विशेष प्रतिनिधी
मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळात छगन भुजबळ यांना उपमुख्यमंत्री अजित पवारांनी स्थान दिले नाही. त्यामुळे भुजबळ नाराज झाले. त्यांनी बंडाची भाषा वापरली त्यावेळी अजितदादांनी त्यांच्याकडे दुर्लक्ष केले. बारामतीतल्या सत्कार सभेत बोलताना भुजबळ यांचे नाव न घेता काही ज्येष्ठ नाराज झाल्याचे म्हणाले, पण आज भुजबळांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतल्यानंतर मात्र भुजबळांची नाराजी हा पक्षांतर्गत विषय आहे, अशी मखलाशी अजितदादांनी केली.
छगन भुजबळ यांनी आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली या भेटीनंतर त्यांनी पत्रकार परिषद घेऊन बराच खुलासा केला. फडणवीस यांच्याशी आपली 45 मिनिटे चर्चा झाली. या चर्चेत फडणवीसांनी ओबीसींना नाराज करून चालणार नाही, याची आपल्याला जाणीव असल्याचे सांगितले. जे काही घडले त्यावर तोडगा काढण्यासाठी 8 – 10 दिवस लागतील असे सांगितले. आपण पुन्हा फडणवीसांना त्यानंतर भेटू, असे भुजबळ म्हणाले. फडणवीसांना भेटून आल्यानंतर भुजबळ दिल्लीला रवाना झाले.
भुजबळांच्या नाराजी दरम्यान अजित पवार, सुनील तटकरे, प्रफुल्ल पटेल वगैरे नेते त्यांची समजूत काढणार त्यांना भेटायला नाशिकला येणार अशा बातम्या प्रसारमाध्यमांमध्ये आल्या होत्या पण हे तीनही नेते नाशिककडे फिरकले नव्हते भुजबळांच्या नाराजीकडे शक्यतो दुर्लक्ष करण्याचे धोरण अजित पवारांनी सुरुवातीला ठेवले होते. पण छगन भुजबळ यांनी मात्र अजित पवारांच्या राजकीय नियोजनाचे वाभाडे काढणे सोडले नव्हते. अजित पवारांनी कधी आपल्याला लोकसभेवर पाठवायचे म्हटले, नंतर राज्यसभेवर जा म्हणाले. नंतर माझी राज्यात गरज आहे, असे म्हणाले, पण प्रत्यक्षात त्यांनी आपल्याला मंत्रिमंडळातून वगळले, याची खंत भुजबळ यांनी बोलून दाखवली. भुजबळ यांनी मांडलेल्या मुद्द्यांवर अजित पवारांनी नेमकेपणाने कोणतीही प्रतिक्रिया व्यक्त केली नाही.
पण आज छगन भुजबळ अजितदादांना बाजूला सारून थेट फडणवीस यांना भेटल्यानंतर मात्र भुजबळांची नाराजी हा राष्ट्रवादी काँग्रेस मधला पक्षांतर्गत विषय आहे, अशी मखलाशी अजित पवारांनी केली. भुजबळांसारखा नेता आपल्या पक्षातून निसटतो की काय??, याची भीती अजितदादांना निर्माण झाल्याचे यातून दिसले.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App