वृत्तसंस्था
मुंबई : Govind Pansare कम्युनिस्ट नेते गोविंद पानसरे यांच्या हत्येप्रकरणी गेल्या सहा वर्षांपासून अटकेत असलेल्या ६ आरोपींना उच्च न्यायालयाने बुधवारी जामीन मंजूर केला. आरोपी सचिन अंदुरे, गणेश मिस्कीन, अमित डेगवेकर, भारत कुराणे, अमित बड्डी आणि वासुदेव सूर्यवंशी बऱ्याच काळापासून अटकेत असल्याच्या कारणास्तव त्यांना जामीन मंजूर केला जात असल्याचे हायकोर्टाच्या एकलपीठाचे न्यायमूर्ती अनिल किलोर यांनी म्हटले आहे.Govind Pansare
आणखी एक आरोपी डॉ. वीरेंद्र तावडेची जामीन याचिका नंतर दाखल झाल्याने न्यायालय त्यावर स्वतंत्र सुनावणी घेणार आहे. दरम्यान, बुधवारी जामीन मिळालेल्यांपैकी छत्रपती संभाजीनगरचा सचिन अंदुरे नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरणात जन्मठेपेची शिक्षा भोगत आहे. त्यामुळे तो तुरुंगातच राहील.
‘सहा वर्षांपासून आपण अटकेत आहोत. अद्याप खटला सुरू आहे. नजीकच्या काळात तो संपण्याची शक्यता नाही,’ असा दावा करून आरोपींनी जामिनासाठी न्यायालयात धाव घेतली होती. दरम्यान, दोन फरार आरोपींचा तपास वगळता पानसरे यांच्या हत्येच्या सर्व पैलूंनी तपास झाला आहे.
त्यामुळे त्या फरारींसाठी या प्रकरणाच्या तपासावर न्यायालयाने देखरेख सुरूच ठेवायची आवश्यकता नाही, असे उच्च न्यायालयाने स्पष्ट केले होते. तसेच हत्येचे मुख्य सूत्रधार सापडेपर्यंत प्रकरणाच्या तपासावर देखरेख सुरूच ठेवण्याची विनंती करणारी पानसरे कुटुंबीयांची याचिका न्यायालयाने निकाली काढली होती. गेल्या १० वर्षांहून अधिक काळापासून उच्च न्यायालयाच्या देखरेखीखाली या प्रकरणाचा तपास सुरू होता. उपरोक्त निर्णय देताना, याप्रकरणी सुरू असलेला खटला जलदगतीने निकाली काढण्याच्या दृष्टीने खटल्याची दररोज सुनावणी घ्यावी, असे आदेशही न्यायालयाने दिले होते.
तपासात लक्षणीय प्रगती नसल्याने आरोपींना मुभा
पानसरेंच्या हत्येच्या संशयावरून पोलिसांनी अटक केल्यापासून आरोपी तुरुंगातच आहेत. हा खटला लवकर निकाली निघण्याची शक्यता नसल्याने जामीन मंजूर करण्यात आला आहे, असे न्यायालयाने म्हटले आहे. इतकेच नव्हे तर तपासात लक्षणीय प्रगती झाली नसल्यानेही हे आरोपी जामिनासाठी पात्र असल्याचा निर्वाळा न्यायालयाकडून देण्यात आला आहे. त्याआधारे हे आरोपी आता तुरुंगातून बाहेर येण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
सर्वोच्च न्यायालयात जाण्याचा पर्याय : मेघा पानसरे
पानसरेंच्या सूनबाई मेघा पानसरे म्हणाल्या, “उच्च न्यायालयाने सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाआधारे निर्णय दिला आहे. निकालपत्र पाहिल्यानंतर सर्वोच्च न्यायालयात दाद मागायची का, याबाबत आमच्या वकिलांशी चर्चा करून आम्ही निर्णय घेणार आहोत. पानसरेंवर गोळ्या झाडणारे प्रमुख आरोपी अजूनही फरार आहेत. त्यांना पकडण्यात तपास यंत्रणांना अजूनही यश आलेले नाही. हा खटला जिल्हा सत्र न्यायालयात सुरू आहे. हा खटला प्रदीर्घ काळ चाललेला आहे. सहा वर्षे उलटली. या काळात आमच्या विनंतीवरून न्यायालयाने तपास यंत्रणा बदलून दिल्या आहेत. नियमित सुनावणी घेऊन हा खटला लवकर संपवावा, दोषींना कठोर शासन व्हावे अशी अपेक्षा आहे.’
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App