विशेष प्रतिनिधी
मुंबई : Ajit Pawar दिल्ली विधानसभा निवडणुकीत भाजपला बहुमत मिळाले. मागील 10 वर्षांपासून सत्तेत असलेल्या आम आदमी पक्षाला 22 जागांवर समाधान मानावे लागले. दिल्ली विधानसभा निवडणुकीतील या यशामागे अमित शहा यांचे कष्ट आणि निवडणूक व्यवस्थापनाचेही मोठे योगदान असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष तथा राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हटले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसला दिल्ली विधानसभेत अपेक्षित यश मिळाले नसले, तरी या निवडणुकीतून आम्हाला खूप शिकायला मिळाले, असेही ते म्हणाले.Ajit Pawar
भाजपने सुमारे 27 वर्षांनंतर दिल्लीत पुनरागमन केले. 2020 मध्ये फक्त 8 जागा मिळालेल्या भाजपने यंदाच्या विधानसभा निवडणुकीत सुमारे 45 पेक्षा अधिक जागांवर आघाडी घेतली आहे. तर आम आदमी पार्टीला 22 जागांवर समाधान मानावे लागणार आहे. विशेष म्हणजे आम आदमी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना पराभवाचा सामना करावा लागला. दिल्ली विधानसभा निवडणुकीत अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने देखील उमेदवार उभे केले होते. मात्र सर्वांना पराभव स्वीकारावा लागला. यावर अजित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत त्यांनी भाजपचे अभिनंदन केले.
काय म्हणाले अजित पवार?
दिल्ली विधानसभेतील निर्णायक विजयाबद्दल मी प्रधानमंत्री मा.श्री. नरेंद्र मोदी जी, केंद्रीय गृहमंत्री मा.श्री. अमित शहा जी आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष श्री जे.पी नड्डा जी यांचं मनापासून अभिनंदन करतो. दिल्लीत स्थापन होणाऱ्या नवीन सरकारला उत्तम कामगिरीसाठी शुभेच्छा देतो.
दिल्ली विधानसभा निवडणुकीत ‘एनडीए’चा प्रमुख घटकपक्ष असलेल्या भाजपला मिळालेल्या 40 हून अधिक जागा या प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वावर दिल्लीकरांनी व्यक्त केलेल्या विश्वासाचं प्रतिक आहेत. केंद्र आणि दिल्ली विधानसभेतही प्रधानमंत्र्यांच्या विचारांचे डबल इंजिन सरकार आल्याने दिल्लीच्या सर्वांगीण विकासाला दुप्पट गती मिळेल. चांगले रस्ते, स्वच्छ पाणी, उत्तम शिक्षण, दर्जेदार आरोग्य सुविधांचे, देशाच्या राजधानीचे सर्वांगसुंदर शहर हे दिल्लीकरांचे स्वप्न पूर्ण होईल, असा विश्वास अजित पवार यांनी व्यक्त केला.
शहा आणि सचदेव यांच्या कार्याचे कौतुक
दिल्लीतील भाजपच्या यशामागे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या कष्ट व निवडणूक व्यवस्थापनाचेही मोठे योगदान आहे. दिल्ली भाजपचे अध्यक्ष वीरेंद्र सचदेव आणि त्यांच्या टीमने घेतलेली मेहनतही महत्वाची ठरली, असे अजित पवार यांनी म्हटले.
अपयशाचे विश्लेषण करून मेहनत घेणार
राष्ट्रवादी काँग्रेसला दिल्ली विधानसभेत अपेक्षित यश मिळालं नसले तरी या निवडणुकीतून आम्हाला खुप शिकायला मिळाले आहे. ही सुरुवात आहे. मिळालेल्या अपयशाचे विश्लेषण करुन भविष्यात देशपातळीवर पक्षबांधणीसाठी अधिक मेहनत घेतली जाईल. दिल्लीसह इतर अन्य राज्यात पक्षाचा विस्तार करण्यावर लक्ष केंद्रीत करण्यात येईल.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App