नाशिक : मोदी + पवार गुळपीठावर मराठी साहित्यिकांची आणि संमेलन संयोजकांची तोंडे शिवली, पण त्यांनी शिंदे + गोऱ्हेंवर टीकेची तोफ डागली. असे दिल्लीत झालेले अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन आणि संभाजीनगर मध्ये झालेले विद्रोही साहित्य संमेलन यांच्या निमित्ताने घडले. दोन्ही साहित्य संमेलनांमध्ये सामील झालेल्या साहित्यिकांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींसह बाकीच्या नेत्यांवर टीका केली, पण फक्त शरद पवारांना काही बोलताना त्यांची तोंडे शिवली गेली होती. शरद पवार आणि मोदी उघडपणे राजकीय गुळपीठ दाखवत होते. पण त्यावर खरे भाष्य करण्याची कुणाचीच हिंमत झाली नाही.
दिल्लीत घडलेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांची मुलाखत राजीव खांडेकर आणि प्रवीण बर्दापूरकर यांनी घेतली. त्यांनी नीलम गोऱ्हे यांना एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे यांच्या शिवसेने विषयी प्रश्न विचारले. त्यावर उत्तर देताना उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत मर्सिडीज दिल्याशिवाय पदे मिळत नसल्याचा आरोप नीलम गोरे यांनी केला. त्यावरून महाराष्ट्रात खळबळ उडाली. शरद पवार स्वागताध्यक्ष असलेल्या साहित्य संमेलनातून उद्धव ठाकरेंवर नाव घेऊन असे टीकास्त्र सुटल्याने साहित्य संमेलनाचे संयोजक हादरले. आधीच त्यांनी एकनाथ शिंदेंचा महादजी शिंदे पुरस्कार देऊन सत्कार केल्यामुळे उद्धव ठाकरे चिडले होते. त्यावरून ठाकरे आणि पवार यांच्यात कलगीतुरा रंगला होता. त्यावेळी संजय राऊत यांनी साहित्य संमेलनाचे संयोजक म्हणून संजय नहार आणि कंपनीला ठोकून काढले होते. त्यांनी शरद पवारांना खोटी माहिती देऊन एकनाथ शिंदेंचा त्यांच्या हस्ते सत्कार घडवून आणण्याचा आरोप संजय राऊत यांनी केला होता.
त्यातच आज नीलम गोऱ्हे यांच्या आजच्या वक्तव्याची भर पडली. त्यांनी तर थेट उद्धव ठाकरे यांच्यावरच भ्रष्टाचाराचा आरोप केला. त्यामुळे संजय नहार आणि कंपनी हादरली. त्यांनी ताबडतोब नीलम गोरे यांचा निषेध करून “मी नाही त्यातली…”, असे दाखविण्याचा प्रयत्न केला. एकनाथ शिंदेंचा सत्कार जसा आपल्यावर शेकला, तसेच नीलम गोऱ्हे यांचे वक्तव्य आपल्यावर शेकेल याची त्यांना भीती वाटली आणि म्हणूनच संजय नहार आणि युवराज शहा यांनी नीलम गोरे यांचा निषेध केला.
पण नीलम गोऱ्हे खामक्या निघाल्या. त्यांनी आपल्या उत्तराची सगळी जबाबदारी मुलाखत कर्त्यांवर ढकलून टाकली. मुलाखत कर्त्यांनीच आपल्याला राजकीय प्रश्न विचारला नसता, तर आपल्याला राजकीय उत्तरे द्यायची गरजच नव्हती पण त्यांनी राजकीय प्रश्न विचारल्यामुळे मी राजकीय उत्तर दिले असे सांगून त्या मोकळ्या झाल्या. पण यात संजय नहार आणि कंपनीची पुरती गोची करून गेल्या.
संजय नहार आणि कंपनीने साहित्य संमेलनात राजकारण नको. राजकीय प्रतिक्रिया त्यांनी बाहेर व्यक्त कराव्यात, अशी माध्यमांपुढे आदळापट केली. परंतु या सगळ्यामध्ये शरद पवार आणि नरेंद्र मोदी यांच्या राजकीय गुळपीठावर चकार शब्द काढायची हिंमत संजय नाहर आणि कंपनीची झाली नाही. इतकेच काय पण संमेलनाध्यक्ष तारा भवाळकर यांनी मुलाखतींमधून जैविक नसलेल्यांवर विश्वास कसा ठेवायचा??, असे म्हणून नरेंद्र मोदींवर टीका केली होती, पण पवारांना मात्र त्यांनी जाणते नेते म्हणून त्यांची आरती ओवाळली.
– विद्रोही साहित्य संमेलनाची दांभिकता
दुसरीकडे विद्रोही साहित्य संमेलनातून दिल्लीच्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनावर पेशवाईची भोजनावळीची टीका प्रतिमा परदेशी यांनी केली, तर संमेलनाचे अध्यक्ष अशोक राणा यांनी एकनाथ शिंदेंना महादजी शिंदे पुरस्कार दिल्याबद्दल संमेलनाच्या संयोजकांवर टीकेची झोड उठवली. महादजी शिंदे हे स्वाभिमानी होते. त्यांच्या स्वाभिमानाचा लवलेश देखील एकनाथ शिंदेंमध्ये नाही. महादजी शिंदे यांच्यावर विषप्रयोग झाला तसा विषप्रयोग एकनाथ शिंदेंवर होईल, असे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या संयोजकांना सूचित करायचे असावे, असा टोला अशोक राणा यांनी हाणला. पण ज्या शरद पवारांनी शिंदेशाही पगडी घालून एकनाथ शिंदे यांचा सत्कार केला, त्या शरद पवारांवर तोंड उघडण्याची देखील हिंमत अशोक राणांना झाली नाही. वासुदेव मुलाटे आणि सतीश चकोर यांनी देखील पंतप्रधान नरेंद्र मोदी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका करण्यात धन्यता मानली. पण पवारांवर त्यांनी चकार शब्द उच्चारला नाही. किंवा मोदी + पवारांच्या गुळपीठावर देखील कुठले भाष्य केले नाही.
अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात सामील झालेले साहित्यिक त्यांचे संयोजक हे पवार शरणागत झालेले दिसले तसेच विद्रोही साहित्य संमेलनातले साहित्यिक आणि संयोजक देखील तेवढेच पवार शरणागत असल्याचे दिसले. कारण दोन्ही ठिकाणी मोदी + पवार गुळपीठावर भाष्य करायची हिंमत दिसली नाही.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App