विशेष प्रतिनिधी
मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसमधील निर्णय प्रक्रियेत केवळ माझा कोणताही हस्तक्षेप नसतो. आमच्या पक्षात केवळ अजित पवार, प्रफुल्ल पटेल व सुनील तटकरे हे तिघेच निर्णय घेतात, असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तथा माजी मंत्री छगन भुजबळ यांनी मंगळवारी केला. त्यांच्या या आरोपामुळे राष्ट्रवादीच्या गोटात एकच खळबळ माजली आहे. महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये काँग्रेस, उद्धव ठाकरे व शरद पवार मला विश्वासात घेत होते, अशी खंतही त्यांनी यावेळी बोलून दाखवली. Chhagan Bhujbal
महायुती सरकारच्या मंत्रिमंडळ विस्तारात छगन भुजबळ यांना स्थान मिळाले होते. यामुळे ते पक्षावर नाराज असल्याची माहिती आहे. त्यांनी सोमवारी पत्रकारांशी बोलतानाही आपण नाराज असल्याचे स्पष्ट केले. त्यानंतर मंगळवारी पुन्हा त्याचा पुनरुच्चार केला. तसेच राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये राहायचे की नाही हे कार्यकर्त्यांशी बोलून ठरवणार असल्याचेही संकेत दिले. त्यानंतर आता त्यांनी थेट राष्ट्रवादीच्या पक्ष नेतृत्वावरच प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. Chhagan Bhujbal
पक्षात मला विश्वासात घेतले जात नाही
छगन भुजबळ म्हणाले की, राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अजित पवार, प्रफुल्ल पटेल व सुनील तटकरे हे तिघेच निर्णय घेतात. चर्चेत किंवा निर्णय प्रक्रियेत माझा सहभाग शून्य आहे. आमदारकीचे कुणाला तिकीट द्यायचे हे सुद्धा मला माहिती नसते. खासदारकीची उमेदवारी कुणाला द्यायची? हे ही मला माहिती नाही. मंत्री कुणाला करायचे? हे ही आम्हाला ठावूक नाही. हे केवळ त्या तिघांनाच ठावूक असते. आम्ही या पक्षात आमची सिनिअॅरिटी घेऊनच आलो होतो. यापूर्वी शिवसेना असेल, काँग्रेस असेल किंवा राष्ट्रवादी काँग्रेस असेल आम्हाला विश्वासात घेतले जायचे. पण इकडे असे काहीच होत नाही.
मी माझ्या कार्यकर्त्यांपुढे माझी व्यथा मांडली आहे. नक्की काय झाले हे त्यांना समजले पाहिजे. मी त्यांना सगळा इतिहास सांगितला. पूर्वी काय झाले? आता काय झाले? मागच्या 4-6 महिन्यात काय झाले? व मागील 8-10 दिवसांत काय झाले? हे सर्वकाही सांगितले आहे. त्यानंतर त्यांनीही मला मी घेईल त्या निर्णयामागे खंबीरपणे उभे राहण्याची ग्वाही दिली आहे, असे छगन भुजबळ म्हणालेत.
कसला वादा अन् कसला दादा
प्रफुल्ल पटेल व सुनील तटकरे यांनी 8 दिवसांपूर्वी समीर भुजबळांना बोलावले. नितीन पाटील यांचा राजीनामा घेवून भुजबळ साहेबांना राज्यसभेवर पाठवू असे सांगितले. मकरंद पाटील यांना मंत्रिपद द्यायचे आणि त्यांच्या भावाला खाली बोलवायचे. हा काय पोरखेळ आहे का? लोकांनी मला निवडून दिले. त्यांना मी काय तोंड देवू. त्यांना भुजबळांचा बळी घ्यायचा होता का? छगन भुजबळ काय लल्लू पाटील आहे का? हा काही पोरखेळ आहे का? माझ्या मनात मंत्री पदाची शंका होती. त्याप्रमाणेच सर्व घडले. माझी किंमत होत नसेल तर काय उपयोग? दादाचा वादा. वाह रे दादाचा वादा, कसला वादा अन् कसला दादा, अशा शब्दांत भुजबळांनी यावेळी आपला संताप व्यक्त केला.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App