संतोष देशमुख प्रकरणाच्या तपासात प्रगती; भाऊ धनंजय देशमुखांची हायकोर्टातून याचिका मागे!!

विशेष प्रतिनिधी

मुंबई : बीडच्या संतोष देशमुख प्रकरणातील तपासात व्यवस्थित प्रगती होत असून दोषींना लवकरच सजा होईल, अशी अपेक्षा व्यक्त करत संतोष देशमुखांचा भाऊ धनंजय देशमुखांनी हायकोर्टात दाखल केलेली याचिका मागे घेतली. त्यानंतर त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची देशमुख परिवारासह सागर बंगल्यावर जाऊन भेट घेतली. भाजपचे आमदार सुरेश धस यांनी ही भेट घडवून आणली.

देशमुख कुटुंबियांची भेट घेण्यापूर्वी देवेंद्र फडणवीस यांनी अंजली दमानिया यांची भेट घेतली. अंजली दमानिया यांनी वाल्मीक कराडच्या विरोधातले सगळे पुरावे फडणवीस यांना दाखवले. वाल्मीक कराड आणि धनंजय मुंडे यांच्यातले जॉइंट अकाउंट, वाल्मीक कराडची प्रचंड मालमत्ता आणि त्याची 5 वाईनची दुकाने, बीड जिल्ह्यातल्या पोलिसांबरोबर त्याचे असलेले साटेलोटे याची तपशीलवार माहिती अंजली दमानिया यांनी फडणवीसांना दिली. संतोष देशमुख प्रकरणांमध्ये एसआयटी तपासातील सगळे पोलिस अधिकारी बदलून बीड जिल्ह्याबाहेरचे अधिकारी घेण्याची मागणी त्यांनी केली. त्यानंतर फडणवीस यांनी देशमुख कुटुंबीयांची भेट घेतली.

भाजपने दबाव वाढविल्यास धनंजय मुंडेंचे मंत्रीपद वाचविणे अजितदादांना अवघड!!

संतोष देशमुख प्रकरणामधला सगळा घटनाक्रम पाहता त्याचा फडणवीस सरकारच्या प्रतिमेवर दुष्परिणाम दिसू लागला आहे. त्यामुळे भाजपने जर दबाव वाढविला तर धनंजय मुंडेंचे मंत्रीपद वाचविणे उपमुख्यमंत्री अजित पवारांना अवघड जाणार आहे. कालच रात्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्यात चर्चा झाली आहे.

बीडच्या संतोष देशमुख प्रकरणातील राजकीय आणि सामाजिक गुंतागुंत वाढून तिला मराठा विरुद्ध ओबीसी असे वळण देण्याचा प्रयत्न काही घटकांनी चालवला असून त्याचा त्रास भाजप सरकारला होत असल्याचे दिसून येत आहे. बीड प्रकरणातले सगळे धागेदोरे फक्त राष्ट्रवादी काँग्रेसशी संबंधित आहेत. त्यात शरद पवारांची राष्ट्रवादी आणि अजित पवारांची राष्ट्रवादी वेगळी होण्याआधीपासूनचे ताणतणाव आहेत. पवारांनी काँग्रेस – राष्ट्रवादी आघाडी सरकारच्या काळात पोसलेल्या सगळ्या गुंड पुंड, राख माफिया यांनी बीडचे राजकारण नसले. यातूनच धनंजय मुंडे आणि वाल्मीक कराड सारख्या प्रवृत्ती पोसल्या गेल्या. पण संतोष देशमुख प्रकरणात आता नैतिकतेच्या आधारावर सुप्रिया सुळे यांनी धनंजय मुंडे यांचा राजीनामा मागितला.

केवळ अजित पवारांना महायुतीत घेतल्यामुळे आता बीडचे सगळे प्रकरण भाजपचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निस्तरावे लागत आहे. अजितदादा धनंजय मुंडे यांना वाचवण्याच्या मूडमध्ये आहेत, पण देवेंद्र फडणवीस यांनी कायद्याच्या कसोटीवरच्या सगळ्या बाबी पूर्ण करून संतोष देशमुख प्रकरणाचा तपास पूर्णपणे स्वतःच्या ताब्यात ठेवून अजितदादांच्या राष्ट्रवादीला “कठोर संदेश” दिला आहे.

फडणवीसांनी अंजली दमानियांची भेट घेतली. सुरेश धस यांना राष्ट्रवादीच्या अपेक्षेप्रमाणे कुठलीही तंबी दिली नाही. भाजपच्या महिला प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ यांनी देखील आक्रमक भूमिका ठेवली. त्यातच संतोष देशमुख यांच्या कुटुंबीयांनी मुख्यमंत्री फडणवीस यांचीच भेट घेतली. हा सगळा घटनाक्रम बारकाईने लक्षात घेतला, तर अजित पवारांचा जरी धनंजय मुंडे यांना वाचवण्याचा प्रयत्न असला, तरी भाजपने जर आक्रमक भूमिका घेतली, तर धनंजय मुंडे यांचे मंत्रीपद वाचविणे अजित पवारांना कठीण जाणार आहे. कारण धनंजय मुंडे आणि वाल्मीक कराड ही प्रवृत्ती मूळात त्यांच्याच राष्ट्रवादीने पोसली आहे.

Dhananjay deshmukh withdrew petition from Bombay high court

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात