विशेष प्रतिनिधी
पुणे : Dr. Neelam Gorhe विसापूर किल्ल्याच्या पायथ्याशी राहणाऱ्या एका कुटुंबातील पाच वर्षांच्या चिमुकलीसोबत बंदोबस्तावर असलेल्या पोलिसाने अश्लील कृत्य केल्याची संतापजनक घटना घडली आहे. लोणावळा ग्रामीण पोलीस स्टेशनमध्ये कार्यरत असलेल्या नराधम पोलीस सचिन सस्ते हा लघुशंकेचा बहाणाकरून हॉटेलच्या मागे गेला आणि चिमुकलीसोबत अश्लील चाळे केले. घडलेला प्रकार मुलीने आईला सांगितला. यानंतर लोणावळा ग्रामीण पोलिसांनी त्याला अटक केली आहे. याप्रकरणी शिवसेना नेत्या तथा विधानपरिषद उपसभापती, डॉ. नीलम गोऱ्हे यांनी पुणे ग्रामीण पोलीस अधिक्षक पंकज देशमुख यांच्याशी संपर्क साधला आणि संपूर्ण घटना जाणून घेतली.Dr. Neelam Gorhe
बुधवार दि. २५ डिसेंबर २०२४ रोजी मावळ तालुक्यातील पर्यटन स्थळांवर पोलिसांकडून अधिकचा बंदोबस्त लावण्यात आला होता. पर्यटन स्थळावर कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांचा चोख बंदोबस्त लावण्यात येतो पण तसे असतानाही हा भयानक प्रकार घडला. यामध्ये लोणावळा ग्रामीण पोलीस स्टेशनमध्ये FIR क्र. ३५३/२०२४ नोंदविण्यात आला आहे.
या प्रकरणाची तत्काळ गांभीर्याने दखल घेत उपसभापती, डॉ. नीलम गोऱ्हे यांनी पोलीस अधिक्षक पंकज देशमुख यांना घटनेतील आरोपी सचिन सस्ते या पोलीस कर्मचाऱ्यावर पॉक्सो कायद्यांतर्गत उचित कार्यवाही करावी व आरोपीला कठोर शिक्षा व्हावी याची दक्षता घेण्याचे सूचित केले. तसेच, या प्रकरणात शासनाद्वारे योग्य कायदेशीर मदत मिळवून देण्याची ग्वाही दिली. त्याचप्रकारे, पीडित मुलीच्या पालकांना उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी दूरध्वनीद्वारे संपर्क साधून त्यांचे समुपदेशन करत धैर्य दिले.
अशीच आणखी एक संतापजनक घटना कोंढवा परिसरात घडली आहे. येथे एका शाळकरी मुलीवर दि. ११ डिसेंबर, २०२४ रोजी विनयभंगाची घटना घडल्याचे समाजमाध्यमांद्वारे निदर्शनास आले आहे. याप्रकरणात कोंढवा पोलीस स्टोशनमध्ये गुन्हा क्र. १३८८/२०२४ नोंदविण्यात आला असून आरोपीस दि. २४ डिसेंबर, २०२४ रोजी अटक करण्यात आली आहे. या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेत आरोपीला कठोर शिक्षा व्हावी असे निर्देश शिवसेना नेत्या तथा विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी पुणे पोलीस आयुक्त यांना दिले आहेत.
ही घटना पुण्यासारख्या पुरोगामी आणि महिला सक्षमिकरणास प्राधान्य देणाऱ्या शहराला निश्चितच शोभणारी नाही. अशा परिस्थितीत पुणे शहरात कायदा व सुव्यवस्थेची परिस्थिती सुधारावी आणि मुली व महिलांना सुरक्षिततेचे वातावरण मिळावे असं म्हणत उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी काही महत्त्वाच्या सूचनाही दिल्या आहेत.
आरोपी बस चालकावर पॉक्सो कायद्यांतर्गत तत्काळ कायदेशीर कार्यवाही करण्यात यावी व त्यास जामीन मिळणार नाही याची दक्षता घेण्यात घ्यावी. या घटनेतील सर्व परिस्थितीजन्य पुरावे व न्यायवैद्यकीय दस्तऐवज एकत्रित करून न्यायालयापुढे सादर करण्यात यावे. हे प्रकरण जलदगती न्यायालयात चालविण्यात यावे व यासाठी शासनातर्फे विशेष सरकारी अभियोक्त्यांची नियुक्ती प्राधान्याने करण्यात यावी. जेणेकरून, आरोपीस कठोर शिक्षा होणे सुलभ जाईल. पीडित मुलीच्या पालकांचे समुपदेशन करण्यात यावे व त्यांना मनोधैर्य योजनेतून यथाशक्य मदत देण्यात यावी.
शाळेतील विद्यार्थ्यांना ने-आण करणाऱ्या वाहतूक बसबाबत शासनाने काही मार्गदर्शक सूचना दि. १८ मार्च, २०१६ रोजीच्या शासन निर्णयाद्वारे निर्गमीत केल्या आहेत.
सदरच्या शासन निर्णयान्वये मा. उच्च न्यायालय, नागपूर खंडपीठ यांच्या निर्देशांचे अवलंबन करण्याची जबाबदारी शाळा व्यवस्थापनावर राहील व संबंधित शिक्षणाधिकारी हे नोडल अधिकारी म्हणून कार्य करतील. अशा सूचना निर्गमीत करण्यात आल्या आहेत. यापार्श्वभूमीवर, संबंधित शाळेने मुलींच्या सुरक्षित वाहतूक व्यवस्थेसंदर्भात कोणत्या उपाययोजना केल्या याची चौकशी करावी. तसेच, शाळकरी मुलींच्या संरक्षणाच्या व सुरक्षित वाहतुकीच्या दृष्टीकोनातून शासनाने दिलेल्या निर्देशांचे तंतोतंत पालन करण्यात यावे. ‘आपणातर्फे करण्यात आलेल्या कार्यवाहीचा अहवाल कृपया माझ्या कार्यालयास अवगत करण्यात यावा’, असेही उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी पोलीस आयुक्तांना सूचित केले.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App