विशेष प्रतिनिधी
जालना : Manoj Jarange महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीत उमेदवार द्यायचे की फक्त पाडायचे, या सवालाचं उत्तर अखेर मनोज जरांगे पाटील यांनी गुरुवारी दिलं. आंतरवाली सराटीत त्यांनी मुस्लिम धर्मगुरू सज्जाद नोमाणी, आंबेडकरी चळवळीचे आनंदराज आंबेडकर, राजरत्न आंबेडकर या प्रमुख नेत्यांशी अडीच तास चर्चा केली.Manoj Jarange
यात मराठा, दलित व मुस्लिम समाजाने (एमडीएम) एकत्र येऊन १४५ ते १५५ मतदारसंघांत स्वतंत्र उमेदवार देण्याचा निर्णय जाहीर केला. ‘२ दिवसांत आणखी काही समाजाशी चर्चा करून ३ नोव्हेंबर रोजी उमेदवारांची नावे जाहीर करू,’ असे जरांगे यांनी सांगितले. आम्ही धर्मपरिवर्तनासाठी नव्हे तर सत्तापरिवर्तनासाठी एकत्र आलो, असे ते म्हणाले. दरम्यान, एकमेकांच्या जात-धर्माबद्दल न बोलण्याची अट किमान समान कार्यक्रमात सर्वच नेत्यांनी मान्य केली असल्याचे सूत्रांनी सांगितले.
मराठा, दलित व मुस्लिम समाज एकत्र आल्याशिवाय सर्वसामान्यांपर्यंत सत्ता पोहोचणार नाही, अशी भूमिका जरांगे यांनी मांडली होती. त्याला इतर दोन्ही समाजांचे नेते, धर्मगुरूंनी पाठिंबा दिला. या पार्श्वभूमीवर मुस्लिम धर्मगुरू सज्जाद नोमाणी, आंबेडकरी चळवळीचे आनंदराज आंबेडकर, राजरत्न आंबेडकर यांच्या उपस्थितीत आंतरवाली सराटीत गुरुवारी महत्त्वपूर्ण बैठक घेण्यात आली. यात कोणत्या मतदारसंघात लढायचे हे ठरवण्यात आले. बैठकीनंतर या सर्व नेत्यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेतली. जरांगे म्हणाले, ‘आम्हाला अन्यायाचे संकट परतवून लावायचे अाहे. जे आम्हाला संपवायला निघाले होते त्यांना आम्हाला संपवायचे आहे. मराठा समाजाने जे स्वप्न पाहिले होते, ते स्वप्न आज साकार होत अाहे. मराठा- दलित- मुस्लिम समाज एकत्र आला आहे. मात्र, कोणत्या जागा कुणी लढवायच्या याबाबत अजून निर्णय झालेला नाही. अन्य समाज घटकांशी बोलून ३ नोव्हेंबरला हा निर्णय जाहीर केला जाईल,’ असे ते म्हणाले.
तिसरी आघाडी नाही, तिसरी आझादी : राजरत्न आंबेडकर
धनगर, ओबीसी, लिंगायत, बंजारा लहान समूहसुद्धा आमच्यासोबत येणार आहेत. त्यांनाही आम्ही सोबत घेऊ. आमच्यासाठी ही तिसरी आघाडी नाही तिसरी आझादी आहे. महाराष्ट्राचे चित्र बदलण्याचे काम जरांगे यांनी केले आहे. आमच्या बाजूने बोलणारे प्रतिनिधी आता विधानसभेत पाठवायचे आहेत.
काय ठरले बैठकीत?
मनोज जरांगे पाटील आणि आनंदराज आंबेडकर यांच्या जिल्हानिहाय सभा होतील. तब्येतीच्या कारणामुळे धर्मगुरू नोमाणी हे मोजक्याच सभांना उपस्थित राहतील.
एकत्र येणाऱ्या समाजाच्या नेत्यांनी एकमेकांचा धर्म, त्यांच्या श्रद्धा, धार्मिक परंपरा यावर बोलायचे नाही. ही एकी समाजपरिवर्तनासाठी असून धर्मपरिवर्तनासाठी नव्हे, हे सर्वांनी लक्षात ठेवावे.
जरांगे पाटील उमेदवारांची घोषणा करतील, त्यानंतर ५ नोव्हेंबरपर्यंत किमान समान कार्यक्रम जाहीर केला जाईल.
राज्यात दलित-मुस्लिम-मराठा पॅटर्न यशस्वी झाला तर देशातही अशाच पद्धतीची मोट बांधता येईल का, यावर चर्चा झाली. निवडणुकीनंतर ते ठरेल.
नोमाणी म्हणाले, जरांगेंमध्ये मला नवे आंबेडकर, गांधीजी दिसतात
मुस्लिम धर्मगुरू नोमाणी म्हणाले, ‘संघाने धर्माच्या नावावर देशात भांडणे लावली. देशात फूट पाडणारे लोकच सत्तेत आहेत. मात्र जरांगे यांच्या रूपाने भारताला नवे गांधीजी, आंबेडकर मिळालेत. देशाला अशा नेतृत्वाची गरज आहे. ते व मी दोघेही फकीर. देशाला अशाच फकिरांची गरज आहे. आमचा किमान समान कार्यक्रम तयार आहे. आमच्यातील चर्चा लेखी द्यायलाही आम्ही तयार आहोत.’
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App