विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : दिल्ली विधानसभा निवडणुका फेब्रुवारी महिन्यामध्ये येऊ घातल्या असताना नववर्षाच्या पहिल्याच दिवशी राजधानीत अरविंद केजरीवाल विरुद्ध भाजप यांचे “लेटर वॉर” सुरू झाले. भाजपचे प्रदेशाध्यक्ष वीरेंद्र सचदेव यांनी केजरीवालांना पत्र लिहून नव्या वर्षात खोटं न बोलण्याची प्रतिज्ञा करा, अशा शब्दांमध्ये टोचले, तर अरविंद केजरीवाल यांनी सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांना पत्र लिहून भाजपविरोधात कागळ्या केल्या.
वीरेंद्र सचदेव यांनी अरविंद केजरीवाल यांना पत्र लिहून त्यांच्याकडून 5 अपेक्षा व्यक्त केल्या, तर केजरीवालांनी सरसंघचालकांना पत्र लिहून त्यांच्याकडे भाजप विषयी 4 तक्रारी करून तुम्हालाही हे मान्य आहे का??, असा सवाल केला.
वीरेंद्र सचदेव यांनी केजरीवाल यांना लिहिलेल्या पत्रात 2025 मध्ये मी खोटं बोलणार नाही अशी प्रतिज्ञा करा, भ्रष्टाचार बंद करा, वृद्धांना खोटी आश्वासने देणे बंद करा विद्यार्थ्यांना खोटी आश्वासने देऊ नका, यमुना साफ करायचा खोट्या घोषणा केल्याबद्दल माफी मागा, दिल्लीत दारू घोटाळा विषयी माफी मागा असे 5 मुद्दे नमूद केले आहेत.
तर अरविंद केजरीवाल यांनी सरसंघचालकांना लिहिलेल्या पत्रात दिल्लीत भाजप करत असलेली फोडाफोडी, मतदारांच्या यादीशी छेडखानी तुम्हाला मान्य आहे का??, असे सवाल केले आहेत. केजरीवालांनी सरसंघचालकांना लिहिलेले हे दुसरे पत्र आहे. यापूर्वीच्या पत्रात देखील त्यांनी भागवतांकडे अशा स्वरूपाच्या तक्रारी केल्या होत्या. मात्र भागवतांनी त्या पत्राला प्रत्युत्तर दिले नव्हते.
आजच्या “लेटर वॉर” नंतर केजरीवाल समर्थक आणि भाजप यांनी स्वतंत्रपणे पत्रकार परिषदा घेऊन त्या पत्रांमधलेच मुद्दे सविस्तरपणे विशद केले. या “लेटर वॉर”चे पुढच्या महिन्यावर पडसाद उमटण्याची दाट शक्यता आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App