विशेष प्रतिनिधी
पुणे : Amol Kolhe आमदार सुरेश धस यांचे विधान मी ऐकले. त्यांनी इव्हेंट पॉलिटिक्सबद्दल सांगत असताना त्यावर वक्तव्य केले होते. त्यामुळे त्या विधानाला आणखी वेगळे काही वळण देण्याची गरज नाही, असे मला वाटते. प्राजक्ता माळी यांची पत्रकार परिषद मी अद्याप पाहिली नाही. पण कोणत्याही पुराव्याशिवाय कुणावरही शिंतोडे उडवता कामा नये, अशा शब्दांत खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी अभिनेत्री प्राजक्ता माळी हिला सुनावले आहे.Amol Kolhe
बीड जिल्ह्यातील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्याप्रकरणामुळे राज्यातील राजकारण ढवळून निघाले आहे. बीडमध्ये शनिवारी (२८ डिसेंबर) सर्वपक्षीय नेत्यांनी विशाल मोर्चा काढत या हत्येमधील मारेकऱ्यांना अटक करण्याची मागणी केली. मारेकऱ्यांना अटक करण्यासाठी सुरुवातीपासून आक्रमक राहिलेले भाजपाचे आमदार सुरेश धस यांनी शुक्रवारी बीडचे नवनियुक्त पोलीस अधीक्षक नवनीत कावत यांची भेट घेतल्यानंतर माध्यमांशी बोलत असताना धनंजय मुंडे यांच्या इव्हेंट मॅनेजमेंट पॉलिटिक्सवर भाष्य केले. यावेळी त्यांनी काही महिला सेलिब्रिटींची नावे घेतली. ज्यात अभिनेत्री, लेखिका प्राजक्ता माळी यांचाही उल्लेख होता. या उल्लेखानंतर प्राजक्ता माळी यांनीही पत्रकार परिषद घेत सुरेश धस यांच्या विधानाचा जोरदार प्रतिकार करत त्यांनी जाहीर माफी मागावी, अशी मागणी केली. आता या प्रकरणावर डॉ. अमोल कोल्हे यांनी भाष्य केले असून सुरेश धस यांच्या विधानात काही चुकीचे दिसले नाही, असे म्हटले आहे.
पत्रकारांशी बोलताना डॉ. कोल्हे म्हणाले, सुरेश धस यांच्या विधानातून मला जेवढे समजले त्यानुसार त्यांनी फक्त इव्हेंटबाबत वक्तव्य केले होते. या पलीकडे जर शिंतोडे उडविण्याचा प्रयत्न झाला असेल तर तो अभिनेत्रीच काय तर कुणाच्या बाबतीतही होता कामा नये.
संतोष देशमुख हत्या प्रकरणावर प्रतिक्रिया देत असताना खासदार अमोल कोल्हे म्हणाले की, सरकारमधील एका मंत्र्यावर सातत्याने असे आरोप होत असतील आणि संशायचे धुके बाजूला होत नसेल तर एकूणच सरकारच्याच कार्यप्रणालीच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह निर्माण होऊ शकते. सरपंच संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांना न्याय मिळायलाच हवा. नेत्यांनी काही नावे समोर आणली असली तरी यात जे कोण आरोपी असतील त्यांना शिक्षा व्हायलाच हवी, अशी अपेक्षा अमोल कोल्हे यांनी व्यक्त केली.
बीडमध्ये निघालेल्या मोर्चावर बोलताना ते म्हणाले, बीडमध्ये निघालेल्या मोर्चातून हेच दिसते की, सर्वसामान्य जनता जागरूक आहे. राजकीय आशीर्वादापोटी कुणाला पाठीशी घालण्याचा प्रयत्न होत असेल तर आता जनता ते सहन करणार नाही. लोकांच्या मनात जे संशायचे धुके निर्माण झाले आहे, ते दूर करण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी पुढाकार घ्यायला हवा. गृह मंत्रालय त्यांच्याकडे आहे. त्यांनीच हे शंकाचे निरसन करायला हवे, असेही ते म्हणाले
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App