विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी कथितपणे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा अपमान केल्याचा मुद्दा लावून धरत काँग्रेस सह सर्व विरोधी खासदारांनी संसदेच्या आवारात निदर्शने केली त्यादरम्यान राहुल गांधींनी भाजपच्या खासदारांना धक्काबुक्की केली या धक्काबुक्कीत खासदार मुकेश रजपूत आणि खासदार प्रताप चंद्र सरंगी जखमी झाले मात्र या धक्काबुक्कीचे राहुल गांधींनी समर्थन केले.
होय, संसदेच्या पायऱ्यांवर आम्ही धक्काबुक्की केली. कारण भाजपचे खासदार आम्हाला संसदेत जाण्यापासून अडवत होते. पण अशा धक्काबुक्कीमुळे कुणाला काही होत नसते, अशा शब्दांमध्ये राहुल गांधींनी त्या धक्काबुक्कीचे समर्थन केले.
खासदार मुकेश राजपूत यांना गंभीर जखम झाली असून त्यांना राम मनोहर लोहिया रुग्णालयात आयसीयूमध्ये दाखल करण्यात आले. खासदार प्रताप चंद्र सरंगी यांच्या डोक्याला जखम झाली असून त्यांनाही त्याच रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
अमित शाह यांनी राज्यसभेतील संविधान चर्चेदरम्यान घटनाकार डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा अपमान केला, असा आरोप काँग्रेसने कालपासून सुरू केला. आज संसदेसमोर काँग्रेस सह बाकीच्या विरोधी पक्षांनी अमित शाह यांच्या राजीनाम्यासाठी जोरदार निदर्शने केली. या निदर्शनासाठी राहुल गांधी आणि प्रियांका गांधी निळी ड्रेपरी घालून आले होते. राहुल गांधींनी निळा टी-शर्ट घातला होता, तर प्रियंका गांधी यांनी निळी साडी नेसली होती. या सगळ्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची प्रतिमा हातात घेऊन संसदेच्या आवारात निदर्शने केली.
या निदर्शनादरम्यानच राहुल गांधींचे धसमुसळे वर्तन समोर आले. त्यांनी भाजपच्या दोन खासदारांना संसदेच्या पायऱ्यांवर धक्काबुक्की केली. ती धक्काबुक्की एवढी जोराची होती की खासदार मुकेश रजपूत आणि खासदार प्रतापचंद्र सरंगी संसदेच्या पायऱ्यांवरून खाली पडले आणि जखमी झाले. त्यांच्यावर राम मनोहर लोहिया रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
या सगळ्या प्रकरणात राहुल गांधींनी मात्र समर्थन करून भाजप खासदार जखमी झाल्याच्या गांभीर्याकडे पूर्ण दुर्लक्ष केले.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App