विशेष प्रतिनिधी
बीड : Santosh Deshmukh murder case सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात वाल्मीक कराडला वगळून 8 आरोपींवर शनिवारी विशेष तपास पथकाने मकोका म्हणजेच संघटित गुन्हेगारी कायदा लावला. यामुळे आरोपींच्या जामिनाचा मार्ग बंद झाला असून कठोर शिक्षेसाठी हा कायदा महत्त्वाचा ठरणार आहे. वाल्मीकवर अद्याप खुनाचा गुन्हा दाखल नसल्याने त्याला मकोका लागलेला नाही. दुसरीकडे, खंडणीच्या गुन्ह्यात न्यायालयीन कोठडी मिळालेल्या विष्णू चाटेला सीआयडीने संतोष देशमुख यांच्या हत्येच्या गुन्ह्यात ताब्यात घेतले. न्यायालयाने त्याला २ दिवसांची पोलिस कोठडी सुनावली.Santosh Deshmukh murder case
मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरण हिवाळी अधिवेशनात गाजले. यावर उत्तर देताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणात मकोका कायद्यानुसार कारवाई करण्याचे आश्वासन दिले होते. हत्या प्रकरणात सुदर्शन घुले, प्रतीक घुले, महेश केदार, कृष्णा आंधळे, सुधीर सांगळे, जयराम चाटे, विष्णू चाटे यांच्याविरोधात गुन्हा नोंद होता, तर तपासात सिद्धार्थ साेनवणे याचाही सहभाग आढळल्याने त्यालाही आरोपी केले गेले होते. सध्या कृष्णा अांधळे वगळता इतर सात आरोपी अटकेत आहेत. खुनाच्या गुन्ह्याचा तपास डॉ. बसवराज तेली प्रमुख असलेल्या एसआयटी पथकाकडून होत आहे. एसआयटीने शनिवारी या प्रकरणात ८ जणांविरोधात मकोका कायदा लागू केला.
पुढे काय? : निकाल लागेपर्यंत आरोपी तुरुंगात
या प्रकरणात महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी कायद्यानुसार आता कारवाई होणार आहे. मकोकामुळे या गुन्ह्यात आरोपींना जामीन मिळण्याची शक्यता धूसर झाली आहे. प्रकरणाचा निकाल लागेपर्यंत हे आरोपी कारागृहातच राहतील. शिवाय मकोकामध्ये किमान ५ वर्षे ते कमाल जन्मठेप अशी शिक्षेची तरतूद असल्याने या आरोपींना जन्मठेपेचीही शिक्षा होऊ शकते. आरोपींच्या संपत्ती जप्तीची तरतूदही या कायद्यात आहे. आरोपींना मदत करणारेही या कायद्यानुसार आरोपी होऊ शकतात.
खुनाचा गुन्हा दाखल झाला तरच वाल्मीकवर मकोका
मकोकामध्ये वाल्मीक कराडचे नाव का नाही, असा प्रश्न अनेकांना पडला. याविषयी अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, मकोका खुनाच्या गुन्ह्यात लावला जातो. वाल्मीक खंडणीच्या गुन्ह्यात अटकेत आहे. अद्यापपर्यंतच्या तपासात त्याचा खुनाच्या गुन्ह्यात सहभाग पोलिसांना दिसलेला नाही. त्यामुळे त्याला खुनाच्या गुन्ह्यात आरोपी केलेले नाही. म्हणून सध्या त्याला मकोका लागलेला नाही. पुढे तो खुनाच्या गुन्ह्यात सहभागी असल्याचे सिद्ध झाले तर त्याच्यावरही मकोका लागेल.
सरकारी पक्षाकडून अॅड. बाळासाहेब कोल्हे यांनी युक्तिवाद केला. चाटे व अटकेतील इतर आरोपींची एकत्रित चौकशी करून त्यांचे मोबाइल जप्त करायचे आहेत. यासाठी ७ दिवसांच्या कोठडीची मागणी केली. आरोपींतर्फे अॅड. राहुल मुंडेंनी सांगितले की, चाटे १९ डिसेंबरपासून कोठडीत आहे. एक वगळता इतर सर्व आरोपी अटकेत आहेत. आतापर्यंत एकत्रित चौकशी केली नाही? न्यायालयानेही २४ दिवस आरोपी ताब्यात असताना काय केले? असे मत नोंदवले व २ दिवसांची कोठडी सुनावली.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App