक खेळ करणारे दिल्लीत मात्र राजकीय कर्तृत्व फारच “हलके” असल्याचे हे वर्तमान फारच टोचणारे आहे!!
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App